गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मार्च 2024 (09:53 IST)

रविचंद्रन अश्विनला मिळाली खास कॅप

ravichandran ashwin
भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने धर्मशाला कसोटीत मैदानात उतरताच इतिहास रचला. 100वी कसोटी खेळणारा तो भारताकडून 14वा खेळाडू ठरला. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, विराट कोहली, इशांत शर्मा, हरभजन सिंग, चेतेश्वर पुजारा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी ही कामगिरी केली आहे. हा सोहळा खास बनवण्यासाठी त्याला धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खास पद्धतीने टेस्ट कॅप देण्यात आली.

या खास सोहळ्यासाठी अश्विनची पत्नी प्रीती आणि त्याच्या दोन मुलीही स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. भारतीय खेळाडू स्टेडियममध्ये एका रांगेत उभे होते. समोर, अश्विनची 100 वी कसोटी कॅप स्मृतीचिन्ह ठेवल्याप्रमाणे एका खास पद्धतीने पॅक करून ठेवली होती. यानंतर पत्नी आणि मुलींना बोलावून ते अश्विनच्या जवळ उभे राहिले. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने अश्विनबद्दल काही शब्द सांगितले. त्यानंतर त्याने अश्विनकडे टेस्ट कॅप दिली. यावेळी भारतीय खेळाडू टाळ्या वाजवत राहिले. प्रीती भावूक दिसत होती. सर्व खेळाडूंनी अश्विनला मिठी मारून अभिनंदन केले. भारतीय खेळाडूंनी त्यांना गार्ड ऑफ ऑनरही दिला. बीसीसीआयनेही अनेक फोटो शेअर केले आहेत.
 
अश्विनसाठी ही मालिका सोपी राहिलेली नाही. राजकोटमधील मालिकेतील तिस-या सामन्यात 500 विकेट्स पूर्ण केल्यानंतर अश्विनला अचानक मायदेशी परतावे लागले. 
 
Edited By- Priya Dixit