शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (18:38 IST)

IndvsPak : भारत वि. पाकिस्तान : शेवटच्या षटकात फिरला सामना, विराटची धडाकेबाज खेळी

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत पाकिस्तान सामना अपेक्षितपणे रंगतदार बनला.पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत 159 धावांचं आव्हान भारतासमोर ठेवलं होतं. हे आव्हान भारताला सहज पार करणं शक्य असतानाही, शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगतदार बनला. मात्र, अखेरीस भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला.
 
विराट कोहलीने 82 धावांची धडाकेबाज खेळी केली,तर त्याला हार्दिक पंड्यानं 40 धावा करत संयमी साथ दिली.
 
शेवटच्या षटकात दिनेश कार्तिक बाद झाल्यानंतर आर. अश्विन मैदानात आला आणि त्यानं विजयी फटका मारत भारताच्या विजयाची नोंद केली.
 
त्यापूर्वी भारताच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादण उडाल्याचे चित्र दिसून आलं होतं. 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स देत 159 धावांपर्यंत पाकिस्तानला पोहोचता आलं होतं.
 
भारत आणि पाकिस्तान संघात कोण कोण खेळाडू होते?
 
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.
 
राखीव- हर्षल पटेल, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, दीपक हुडा
 
पाकिस्तान संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शान मसूद, मोहम्मद नवाज. हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, नसीम शाह, हारिस रौफ, शाहीन आफ्रिदी.
 
राखीव- खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद वसीम ज्युनियर, फखर जमान.
 
दरम्यान दिवसभरात मध्येच पावसाचं आगमन होऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. एका क्षणी हा सामना वॉशआऊट होणार अशी चिन्हं होती. मात्र नंतर सूर्याचे आगमन झाल्याने चिंता मिटली.
पण मेलबर्नमध्ये शुक्रवारी रात्रीपासूनच थोड्या-थोड्या विश्रांतीने पाऊस होत आहे. शनिवारी सकाळीही हेच चित्र दिसून आलं होतं.
 
पावसाच्या हलक्या सरी सुरू असतानाच दोन्ही संघांनी आपला सराव केला.
 
सध्या येथील वातावरण ढगाळ असून तापमान 19 अंश सेल्सियसच्या आसपास आहे.
 
दोन्ही संघ मजबूत
टी-20 क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये भारतीय संघ सध्या पहिल्या स्थानावर आहे. पण महत्त्वाच्या सामन्यात आपली कामगिरी उंचावण्यात भारतीय संघाला गेल्या काही वर्षांत अपयश आल्याचं दिसून येतं.
 
त्यामुळे कागदोपत्री पाहता संघ मजबूत दिसत असला तरी प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती आणि झालंही तसंच.
 
भारताचे दोन नियमित खेळाडू रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत संघाचा भाग नसतील. पण बुमराह बाहेर झाल्याने त्याच्याऐवजी मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्यात आला आहे. शमीच्या अनुभवाचा संघाला कसा फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
यंदाच्या वर्षी भारताने एकूण 32 टी-20 सामने खेळले. त्यापैकी 23 सामन्यात भारताला विजय मिळाला तर 8 सामन्यात संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
 
ट्वेन्टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान सहा वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 5मध्ये भारताने विजय मिळवला आहे तर गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
 
दुसरीकडे पाकिस्तानचा विचार केल्यास बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ मजबूत दिसून येतो. गेल्या तीन वर्षांत त्याच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाची जय-पराजयाची आकडेवारी 36-18 अशी आहे.
 
ऑस्ट्रेलियाच्या भूमिवर दोन्ही संघ गेल्या वेळी 2015 मध्ये आमनेसामने आले होते. त्यावेळी अॅडलेडच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला होता.
 
त्यावेळी विराट कोहलीच्या 107 धावांच्या बळावर भारताने 300 धावांचा डोंगर उभा केला. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान 76 धावांनी मागे राहिला होता.
 
टी-20 ची आकडेवारी पाहिल्यास यंदाच्या वर्षी भारत-पाकिस्तान संघ दोनवेळा आमनेसामने आले होते. गेल्या महिन्यात झालेल्या आशिया कप स्पर्धेतील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभवाचा झटका दिला होता.

Published By - Priya Dixit