संपूर्ण हंगामात धावांच्या राशी ओतत ऋतुराज गायकवाडने आयपीएलच्या 14व्या हंगामात सर्वाधिक धावांसाठीच्या ऑरेंज कॅपवर नाव कोरलं.
ऋतुराजने 16 सामन्यात 635 धावा करत ऑरेंज कॅपचा मान पटकावला. अंतिम लढतीत फॅफ डू प्लेसिसने 86 धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर 2 धावा करत ऋतुराजला मागे टाकण्याची संधी डू प्लेसिसकडे होती. मात्र तो बाद झाला आणि ऋतुराज ऑरेंज कॅपचा मानकरी असेल यावर शिक्कामोर्तब झालं.महेंद्रसिंग धोनीचा विश्वासू शिलेदार झालेल्या ऋतुराज गायकवाडच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा.
रणजी ट्रॉफीचा तो सामना ऋतुराजच्या चांगलाच लक्षात आहे. 2015-16 रणजी हंगामात महाराष्ट्राची झारखंडविरुद्ध दिल्ली इथे मॅच होती. झारखंड संघाचा मेन्टॉर म्हणून दस्तुरखुद्द महेंद्रसिंग धोनी होता.
धोनीसमोर चांगलं खेळण्याचा ऋतुराजचा इरादा होता. मात्र या प्रयत्नात झारखंडच्या वरुण आरोनचा उसळता चेंडू ऋतुराजच्या बोटावर जाऊन आदळला. महाराष्ट्राचा अनुभवी खेळाडू केदार जाधवने ऋतुराजला खेळता येतंय का बघ, असं सांगितलं. ऋतुराजने दुखऱ्या बोटासह बॅटिंग करायचा प्रयत्न केला. मात्र थोड्या वेळानंतर दुखणं वाढलं. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज बाद झाला. त्यानंतर जे घडलं ते ऋतुराज विसरू शकणार नाही.लंचवेळी महेंद्रसिंग धोनीने ऋतुराजच्या दुखापती विषयी विचारायला आला. धोनीने ऋतुराजच्या बॅटवर ऑटोग्राफ दिला आणि त्याच्या बोटाला लावण्यात आलेल्या प्लॅस्टरवर 'गेट वेल सून' संदेश लिहिला.
2019मध्ये चेन्नईने 20 लाख रुपये या बेस प्राईजला ऋतुराजला ताफ्यात समाविष्ट केलं. महेंद्रसिंग धोनीची भेट झाल्यानंतर ऋतुराजने त्या भेटीविषयी विचारलं- त्यावर धोनी म्हणाला, "मला अगदी स्पष्ट आठवतंय. तू प्रतिभावान खेळाडू आहेस, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावा करत राहा".भारतीय क्रिकेटच्या आधुनिक शिलेदारांपैकी एक अशा महेंद्रसिंग धोनीने लक्षात ठेवलेला ऋतुराज आता जगभरातल्या क्रिकेटरसिकांच्या पसंतीचा होऊ लागला आहे.
सरळ बॅटने फटके खेळण्याची शैली, पारंपरिक वाटेल अशा पद्धतीने इनिंग्जची बांधणी, हवेत चेंडू मारण्याऐवजी खणखणीत ग्राऊंडस्ट्रोक, भागीदाऱ्या करण्याची हातोटी, चपळ क्षेत्ररक्षक, यश साजरा करतानाही शांत असं सेलिब्रेशन यामुळे ऋतुराज आता क्रिकेटरसिकांचा आवडता होऊ लागला आहे.
रविवारी (19 सप्टेंबर) आयपीएलच्या 14व्या हंगामाचा उर्वरित टप्पा सुरू झाला. पहिल्या लढतीत चेन्नई आणि मुंबई एकमेकांसमोर उभे ठाकले होते. एल क्लासिको असं वर्णन होणाऱ्या या लढतीत मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर चेन्नईची अवस्था 7 बाद 3 अशी होती.
अनुभवी अंबाती रायुडू दुखापतग्रस्त झाल्याने काळजीत भर पडली होती. अशा परिस्थितीतून ऋतुराजने संपूर्ण 20 षटकं फलंदाजी करत नाबाद 88 धावांची सुरेख खेळी केली. ऋतुराजच्या या खेळीच्या बळावर चेन्नईने 156 धावांची मजल मारली.
चेन्नईच्या गोलंदाजांनी ऋतुराजची ही मौल्यवान खेळी वाया जाऊ दिली नाही. मुंबईला 136 धावातच रोखत चेन्नईने 20 धावांनी शानदार विजय मिळवला. ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
ऋतुराज कुठे घडला?
ऋतुराजचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे हे आहे. पण ऋतुराज पुण्यात राहतो. थेरगावच्या व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीचा ऋतुराज विद्यार्थी आहे.मार्च महिन्यात चेन्नईत आयोजित कॅम्पमध्ये ऋतुराजच्या खेळाने धोनीला प्रभावित केलं होतं. महाराष्ट्रासाठी सातत्याने धावांच्या राशी ओतणारा बॅट्समन अशी ऋतुराजची ओळख आहे. 2018-19 सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक रन्स ऋतुराजच्या नावावर होत्या.इंडिया 'ए' साठी खेळतानाही वेस्ट इंडिज ए विरुद्ध ऋतुराजने चार मॅचेसमध्ये 207 रन्स केल्या होत्या. श्रीलंका ए संघाविरुद्धच्या मालिकेतही 470 रन्स केल्या होत्या.
2019 मध्ये इंडिया ए साठी खेळताना ऋतुराजने श्रीलंका ए आणि वेस्ट इंडिज ए विरुद्ध खेळताना 187*, 125*, 94, 84, 74, 3, 85, 20, 99 अशा खेळी केल्या.विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 7 मॅचेसमध्ये 63.42च्या सरासरीने 444 रन्स केल्या होत्या.
चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात
2019 हंगामात कोरोनामुळे आयपीएलचा हंगाम युएईत खेळवण्यात आला. युएईत दाखल झाल्यानंतर चेन्नई कॅम्पपैकी चौदाजणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये ऋतुराजचा समावेश होता. ऋतुराजच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा निकालही पॉझिटिव्ह असल्याने तो प्रदीर्घ काळ खेळू शकला नाही.कोव्हिड पॉझिटिव्ह झाल्यानंतर ऋतुराजला क्वारंटीन राहावं लागलं. मात्र संघातील प्रत्येकाने सकारात्मक राहायला मदत केली असं ऋतुराजने सांगितलं होतं.
पदार्पण आणि तीन अर्धशतकं
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने 22 सप्टेंबरला मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला पदार्पणाची संधी दिली होती. मात्र त्यानंतर चेन्नईचे ग्रह फिरले आणि ते पराभवाच्या गर्तेत सापडले.तरुणांनी चमक दाखवली नाही असं महेंद्रसिंग धोनी काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. ऋतुराजने अर्धशतकी खेळी करत तो चेन्नईच्या भविष्यातील योजनांचा भाग असू शकतो याचे संकेत दिले.
0, 5, 0 अशी खराब सुरुवात झालेल्या ऋतुराजवर टीकाही झाली होती. मात्र सलग तीन मॅचमध्ये अर्धशतकी खेळी करत ऋतुराजने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.2020 हंगामात ऋतुराजने 6 सामन्यात 51च्या सरासरीने 204 धावा केल्या.
भारतासाठी पदार्पण
प्रमुख खेळाडूंचा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना पर्यायी भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता.ऋतुराजचा या भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. 28 जुलै रोजी श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 लढतीत ऋतुराजला भारतीय संघाची कॅप देण्यात आली.ऋतुराजने पदार्पणाच्या लढतीत 21 तर दुसऱ्या सामन्यात 14 धावांची खेळी केली.
'बोलत नाही त्यामुळे होते अडचण'
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 2020 हंगामावेळी ऋतुराजबद्दल भाष्य केलं होतं. "ऋतुराजला आम्ही नेट्समध्ये खेळताना पाहिलं. मात्र त्यानंतर त्याला कोव्हिड झाला. 20 दिवस त्याला क्वारंटाईन व्हावं लागलं. हे खूपच दुर्देवी होतं. उर्वरित सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली. त्याच्यासाठी हा हंगाम संस्मरणीय असेल."ऋतुराज अतिशय प्रतिभावान अशा खेळाडूंपैकी एक आहे. परंतु तो मितभाषी आहे. त्यामुळे त्याला समजून घेणं काही वेळेस संघव्यवस्थापनाला अवघड होतं. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर तो किती सर्वांगीण खेळू शकतो हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे."
अफेअरची चर्चा
ऋतुराज आणि अभिनेत्री सायली संजीव यांचं अफेअर असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या होत्या.इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या पोस्टवर लाल बदामांसह कमेंटनंतर या दोघांची जोडी जमल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली होती.
दोघांनाही याबाबत काहीही भाष्य केलं नाही मात्र ऋतुराजने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून उत्तर दिलं होतं.ऋतुराजने लिहिलं होतं, "केवळ गोलंदाजच माझी विकेट घेऊ शकतात, क्लिन बोल्डही करू शकतात. बाकी कोणी नाही. ज्याला जे समजायचं त्यांना ते समजतं".
ऋतुराजची हंगामातली कामगिरी
5 विरुद्ध चेन्नई- मुंबई
5 विरुद्ध पंजाब- मुंबई
10 विरुद्ध राजस्थान- मुंबई
64-विरुद्ध कोलकाता- मुंबई
33 विरुद्ध बेंगळुरू- मुंबई
75 विरुद्ध हैदराबाद- दिल्ली
4 विरुद्ध मुंबई- दिल्ली
88 विरुद्ध मुंबई- दुबई
38- विरुद्ध बेंगळुरू- शारजा
40- विरुद्ध कोलकाता- अबू धाबी
45 विरुद्ध हैदराबाद- शारजा
101* विरुद्ध राजस्थान- अबू धाबी
12 विरुद्ध पंजाब- दुबई
70 विरुद्ध दिल्ली- दुबई (क्वालिफायर 1)
32 विरुद्ध कोलकाता दुबई (फायनल)
16 सामने
635 धावा
1 शतक
4 अर्धशतकं
45.35 सरासरी
136.26 स्ट्राईक रेट