शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 12 मार्च 2022 (16:09 IST)

झुलन गोस्वामीने रचला इतिहास, विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली

भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने वेस्ट इंडिजविरुद्ध इतिहास रचला आहे. आयसीसी महिला विश्वचषकातील 10व्या सामन्यात तिने ही कामगिरी केली आहे. अनिसा मोहम्मदची विकेट घेत ती महिला विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज बनली आहे. अनिसा मोहम्मदच्या रूपाने तिने वर्ल्ड कपमध्ये 40 विकेट घेतल्या. चकदा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाची माजी खेळाडू लिन फुलस्टनला मागे टाकत हा विक्रम केला होता. या खेळाडूने 1982 ते 1988 दरम्यान वर्ल्ड कपमध्ये एकूण 39 विकेट घेतल्या होत्या.
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यस्तिका भाटिया आणि स्मृती मंधाना  यांनी टीम इंडियाला वेगवान सुरुवात करून दिली. यस्तिकाची विकेट पडल्यानंतर फलंदाजीला आलेली मिताली राज 5आणि दीप्ती शर्मा 15 धावा करून स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतल्या. एक वेळ अशी होती की भारताने चांगली सुरुवात करूनही 78 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या.
 
त्यावेळी फलंदाजीला आलेल्या हरमनप्रीत कौरने मंधानाच्या साथीने टीम इंडियाला तर सांभाळलेच पण तिला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. मंधाना आणि हरमनप्रीतच्या या अप्रतिम भागीदारीमुळे भारताला पहिल्यांदाच विश्वचषकात 300 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले आहे. हरमनप्रीत कौरचे विश्वचषकातील हे तिसरे शतक असून अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे, तर मंधानाचे विश्वचषकातील हे दुसरे शतक आहे.वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या 40.3 षटकांत 162 धावांत गुंडाळला गेला. डॉटिन बाद झाल्यानंतर संपूर्ण संघाला 62 धावांची भर घालता आली. विंडीजचा हा स्पर्धेतील पहिला पराभव आहे.