गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 2 एप्रिल 2023 (15:59 IST)

सलीम दुर्राणी: प्रेक्षकांच्या मागणीनुसार सिक्सर ठोकणारा कसोटीपटू

प्रसिद्ध भारतीय माजी कसोटीपटू सलीम दुर्राणी यांचे आज निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. सलीम दुर्राणींची एक ओळख होती, ती म्हणजे प्रेक्षकांनी मागणी केली तर त्यांच्या मागणीचा मान ठेवून ठरवून सिक्सर मारू शकत असत. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे ते लोकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.
 
ते आपल्या काळात एक प्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू म्हणून नावाजले होते. 1973 मध्ये इंग्लंडचा भारत दौरा होता. त्या मालिकेसाठी दुर्राणींना वगळण्यात आलं होतं तर संपूर्ण शहरात पोस्टर लागले होते 'नो दुर्राणी, नो टेस्ट', यावरून आपल्याला त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येऊ शकते.
 
सलीम दुर्राणींच्या क्रिकेट कारकीर्दीतील आकडेवारीवर नजर टाकली तर ती आकडेवारी फारच सामान्य वाटते. 29 टेस्ट, 1202 रन्स, एक शतक, 25.04 रनांची सरासरी आणि 75 विकेट्स. पण ज्या लोकांनी त्यांना खेळताना पाहिलं आहे किंवा जे लोक त्यांच्यासोबत खेळले आहेत त्यांच्यासाठी तर आकड्यांहून धादांत खोटं तर काहीच नसेल.
 
ते निश्चितपणे भारताच्या प्रतिभावान आणि स्टाइलिश खेळाडूंपैकी एक होते. उंचेपुरे असलेले आणि निळ्या डोळ्यांचे दुर्राणी जिथेही जात तिथे त्यांच्यावर चाहत्यांचा गराडा पडत असे.
 
प्रेक्षकांची ज्या स्टॅंडमधून मागणी आली की इकडे सिक्सर मारा त्याच दिशेला ते अगदी अचूकपणे सिक्सर ठोकू शकत. त्यांनी ही किमया कशी साधली होती हा तेव्हा आणि आता देखील एक कुतूहलाचा विषय आहे.
 
जेव्हा लॉयड आणि सोबर्स यांना लागोपाठ चेंडूवर आउट केलं होतं
1971 मध्ये वेस्ट इंडिजवर भारताने जो विजय मिळवला होता त्याचे शिल्पकार सुनिल गावसकर आणि दिलीप सरदेसाई यांना मानले जाते पण या मालिकेत दुर्राणी यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
 
त्यांनी पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या सामन्यात क्लाइव्ह लॉयड आणि गॅरी सोबर्स यांना लागोपाठ दोन चेंडूंवर बाद केले होते.
 
दुर्राणींनी एकेठिकाणी या घटनेचा उल्लेख केला आहे. ते सांगतात की या दोन विकेटचं श्रेय खरंतय जयसिंहा यांना जातं. त्यांना ठाऊक होतं की नेहमीपेक्षा अधिक गतीने फिरकी गोलंदाजी करत आहे. त्यांना वाडेकरांना सल्ला दिला की मला बॉलिंग देण्यात यावी. मी जो चेंडू टाकला तो पाहून लॉयड यांना वाटलं की आपण हो जोरदार फटका मारू शकतो. पण त्यांनी मिड ऑफवर उभे असलेल्या वाडेकरांच्या हातात कॅच दिली. मग सोबर्स आले, मी ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकला आणि तो टर्न झाला आणि गॅरी सोबर्स यांची बेल अलगद उडाली.
 
सुनील गावसकरांनी आपले आत्मचरित्र सनी डेज मध्ये याचा उल्लेख केला आहे. ते लिहितात. जेव्हा दुर्राणींनी सोबर्स यांना बोल्ड केले तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. किमान मिनिटभर मी उड्याच मारत होतो.
 
त्यावेळी दुर्राणी त्यांच्याकडे आले आणि गमतीने म्हणाले 'अहो अंकल, नुसत्या उड्याच मारणार आता की मॅचही पूर्ण होऊ देण्याचा विचार आहे.'
 
टायगर पटौदींची ती प्रसिद्ध विकेट
सलीम दुर्राणींचे मित्र आणि एकेकाळचे मध्यमगती गोलंदाज कैलाश गट्टाणींनी एक किस्सा सांगितला होता. एक वेळा राजस्थान विरुद्ध हैदराबाद संघात रणजी ट्रॉफी मॅच सुरू होती.
 
हैदराबादकडून टायगर पटौदी बॅटिंग करत होते. कैलाश गट्टाणींनी आपली पहिली ओव्हर टाकली. जेव्हा ते दुसऱ्या ओव्हरसाठी आले तेव्हा दुर्राणी त्यांना म्हणाले, आता तुम्ही थोडा आराम करा. मग मी बॉलिंग करतो. यावर गट्टाणी हे काहीसे नाराज झाले आणि त्यांनी आपलं गाऱ्हाणं राजस्थानचे कर्णधार हनुमंत सिंह यांना सांगितलं.
 
हनुमंत सिंह म्हणाले की जर दुर्राणी असं म्हणत असतील तर नक्कीच या पाठीमागे काही कारण असेल.
 
दुर्राणींनी नव्या बॉलने पटौदींना ऑफ स्टंपला तीन बॉल टाकले आणि चौथा बॉल लेग स्टंपवर टाकला. हा बॉल स्पिन झाला आणि पटौदींचा ऑफ स्टंपच खाडकन् उडाला. आणि या विकेटने पूर्ण मॅचला कलाटणी मिळाली होती.
 
पुढच्या ओव्हरमध्ये गट्टाणी फील्डिंग पोजिशनला जात असताना दुर्राणी म्हणाले, अरे हा घे बॉल आणि उरलेल्या खेळाडूंची विकेट काढ.
 
ईस्ट स्टॅंडमध्ये मारलेला सिक्सर
प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणाऱ्या गोलंदाजीसाठी जसं ते प्रसिद्ध होते त्याचवेळी आपल्या तुफान बॅटिंगसाठी देखील त्यांचा बोलबाला होता.
1973 साली एका दौऱ्यावेळी आलेले असताना ऑफ स्पिनर पॅट पोकॉक एका पार्टीत आपल्या बॉलिंगबद्दल वाढवून चढवून गप्पा मारत होता. सलीम दुर्राणी हे फटकळ होते. ते म्हणाले पॅट तुला स्पिन येत नाही. जेव्हा तू पहिल्यांदा मला बॉल टाकशील ना, तेव्हा मी ईस्ट स्टॅंडला तुला सिक्सर मारेन.
 
याबाबतची आठवण कसोटीपटू यजुवेंद्र सिंह यांनी सांगितली की मुंबई कसोटीत जेव्हा माइक डेनेसने पॅट पोकॉकच्या हाती बॉल दिला. तेव्हा पॅट यांनी एका दिवसाआधीची गोष्ट सांगितली.
 
पुढे डेनेस म्हणाले की पार्टीची गोष्ट वेगळी आहे. ही टेस्ट मॅच आहे. तू बिनधास्त ऑफ स्टंप बाहेर बॉल फेक. मी तुझ्यासाठी मिडविकेटही लावली आहे.
 
पोकॉकने बॉल फेकला आणि दुर्राणींनी म्हटल्याप्रमाणे ईस्ट स्टॅंडलाच पहिल्याच बॉलला सिक्सर ठोकला. दुर्राणी पोकॉककडे गेले आणि त्यांना म्हणाले, मी म्हटलं ना, तू ऑफस्पिनर नाहीयेस. त्या डावात दुर्राणींनी 73 धावा काढल्या होत्या.
 
दुर्राणींच्या मनाचा मोठेपणा
दुर्राणी आपल्या दिलखुलास आणि मनाच्या मोठेपणासाठी प्रसिद्ध होते. सुनील गावसकर यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की 1971 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्याआधी त्यांना आणि सलीम दुर्राणींना श्रीलंकेविरोधात मॅच खेळण्यासाठी गुंटूरला बोलवण्यात आलं होतं.
गावसकर पुढे सांगतात आम्ही मद्रासपर्यंत विमानाने गेलो मग मद्रास ते गुंटूर रेल्वेनी जायचं होतं. माझ्याजवळ बिछाना नव्हता. सलीम यांनी आपलं वजन वापरून टीटीकडून एका ब्लॅंकेट आणि उशीची व्यवस्था करून घेतली.
 
मी थंडीने कुडकुडत होतो. मला झोपच येत नव्हती. सलीमने तत्काळ त्यांचे ब्लॅंकेट मला दिला. सलीम म्हणाले की मी तर अजून लोकांशी गप्पा मारतोय. तोपर्यंत तो ब्लॅंकेट वापर. सकाळी उठलो तर पाहिले माझ्या भोवती ते ब्लॅंकेट गुंडाळलेलं होतं आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी सलीम यांनी आपले गुडघे छातीपाशी दुमडून घेतले होते. मला विश्वासच बसला नाही की एक नावाजलेला खेळाडू माझ्यासारख्या अनोळखी रणजी खेळाडूसाठी आपलं ब्लॅंकेट देईन. त्या दिवसापासून मी त्यांना अंकल म्हणू लागलो होतो.
 
'जेव्हा सरदेसाईंनी केले प्रॅंक'
सलीम दुर्राणींचा स्वभाव खुशमिजाज होता. ते सतत हास्यविनोद करत आणि जोराजोरात हसत. पण दुर्राणी सांगतात की 1971 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात सरदेसाईंनी जी काही माझ्यासोबत केलं ते आठवून अनेकांचे हसून पोट दुखले होते.
दुर्राणींनी सांगितलं की मी आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. सरदेसाई माझे रुममेट होते. पाच-सहाची वेळ होती. मला एक फोन आला, सलीम दुर्राणी यांच्याशी बोलू शकतो का. मी म्हटलं मीच बोलतोय.
 
पुढून आवाज आला. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. आम्हाला तुमची भेट घ्यायची आहे. फोटो काढायचा आहे. मी म्हटलं की वर या. आपण फोटो काढू. पुढून आवाज आला नाही, आम्ही तुमची स्वीमिंग पूल जवळ वाट पाहात आहोत. तुमच्यासाठी काही भेटवस्तू देखील आणल्या आहेत. त्याचा तुम्ही स्वीकार करावा.
 
मी कपडे बदलून खाली आलो. पण मला त्याठिकाणी कुणीच दिसलं नाही. मी पुन्हा माझ्या रुममध्ये गेलो आणि कपडे बदलून बसलो. पुन्हा दहा मिनिटांनी फोन आला. दुर्राणी साहेब आम्ही तुमची वाट पाहत आहोत. त्यांनी हे पण सांगितलं की तुम्हाला गिफ्ट म्हणून आम्ही टेप-रेकॉर्डर आणले आहे. त्या काळात टेस्ट खेळण्यासाठी अतिशय अल्प मानधन मिळत असे त्यामुळे टेप रेकॉर्डर ही मोठी वस्तू वाटत होती. मी पुन्हा खाली गेलो. तिथे असलेल्या रिसेपशनिस्टला मी विचारलं की मला भेटण्यासाठी कुणी आलं होतं का?
 
त्यावर उत्तर मिळालं, मी तर कुणालाच नाही पाहिलं. मी जेव्हा आपल्या रूमकडे पुन्हा जाऊ लागलो तर एका पिलरपाठीमागून आवाज आला, अच्छा तुला टेपरेकॉर्डर पाहिजे का? हे सगळं सरदेसाईंचा कारस्थान आहे पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. शेवटी त्यांना स्वीमिंग पूलमध्ये पाडल्यानंतरच मला हायसं वाटलं.
 
परवीन बाबी यांच्यासोबत अभिनय
अनेकांना आश्चर्य वाटू शकतं पण सलीम दुर्राणींनी हिंदी चित्रपटात देखील नायक म्हणून काम केलं आहे. बाबूराम इशारा या प्रसिद्ध दिग्दर्शकानी दुर्राणींची 'चरित्र' या चित्रपटासाठी हिरो म्हणून निवड केली होती.
दुर्राणींनी प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासोबत काम केलं होतं. याबाबतचा किस्सा यजुवेंद्र सिंह सांगतात की "सलीम दुर्राणी एकदम दिलखुलास होते. दिसायला तर ते देखणे होतेच. त्यामुळेच त्यांना हिरोची ऑफर मिळाली. आम्हाला ही गोष्ट कळाली होती की मानधन म्हणून त्यांना 18,000 रक्कम मिळाली. जेव्हा ते हैदराबादला येतील तेव्हा त्यांच्याकडून पार्टी घ्यायचं आम्ही ठरवलं."
 
"जेव्हा ते हैदराबादला आले तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला तर मानधन म्हणून 18 हजार रक्कम मिळाली आहे. तेव्हा आपण पार्टी करू. त्यावर ते म्हणाले, अरे तो पैसे तर मी परवीन बाबी यांच्यासोबत खर्च करुन टाकले. असे ते एक बिनधास्त आयुष्य जगत," असं यजुवेंद्र यांनी सांगितलं होतं.
 
'तुम्ही त्यांना खेळताना पाहिलंय का?'
एक वेळा इलुस्ट्रेडेट विकलीचे संपादक प्रीतिश नंदी यांनी प्रसिद्ध पत्रकार अयाज मेमन यांना दुर्राणींचा इंटरव्यू घेण्यासाठी पाठवलं होतं.
 
त्यावेळी दुर्राणी रिटायर होऊन 17 वर्षं उलटली होती. अयाज यांना समजलं की सलीम हे चौपाटीतील आराम या हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्या ठिकाणी ते पोहोचले. जेव्हा त्यांनी ते दृश्य पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दुर्राणी हे एका 8 बाय 5 च्या छोट्याशा खोलीत थांबले होते. त्या खोलीचं भाडं दिवसाला 25 रुपये होतं.
 
मेमन यांनी हॉटेल मालकाला विचारलं की दुर्राणींना हे भाडं परवडतं का? त्यावर हॉटेलचा मालक म्हणाला, 'माझ्यात एवढी हिम्मत नाही की दुर्राणींना भाडं मागायचा उर्मटपणा मी करेन.'
 
'नंतर हॉटेल मालकाने माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. अन् ते माझ्यावर रागावून म्हणाले, की तुम्ही कधी त्यांना खेळताना पाहिलं नाही का?'
 
मेमन पुढे सांगतात, 'आणि ही गोष्ट मला समजू शकत होतो की ते असं का म्हणत होते.'
 
कारण ज्या लोकांना त्यांचा खेळ पाहिला आहे तो त्यांच्या प्रेमात पडला नाही असं होऊच शकलं नसतं.
 
Published By- Priya Dixit