सोमवार, 14 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (16:18 IST)

आयपीएलची मक्तेदारी भारतीय संघाला भोवतेय का?

ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकपमध्ये दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतीय संघाने दिलेलं 169 रन्सचं आव्हान इंग्लंडने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली. रविवारी मेलबर्न इथे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात अंतिम मुकाबला रंगणार आहे.
 
सेमी फायनलमधल्या मानहानीकारक पराभवाने भारतीय खेळाडूचं जगभरातील अन्य ट्वेन्टी20लीग मध्ये न खेळणं चर्चेत आलं आहे. बीसीसीआयतर्फे दरवर्षी इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धा डोमेस्टिक असली तरी त्यात भारतीय खेळाडूंच्या बरोबरीने जगभरातील अव्वल खेळाडू सहभागी होतात. खेळायला व्यासपीठ आणि अवघ्या दोन महिन्यात वर्षभराची पुंजी कमावण्याची संधी यामुळे जगभरातल्या खेळाडूंसाठी आयपीएलमध्ये खेळणं प्राधान्य झालं आहे.
 
अनेक देशातील क्रिकेट बोर्ड त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळायला मिळावं यासाठी त्यांच्या संघाच्या मालिका त्याआधी किंवा नंतर आयोजित करतात. आयपीएलमध्ये म्हणजे भारतात खेळण्याचा अनुभव विदेशी खेळाडूंना त्यांच्या राष्ट्रीय संघासाठी खेळताना कामी येतो. पण भारतीय खेळाडूंच्या नशिबी मात्र अनुभव नाही कारण बीसीसीआयच्या निर्णयामुळे भारतीय पुरुष खेळाडूंना विदेशातल्या कोणत्याही लीगमध्ये खेळता येत नाही. खेळातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारतीय पुरुष खेळाडू जगभरातल्या कोणत्याही लीगमध्ये खेळाडू शकतात.
 
आयपीएलच्या धर्तीवर ऑस्ट्रेलियात बिग बॅश स्पर्धा खेळवण्यात येते. 2011-12 वर्षापासून ही स्पर्धा होते आहे. भारतवगळता अन्य देशातले मोठे खेळाडू या स्पर्धेत नियमितपणे खेळतात. यानिमित्ताने त्यांना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव मिळतो. ऑस्ट्रेलियातल्या मैदानांचा आकार मोठा आहे. खेळपट्टीचं स्वरुपही वेगळं आहे. काही ठिकाणी ड्रॉपइन पिचेसही असतात. त्यादृष्टीने ऑस्ट्रेलियात खेळायला मिळणं हा अनुभव राष्ट्रीय संघासाठी खेळताना कामी येतो. ते कसं हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. भारताविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंड अॅलेक्स हेल्सने 86 रन्सची खेळी करत इंग्लंडला दिमाखदार विजय मिळवून दिला. हेल्स इंग्लंडचा आहे पण बिग बॅशच्या निमित्ताने तो सातत्याने ऑस्ट्रेलियात येतो, खेळतो.
 
हेल्स 2012-23 मध्ये मेलबर्न रेनेगेड्स संघासाठी खेळला. पुढच्या वर्षी अॅडलेड स्ट्रायकर्स संघाने त्याला संघात समाविष्ट केलं. अॅडलेडच्या मैदानावरच सेमी फायनलचा मुकाबला झाला. त्या मैदानावर हेल्स याआधी अनेकदा खेळला आहे. पुढच्या वर्षी तो होबार्ट हरिकेन्स संघाचा भाग झाला. 2019-20 मध्ये सिडनी थंडरने हेल्सची उपयुक्तता जाणली आणि त्याला संघात समाविष्ट केलं.
 
याचाच अर्थ मेलबर्न, अॅडलेड, होबार्ट आणि सिडनी इथल्या तसंच ऑस्ट्रेलियातल्या अन्य मैदानांवर कशी बॅटिंग करायची, बॅटिंग करताना कोणते फटके टाळायचे याचा हेल्सचा अभ्यास आधीच झालेला होता. हेल्सने बिग बॅश स्पर्धेचे 60 सामने खेळले असून त्याच्या नावावर 1857 रन्स आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 151.34 असा उत्तम आहे.असा अनुभव भारतीय खेळाडूंकडे नाही. भारतीय खेळाडू केवळ भारतीय संघाचा दौरा असतानाच ऑस्ट्रेलियात खेळू शकतात. पाकिस्तानच्या संघातील हॅरिस रौफ आणि शदाब खान नियमितपणे बिग बॅश स्पर्धेत खेळतात. त्यामुळे त्यांनाही ऑस्ट्रेलियातल्या मैदानांची, परिस्थितीची कल्पना आहे. त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलियात खेळणं नवीन नाही.
 
अफगाणिस्तानचा रशीद खान नियमितपणे बिग बॅश स्पर्धेत खेळतो. रशीदचा ऑस्ट्रेलियात चाहता वर्गही आहे. बिग बिश स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या बॉलर्सच्या यादीत रशीद सातव्या स्थानी आहे. रशीदने 61 सामन्यात 92 विकेट्स घेतल्या आहेत.बिग बॅश स्पर्धेत सध्या 8 संघ आहेत.
 
अॅडलेड स्ट्रायकर्स, ब्रिस्बेन हिट, होबार्ट हरिकेन, मेलबर्न रेनेगेड्स, मेलबर्न स्टार्स, पर्थ स्क्रॉचर्स, सिडनी सिक्सर्स, सिडनी थंडर हे आठ संघ आहेत.  ऑस्ट्रेलियात स्पर्धा असल्याने बिग बॅश स्पर्धेतला अनुभवाची चर्चा आहे पण जगभरात असंख्य ट्वेन्टी20 लीग सुरू झाल्या आहेत पण बीसीसीआयच्या धोरणामुळे भारतीय पुरुष खेळाडू कुठल्याही लीगमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.
 
इंग्लंडमध्ये होणारी ट्वेन्टी-20 ब्लास्ट, हंड्रेड, बांगलादेश प्रीमिअर लीग, पाकिस्तान सुपर लीग, न्यूझीलंडमध्ये होणारी सुपर स्मॅश, श्रींलका प्रीमिअर लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग या कोणत्याही लीगमध्ये भारतीय खेळाडू नाहीत. काही महिन्यातच दक्षिण आफ्रिका आणि युएईत ट्वेन्टी20 लीग सुरू होणार आहेत पण त्यात भारतीय खेळाडू नसतील.

द्रविड यांनीही मांडला हाच मुद्दा
भारतीय खेळाडू सेमीफायनलच्या लढतीत निष्प्रभ का ठरले यासंदर्भात भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, भारतीय खेळाडू आयपीएलव्यतिरिक्त जगभरात सुरू असलेल्या ट्वेन्टी20 लीगमध्ये खेळत नाहीत. अॅलेक्स हेल्स, पाकिस्तानचा हॅरिस रौफ बिग बॅश स्पर्धेत खेळतात. परदेशातील लीगमध्ये खेळल्यामुळे भारतीय खेळाडूंना फायदा मिळेल. याबाबतचा निर्णय बीसीसीआयला घ्यायचा आहे. भारतीय खेळाडूंना बिग बॅश स्पर्धेत खेळणं शक्य होत नाही कारण तेव्हा भारतात देशांतर्गत स्पर्धा सुरू असतात. भारतीय खेळाडू परदेशातील लीगच खेळू लागले तर देशांतर्गत क्रिकेट संपुष्टात येईल. रणजी स्पर्धा धोक्यात येईल, त्याचा अर्थ टेस्ट क्रिकेटही धोक्यात येईल. आपल्याला बीसीसीआयच्या निर्णयामागची भूमिका काळजीपूर्वक समजून घ्यावी लागेल. वेस्ट इंडिजमधल्या क्रिकेटचं काय झालं हे आपण पाहतो आहे. भारतीय क्रिकेटचं तसं व्हावं असं मला वाटत नाही.  
 
महिला खेळाडूंना मुभा
भारतीय पुरुष खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी नसली तरी भारतीय महिला खेळाडू मात्र बिग बॅश स्पर्धेत नियमितपणे खेळतात. हरमनप्रीत कौर, स्मृती मन्धाना, पूजा वस्राकार, पूनम यादव, वेदा कृष्णमूर्ती, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, राधा यादव, दीप्ती शर्मा या सगळ्याजणी महिला बिग बॅश स्पर्धेत खेळतात. यानिमित्ताने त्यांना ऑस्ट्रेलियात खेळता येतं आणि पैसाही मिळतो. हा अनुभव नंतर कामी येतो.  
 
Published By- Priya Dixit