मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2023 (07:35 IST)

धोनीचा लाडका खेळाडू धनंजय मुंडेच्या संघाकडून खेळणार

dhoni
महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने १६ ते २९ जून दरम्यान ही स्पर्धा भरवली आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या स्पर्धेत खेळणार असून, मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स हा संघ मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. छत्रपती संभाजी किंग्स या संघाची मालकी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतली आहे.
 
आयपीएलप्रमाणे एमपीएलमध्येही खेळाडूंचा लिलाव झाला. या लिलावात छत्रपती संभाजी किंग्जने २२ खेळाडू खरेदी केले असून त्यातले ११ खेळाडू हे मराठवाड्यातील आहेत. या स्पर्धेत सर्वच संघांनी आपले आयकॉन खेळाडू नियुक्त केले असून, भारतासाठी १९ वर्षांखालील विश्वचषक खेळणारा तसेच रणजी खेळाडू आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज धाराशिवकर राजवर्धन हंगरगेकर हा छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा आयकॉन खेळाडू असणार आहे. आयपीएलमध्ये धोनीच्या सीएसकेकडून (चेन्नई सुपर किंग्ज) खेळणारा राजवर्धन एमपीएलमध्ये धनंजय मुंडेंच्या सीएसकेकडून (छत्रपती संभाजी किंग्ज) खेळणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor