गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By

गेट वे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासह ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन

shivaji maharaj
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 1 जून रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि त्यानंतर ‘जाणता राजा’ हे महानाट्य सादर केले जाणार आहे. हे प्रदर्शन ६ जूनपर्यंत सुरु राहणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक ठरावा, पुन्हा तो क्षण विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत पोहोचावा, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यासाठी मौजे पाचाड, किल्ले रायगड याबरोबरच मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालय यांच्यावतीने दिनांक १ जून ते ६ जून या कालावधीत गेट वे ऑफ इंडिया येथे शिवकालीन वस्तू आणि शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 9-30 ते सायंकाळी 7-30 वाजेपर्यंत नागरिकांना पाहता येणार आहे. या प्रदर्शनात तलवार, पट्टा, कट्यार, गुर्ज, भाला, खंजीर, चिलखत आदी चारशेहून अधिक शिवकालीन शस्त्रे नागरिकांना पाहता येणार आहेत. याशिवाय, प्रदर्शनाच्या ठिकाणी दररोज दिवसातून चार वेळा युद्ध कला सादरीकरण आणि शस्त्रांची माहिती देण्यात येणार आहे.
 
याचबरोबर, दिनांक 01 जून ते 07 जून या कालावधीत सायंकाळी 6-30 ते रात्री 9-30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध घटना “जाणता राजा” महानाट्याच्या माध्यमातून अनुभवता येणार आहेत. या महानाट्यासाठीच्या प्रवेशिका शहरातील प्रमुख नाट्यगृहात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
Edited by: Ratnadeep Ranshoor