शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (08:45 IST)

IND vs SL:भारताचा श्रीलंकेवर सहा गडी राखून विजय

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत टीम इंडियाने क्लीन स्वीप केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा सामनाही जिंकला. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने सहा गडी राखून सामना जिंकला. 
 
भारताने पहिला सामना 62 धावांनी आणि दुसरा टी-20 सात विकेटने जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा सलग चौथा मालिका विजय आहे, ज्यामध्ये भारताने विरोधी संघाचा क्लीन स्वीप केला आहे. याआधी टीम इंडियाने न्यूझीलंडचा घरच्या टी-20 मालिकेत 3-0, वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत 3-0 आणि आता श्रीलंकेविरुद्ध 3-0 असा क्लीन स्वीप केला  आहे. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 5 गडी गमावून 146 धावा केल्या.147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा पाच धावा करून बाद झाला. यानंतर संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. सॅमसन 12 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. त्यानंतर श्रेयसने तिसऱ्या विकेटसाठी दीपक हुडासोबत 48 धावांची भागीदारी केली. हुड्डा 16 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. व्यंकटेश अय्यर चार चेंडूत पाच धावा काढून बाद झाला. दरम्यान, श्रेयसने टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले. या मालिकेतील त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. श्रेयसने रवींद्र जडेजाच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला.

भारताने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सलग 12 वा विजय नोंदवला आहे. यासह भारताने अफगाणिस्तानच्या सलग सर्वाधिक टी-20 विजयाच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.भारताने घरच्या भूमीवर टी-20 प्रकारात सलग सातवी मालिका जिंकली आहे.