सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (11:36 IST)

IndvsNew: न्यूझीलंड संघाकडून खेळणारे भारतीय वंशाचे खेळाडू तुम्हाला माहिती आहेत का?

- पराग फाटक
भारत आणि न्यूझीलंड. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर दोन देशांमधलं अंतर बरंच आहे. पण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने भारतातून न्यूझीलंडला स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
 
कामानिमित्ताने न्यूझीलंडमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांची दुसरी पिढी क्रिकेटच्या मैदानात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. आईवडील भारतीय, जन्म भारतातला परंतु संघ न्यूझीलंड असं अनोखेपण त्यांनी जपलं आहे.
 
न्यूझीलंडच्या भारतीय कनेक्शनचा घेतलेला आढावा.
 
दीपक पटेल
1992 विश्वचषकात सुरुवातीच्या षटकांमध्ये सलामीवीरांचं आक्रमण रोखण्यासाठी न्यूझीलंडने फिरकी गोलंदाजाला पाचारण केलं. हा प्रयोग क्रिकेटविश्वाला चकित करणारा होता. डावातली पहिली 10-15 षटकं वेगवान गोलंदाजांनी टाकायची असा अलिखित दंडक होता. न्यूझीलंडने तो मोडून काढला. तो फिरकीपटू होता दीपक पटेल.
 
दीपक भारतीय वंशाचे असले तरी त्यांचा जन्म केनियातल्या नैरोबी इथला. ते इंग्लंडमध्येही होते. चांगल्या संधीच्या शोधात न्यूझीलंडला आले. वेगवान गोलंदाजांचं आगार असलेल्या किवी संघाला फिरकीपटूची आवश्यकता होती. दीपक या भूमिकेत फिट बसले. 37 टेस्ट आणि 75 वनडे सामन्यांमध्ये दीपक यांनी न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं.
 
डावाच्या सुरुवातीला येऊन त्यांनी केलेली गोलंदाजी आजही युट्यूबवर आवर्जून पाहिली जाते. निवृत्तीनंतर दीपक युवा खेळाडूंना मार्गदर्शनाचं काम करतात.
 
जीतन पटेल
आईवडील भारतीय पण जीतनचा जन्म वेलिंग्टनचा. त्याचं मूळ गाव गुजरातमधल्या नवसारी इथे आहे.
 
डॅनियल व्हेटोरी न्यूझीलंडचं फिरकी आक्रमण सांभाळत असतानाच्या काळात जीतन आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर अवतरला. जीतनने 24 टेस्ट, 43 वनडे आणि 11 ट्वेन्टी20 सामन्यात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे.
 
इंग्लंडमधल्या काऊंटी क्रिकेटमध्ये वॉर्विकशायरसाठी खेळताना जीतनने दमदार कामगिरी केली आहे.
 
एझाझ पटेल
मुंबईकर 33 वर्षीय एझाझ न्यूझीलंडच्या फिरकी अस्त्रापैकी एक आहे. 9 टेस्ट, 7 ट्वेन्टी20 सामन्यात एझाझने न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. एझाझचा जन्म मुंबईचा पण आठव्या वर्षी आईवडिलांसह तो न्यूझीलंडला रवाना झाला.
 
वेगवान गोलंदाज म्हणून एझाझने खेळायला सुरुवात केली. प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार एझाझ फिरकी गोलंदाज झाला. न्यूझीलंडच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर एझाझला तीन वर्षांपूर्वी पदार्पणाची संधी मिळाली. पदार्पणाच्या कसोटीतच 7 विकेट्स घेत एझाझने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला.
 
न्यूझीलंडचा संघ मुंबईत कसोटी खेळणार आहे. जन्मभूमीत आणि बालपण जिथे गेलं त्या मुंबईत एझाझ न्यूझीलंडसाठी भारताविरुद्ध खेळणार आहे.
 
इश सोधी
नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी20 विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गजांना तंबूत धाडणारा फिरकीपटू तुम्हाला आठवतोय का? त्याचं नाव इश सोधी. पंजाबमध्ये जन्मलेला इश न्यूझीलंडच्या गेल्या काही वर्षातल्या वनडे आणि ट्वेन्टी20 प्रकारातील यशाचा मानकरी आहे.
इशच्या गोलंदाजीवर आक्रमण करता येईल या हेतूने फलंदाज खेळतात पण प्रत्यक्षात ते इशच्या चतुर फिरकीच्या जाळ्यात अडकतात. धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्या इश समर्थपणे सांभाळतो. प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरवणाऱ्या मोठ्या फलंदाजांना बाद करण्यात इश वाकबगार आहे. इशच्या आतापर्यंतच्या वाटचालीची कहाणी इथे वाचा.
 
जीत रावल
गुजरातमधील अहमदाबादचा जीत खरंतर भारतातल्या डोमस्टिक क्रिकेटमध्ये दिसायला हवा होता. गुजरातसाठी U15, U17 संघांसाठी तो खेळलाही. मध्यमगती गोलंदाज ते सलामीवीर फलंदाज असं त्याचं स्थित्यंतरही झालं.
 
16व्या वर्षी जीत कुटुंबीयांसह न्यूझीलंडला रवाना झाला. किट परेरा आणि नंतर दीपक पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जीत खेळू लागला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तावून सुलाखून निघाल्यानंतर जीतला 2016 मध्ये न्यूझीलंडसाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. 24 टेस्टमध्ये जीतने न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व करताना 1143 धावा केल्या आहेत. 2019 मध्ये जीतने हॅमिल्टन इथं बांगलादेशविरुद्ध पहिलं कसोटी शतक झळकावलं.
 
जीतचं लग्न अहमदाबादमध्येच झालं. त्याचे नातेवाईक गुजरातमध्ये आहेत.
 
तरुण नेथुला
आंध्र प्रदेशमधल्या कुरनूल इथे जन्मलेला तरुण नेथुला न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज झाला. हैदराबादमधल्या सेंट जॉन्स क्रिकेट अकादमीत तरुण प्रशिक्षणासाठी येत असे. 11व्या वर्षी घरच्यांबरोबर तो न्यूझीलंडला रवाना झाला. देश बदलला तरी तरुणने क्रिकेट सोडलं नाही.
 
तरुणने न्यूझीलंडसाठी 5 वनडे सामने खेळले आहेत. मैदानाव्यतिरिक्त तरुण माऊंट रॉसकिल ग्रामर स्कूलचा स्पोर्ट्स डिरेक्टर म्हणून काम पाहतो. मॅसे विद्यापीठातून त्याने इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे.
 
रॉनी हिरा
डावखुरा फिरकी गोलंदाजी करणारा रॉनी हिरा अफलातून क्षेत्ररक्षक आहे. गरज पडल्यास फलंदाजीही करतो. रॉनीचे आईवडील भारतीय आहेत मात्र त्याचा जन्म ऑकलंडचा.
 
रॉनीने 15 ट्वेन्टी20 सामन्यात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे.
 
राचीन रवींद्र
 
राचीनच्या नावात अनोखी गंमत पाहायला मिळतो. राचीनचे वडील रवी कृष्णमूर्ती हे क्रिकेट प्रशिक्षक. क्रिकेटचं त्यांना खूप वेड. राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर हे त्यांचे आवडते खेळाडू. म्हणूनच या दोन मोठ्या क्रिकेटपटूंच्या नावाचा संयोग करून त्यांनी मुलाचं नाव राचीन ठेवलं. राहुल मधला रा आणि सचिन मधला चिन मिळून राचीन झालं आहे.
 
भारताचे माजी खेळाडू आणि आता आयसीसी मॅचरेफरी जवागल श्रीनाथ राचीनच्या वडिलांचे मित्र. 90च्या दशकात रवी न्यूझीलंडला रवाना झाले. तिथे त्यांनी हट हॉक्स क्लबची स्थापनादेखील केली. वडिलांकडून मिळालेला क्रिकेटचा वारसा राचीनने जपला. न्यूझीलंडU19 संघासाठी खेळला.
 
गेली काही वर्ष सरावाचा भाग म्हणून आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर इथल्या रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट अकादमीत सरावाला येत आहे. त्यामुळे भारतीय खेळपट्यांवर खेळण्याची त्याला सवय आहे.
 
वेलिंग्टनमध्ये जन्मलेल्या 22वर्षीय राचीनने यंदाच न्यूझीलंडसाठी पदार्पण केलं आहे.
 
जुन्या काळात खेळलेले टेड बॅडकॉक आणि टॉम पुना यांची गोष्ट अनोखी आहे. 1897 मध्ये बॅडकॉक यांचा जन्म अबोटाबाद इथे म्हणजे तत्कालीन ब्रिटिशांच्या अंमलाखालील भारतात झाला. त्यांनी भारतात ब्रिटिश सैन्यासाठी कामही केलं. ते इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळले. त्यानंतर ते न्यूझीलंडला रवाना झाले. ते न्यूझीलंडसाठी 1930 ते 1933 या काळात 7 टेस्ट खेळले.
 
नरोत्तम उर्फ टॉम पूना यांचा जन्म गुजरातमधल्या सुरत इथे 1929 साली झाला. ते आठ वर्षांचे असताना कुटुंबीय न्यूझीलंडला स्थायिक झाले. 1966 मध्ये पूना यांनी 3 टेस्टमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं. फिरकीपटू पुना यांनी 4 विकेट्सही घेतल्या.