शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (13:31 IST)

IND vs NZ: चेतेश्वर पुजारा बाद, पुन्हा एकदा लज्जास्पद विक्रमाची नोंद

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म कायम राहिला. पहिल्या डावात केवळ 26 धावा करणाऱ्या पुजाराला दुसऱ्या डावातही फारसे काही करता आले नाही आणि 22 धावा केल्यानंतर तो काईल जेमिसनचा बळी ठरला. ग्रीन पार्कच्या खेळपट्टीवर, जेमिसनचा उसळणारा चेंडू पुजाराच्या ग्लोव्हजला स्पर्श करून किवी यष्टिरक्षक टॉम ब्लंडेलच्या हातात गेला. मैदानावरील पंचांनी त्याला नॉट आऊट दिला, पण डीआरएस मिळाल्यानंतर पुजाराला परतावे लागले. या डावात बाद होताच पुजाराच्या नावावर लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला . तिसऱ्या क्रमांकावर शतक न झळकावता संयुक्त सर्वाधिक खेळी करण्याचा विक्रम आता पुजाराच्या नावावर झाला आहे. विशेष म्हणजे, पुजाराने 2019 पासून आतापर्यंत 39 डाव खेळले आहेत, ज्यामध्ये एकही शतक झळकावलेले नाही. त्याने या बाबतीत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांची बरोबरी केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना वाडेकर यांनी 1968 ते 1974 या काळात सलग 39 डावांमध्ये एकही शतक झळकावले नाही. याआधी पुजाराने 2013-16 मध्ये 37 डावात एकही शतक झळकावले नव्हते.
या सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम साऊदीने आपल्या स्विंगने भारतीय फलंदाजांना सर्वाधिक त्रास दिला. त्याला सहकारी वेगवान गोलंदाज जेमिसनची चांगली साथ मिळाली. फॉर्मात नसलेला कर्णधार अजिंक्य रहाणे हा डावखुरा फिरकीपटू एजाज पटेलच्या गोलंदाजीवर 15 चेंडूत चौकाराच्या मदतीने 4 धावा करून एलबीडब्ल्यू आऊट झाला. सलामीवीर मयंक अग्रवालने पहिल्या तासात न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना केला, परंतु साऊथीने त्यांना दुसऱ्या स्लिपमध्ये टॉम लॅथमच्या एका आऊटस्विंग चेंडूवर झेलबाद केले. याच षटकात रवींद्र जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट करून साऊदीने भारताला दुहेरी धक्का दिला. जडेजाला खातेही उघडता आले नाही.