शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (19:32 IST)

IPL Auction 2022: इशान किशनसाठी मुंबई इंडियन्सकडून 15 कोटी 25 लाखांची बोली

धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याच्याकरिता मुंबई इंडियन्सने 15 कोटी 25 लाखांची बोली लावली आहे. आजच्या दिवसातील आतापर्यंतचा तो सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे.
 
पूर्वीही मुंबईच्या संघात समाविष्ट असलेल्या इशान किशनला मुंबईने रिटेन न केल्याने त्याच्या नावाचा समावेश लिलावात करण्यात आला होता.
 
त्याला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी अनेक संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर मुंबईने किशनला पुन्हा आपल्या संघात सहभागी करून घेतलं.
 
लिलावकर्ते हग एडमिडेस खाली कोसळले
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी खेळाडूंचा महालिलाव बेंगळुरूत सुरू असतानाच लिलाव आयोजिक करणारे हग एडमिडेस अचानक खाली कोसळले.
 
श्रीलंकेच्या वानिंदू हासारंगासाठी बोलीची प्रक्रिया सुरू असताना एडमिडेस खाली कोसळले. अचानक घडलेल्या या प्रकाराने हॉलमध्ये खळबळ उडाली. वैद्यकीय टीम तात्काळ मदतीसाठी सरसावली.
 
लिलाव स्टार स्पोर्ट्स वाहिन्या आणि हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित होत असल्याने जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांमध्ये ही घटना पाहून खळबळ उडाली. सोशल मीडियावर एडमिडेस यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
 
2018 मध्ये एडमिडेस यांची आयपीएल लिलावासाठी बीसीसीआयने नियुक्ती केली. 36 वर्षांच्या कारकीर्दीत एडमिडेस यांनी जगभरात विविध स्वरुपाचे 2500 अधिक लिलावांचं यशस्वीपणे नेतृत्व केलं आहे.
दरम्यान, त्यांची प्रकृती आता बरी असल्याचं आयोजकांकडून कळवण्यात आलं आहे. बराच वेळ एकाच प्रकारच्या शारिरीक अवस्थेत राहिल्यामुळे शरीराचा रक्तदाब अचानक कमी होतो. हीच समस्या एडमिडेस यांना जाणवली. त्यामुळेच ते अचानक खाली कोसळले. मात्र आता त्यांची तब्येत ठीक आहे, असं आयोजकांनी सांगितलं आहे.
 
मात्र, सध्या तरी एडमिडेस यांना विश्रांतीची सूचना देण्यात आली असून यापुढील लिलाव प्रक्रिया चारू शर्मा यांच्याकडून पार पडली जाईल, असंही आयोजकांनी स्पष्ट केलं आहे.
 
श्रेयस अय्यरसाठी कोलकात्याकडून 12.25 कोटी रुपयांची बोली
कोलकाता नाईट रायडर्स संघाने श्रेयस अय्यरसाठी 12.25 कोटी रुपयांची बोली लावत ताफ्यात घेतलं. कोलकाताला कर्णधाराची आवश्यकता होती.
'गब्बर' नावाने प्रसिद्ध शिखर धवनला पंजाब किंग्ज संघाने 8 कोटी 25 लाख रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं.
 
अनेक वर्षानंतर डेव्हिड वॉर्नरचं दिल्ली संघात पुनरागमन झालं आहे. दिल्लीने 6.25 कोटी रुपये देत वॉर्नरला विकत घेतलं.
 
चेन्नईची साथ सोडून फाफ डू प्लेसिस आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळणार आहे. बेंगळुरूने डू प्लेसिससाठी 7 कोटी रुपये मोजले.
 
नवीन संघ लखनौ सुपरजायंट्सने क्विंटन डी कॉकसाठी 6.75 कोटी रुपये खर्चत बोहनी केली.
 
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला गुजरात टायटन्स संघाने 6.25 कोटींची बोली लावून विकत घेतलं.
अनुभवी फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनला 5 कोटी रुपये खर्चून राजस्थान रॉयल्सने संघात घेतलं.
 
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्सने 7.25 कोटी रुपये खर्चून पुन्हा ताफ्यात समाविष्ट केलं. कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धची अॅशेस मालिका जिंकली होती.
 
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला पंजाब किंग्जने 9.25 कोटी रुपये देऊन संघात घेतलं.
 
राजस्थान रॉयल्सने 8 कोटी रुपयांची बोली लावत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला संघात सामील केलं.
 
मनीष पांडेसाठी लखनौने 4.6 कोटी रुपये मोजले. शिमोरन हेटमायरसाठी प्रचंड चुरस पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्सने हेटमायरला 8.5 कोटी रुपये देऊन घेतलं.
 
जेसन रॉयला गुजरात टायटन्सने 2 कोटी रुपयांनाच विकत घेतलं.
 
देवदत्त पड्डीकलसाठी राजस्थानने 7.75 कोटी रुपये खर्चत संघात समाविष्ट केलं.
 
प्रत्येक संघाला संघबांधणीसाठी 90 कोटी रुपये आहेत. प्रत्येक संघाला कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 खेळाडू घेता येतील.
 
चेन्नई सुपर किंग्स (48), दिल्ली (47.5), कोलकाता (48). मुंबई (48), पंजाब किंग्ज (72), राजस्थान रॉयल्स (62), रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (57), सनराझझर्स हैदराबाद (68) सर्व आकडे कोटींमध्ये आहेत.
यंदाच्या हंगामापासून संघांची संख्या 8 वरून 10 झाली आहे. लखनौ आणि अहमदाबाद या संघांची भर पडली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन खेळाडू निवडले आहेत.
 
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार लिलावासाठी 1,214 खेळाडूंनी नोंदणी केली होती. चाळणी प्रक्रियेनंतर अंतिम लिलावात 600 खेळाडू असणार आहेत. 370 भारतीय तर 220 विदेशी खेळाडूंची नावं लिलावात आहेत.
 
48 खेळाडूंनी स्वत:ची बेस प्राईज 2 कोटी निश्चित केली आहे. 20 खेळाडूंची बेस प्राईज 1.5 कोटी तर 34 खेळाडूंनी 1 कोटी बेस प्राईज ठेवली आहे.
 
दक्षिण आफ्रिकेचा 42 वर्षीय फिरकीपटू इम्रान ताहीर लिलावातील सगळ्यात मोठ्या वयाचा खेळाडू असणार आहे. अफगाणिस्तानचा नूर अहमद हा 17 वर्षीय खेळाडू लिलावातला सगळ्यात लहान वयाचा खेळाडू असणार आहे.
 
IPLमधले नवे संघ
 
चेन्नई सुपर किंग्स
महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मोईन अली, रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्राव्हो.
 
पंजाब किंग्ज
मयांक अगरवाल, अर्शदीप सिंग, शिखर धवन, कागिसो रबाडा,
 
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कायरेन पोलार्ड, जसप्रीत बुमराह
 
कोलकाता नाईट रायडर्स
वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर
 
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस
 
राजस्थान रॉयल्स
जोस बटलर, संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमोरन हेटमायर, देवदत्त पड्डीकल
 
दिल्ली कॅपिटल्स
ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, अँनरिक नॉर्किया, डेव्हिड वॉर्नर.
 
लखनौ सुपरजायंट्स
के.एल.राहुल, रवी बिश्नोई, मार्कस स्टॉइनस, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे
 
गुजरात टायटन्स
हार्दिक पंड्या, रशीद खान, शुबमन गिल, मोहम्मद शमी