शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 15 जुलै 2021 (20:06 IST)

ऋषभ पंत कोरोना पॉझिटीव्ह, स्टेडियममध्ये जाऊन Euro Cup पाहणं महागात पडलं

इंग्लंडमधील वाढत्या करोना व्हायरस संक्रमणाचा फटका टीम इंडियालाही बसला आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे, असं वृत्त काही वेळापूर्वी आले होते. आता त्या पॉझिटीव्ह खेळाडूचे नाव रिपोर्टमधून समोर आले आहे. माध्यमातील माहितीनुसार टीम इंडियाचा विकेट किपर - बॅट्समन ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल झाल्यानंतर संघातील खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. या सुट्टी दरम्यान भारतीय संघातील दोघा खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. 
 
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंना थंडी आणि खोकला अशी लक्षणे होती. त्यापैकी एका खेळाडूची करोना चाचणी नेगेटिव्ह आली तर दुसरा खेळाडू अद्याप आयसोलेशनमध्ये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयसोलेशनमध्ये असलेला खेळाडू विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत आहे.
 
ऋषभ पंत अन्य सदस्यांबरोबर डरहमला दाखल झालेला नाही. त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. आता पंतची दुसरी टेस्ट १८ जुलै रोजी होणार आहे. रविवारी होणाऱ्या टेस्टमध्ये त्याचा रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यास अन्य खेळाडूंसोबत तो संघात सहभागी होऊ शकतो.