मुंबईची कामगिरी निराशाजनक, रोहितचा लाजीरवाणा रेकॉर्ड
मागच्या वर्षी आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईची कामगिरी यावर्षी निराशाजनक झाली आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या १२ मॅचपैकी मुंबईचा ५ मॅचमध्ये विजय आणि ७ मॅचमध्ये पराभव झाला आहे. १० पॉईंट्ससह मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंतच्या १० आयपीएलमध्ये मुंबईनं सर्वाधिक ३ वेळा आयपीएल जिंकली आहे. या तिन्हीवेळा रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार होता. यावर्षी मात्र रोहितची बॅट अजूनही तळपलेली नाही. १२ मॅच खेळणाऱ्या रोहितनं २६.७०च्या सरासरी आणि १३७.६२च्या स्ट्राईक रेटनं २६७ रन बनवल्या आहेत. याचबरोबर रोहितनं या मोसमात एक लाजीरवाणं रेकॉर्डही स्वत:च्या नावावर केलं आहे.
वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं करणाऱ्या रोहितनं आयपीएलच्या १० वर्षांमधलं खराब रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे. या आयपीएलमध्ये रोहित शर्मा ३ वेळा पहिल्या बॉलवर झाला आहे. आयपीएलच्या याआधीच्या १० मोसमांमध्ये रोहित शर्मा कधीच पहिल्या बॉलवर आऊट झाला नव्हता. आयपीएलच्या इतिहासामध्ये रोहित शर्मा ७ वेळा शून्यवर आऊट झाला आहे. यापैकी तीन वेळा तर याच मोसमात तो शून्यवर आऊट झाला. आयपीएलच्या या मोसमात शून्यवर आऊट होण्याच्या बाबतीत रोहितनं त्याच्याच टीममधला सहकारी इशान किशनशी बरोबरी केली आहे. रोहितबरोबरच ईशान किशनही यावर्षी ३ वेळा शून्यवर आऊट झाला आहे.