सामन्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने भारतीय खेळाडूचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन
क्रिकेटच्या मैदानावरून एक दुःखद बातमी समोर आली, जेव्हा भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळलेला माजी वेगवान गोलंदाज एस. एल. अक्षय याचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले. रविवारी, एस. एल. अक्षय केएससीए (KSCA) तिसऱ्या विभागाच्या सामन्यात सफायर सीसी (Sapphire CC) संघाकडून खेळत होता.
चार षटके गोलंदाजी केल्यानंतर त्याला थोडे अस्वस्थ वाटू लागले आणि तो तात्काळ ड्रेसिंग रूममध्ये गेला, जिथून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी एस. एल. अक्षयला मृत घोषित केले.
एस. एल. अक्षय यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीनंतर, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, अक्षयने आपल्या खेळाडू कारकिर्दीत प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये कर्नाटकसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. निवृत्तीनंतर, एस. एल. अक्षयने प्रशिक्षक म्हणून क्रिकेटची आवड जपली आणि कनिष्ठ स्तरावरील तरुण खेळाडूंच्या प्रतिभेला वाव देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
भारताचा माजी खेळाडू डोड्डा गणेश यानेही एसएल अक्षयच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्याने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे, "क्रिकेट जगतासाठी ही अत्यंत दुःखद बातमी आहे. ३९ वर्षीय वेगवान गोलंदाज एसएल अक्षय, ज्याला मी माझ्या १९ वर्षांखालील क्रिकेटच्या दिवसांपासून जवळून पाहत होतो, त्याचे आज एक डिव्हिजन सामना खेळताना निधन झाले. माझे दुःख व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. अक्षयच्या आत्म्यास शांती लाभो."
एसएल अक्षयच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ६ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये १८ बळी घेतले. त्याने ६ लिस्ट ए सामन्यांमध्येही ६ बळी घेतले, तर एसएल अक्षयने ९ टी२० सामन्यांमध्ये एकूण ८ बळी घेतले. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, एसएल अक्षयने कर्नाटकच्या १९ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
Edited By - Priya Dixit