मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 21 जानेवारी 2020 (16:38 IST)

भारताने कांगारूंविरुध्दची स्वाभिानाची लढाई जिंकली : शोएब अख्तर

भारताने ऑस्ट्रेलिाविरुध्दची मालिका 2-1 ने जिंकली. या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाची चांगलीच धुलाई केली आणि स्वाभिमानाची लढाई जिंकली, असे मत पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने व्यक्त केले. 
 
विराट कोहली हा अप्रतिम कर्णधार आहे. तो मानसिकदृष्ट्या अतिशय कणखर आहे. पुनरागमन कसे करावे हे त्याला नेमके माहिती आहे. टीम इंडियाचे खेळाडूदेखील त्यात पारंगत आहेत. धक्कादायक पराभवानंतर ते कधीही धीर सोडत नाहीत. तुमच्या संघात जेव्हा रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर  आणि लोकेश राहुल यासारखे खेळाडू असतील आणि तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला बंगळुरूच्या मैदानावर 300 पेक्षा कमी धावांवर बाद केलेत, तर तुम्ही नक्कीच सामना जिंकणार आहात ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ही मालिका म्हणजे स्वाभिमानाची लढाई होती. त्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ठेचले, असे अख्तर म्हणाला.
 
सध्याचा संघ ही नवी टीम इंडिया आहे. आम्ही ज्या संघाविरुद्ध खेळलो, तो संघ वेगळा होता. सध्याचा  संघ अधिक आक्रमक आहे. पहिल्या सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतरही मालिका सहजतेने जिंकणे हे खूप कठीण असते. बंगळुरूच्या मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाला चांगलेच कुटून काढले. लहान मुलांशी खेळल्यासारखा हा सामना झाल्याचे दिसून आले, असे निरीक्षण अख्तरने नोंदविले.
 
जेव्हा रोहित शर्मा चांगल्या लयीत असतो, तेव्हा त्याच्यासाठी कोणताही चेंडू सोपा किंवा अवघड नसतो. बंगळुरूसारख्या खेळपट्टीवर तो आक्रमक खेळ करतो. एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा संघ जगात अव्वल होता, त्यावेळी ते क्रिकेटवर सत्ता गाजवत होते. आता भारतही तेच करतो आहे, असे अख्तरने नमूद केले.