...म्हणून धवन यशाच्या शिखरावर
भारताचा आक्रमक सलामीवीर शिखर धवन सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कालखंडातून जात आहे. परंतु एकामागून एक यश मिळत असतानाही तो आपला पडता काळ विसरलेला नाही. फॉर्म हरवल्यामुळे धवनला भारतीय संघातील स्थानही गमवावे लागले होते. परंतु त्याच अपयशातून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले आणि त्यामुळेच यशाची किंमतही समजून आली, असे सांगताना धवनने आपल्या प्रगल्भतेची चुणूक दाखविली.
गेल्या वर्षी धवनचा सूर इतका हरपला होता की, त्याला एकाही डावात यश मिळत नव्हते. काही वेळा आपल्याच चुकीचा फटका त्याला बसला, तर काही वेळा गोलंदाजांच्या कौशल्याचा तो बळी ठरला. काही वेळा पंचांच्या चुकीच्या निर्णयाचाही तो बळी ठरला. परंतु परिणाम एकच होता… न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर त्याला संघातून वगळण्यात आले. हा धक्का आणि धडाही शिखर धवनसाठी पुरेसा होता आणि गेल्या काही दिवसांत त्याने हे सिद्ध करून दाखविले आहे.
लोकेश राहुल दुखापतग्रस्त असल्यामुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी धवनची निवड झाली आणि त्याने ही संधी दोन्ही हातांनी घट्ट पकडली. स्पर्धेत सर्वाधिक धावा करताना त्याने सर्वोत्तम फलंदाजाचे पारितोषिक पटकावलेच, शिवाय वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघात निवडीचे बक्षीसही त्याला मिळाले. तिथेही त्याने अप्रतिम कामगिरी केली. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याची कामगिरी नेत्रदीपक होती. काल पहिल्या एकदिवसीय सामन्यातील धवनचे शतक त्याच्या आत्मविश्वासाचे प्रतीक होते.
अपयशी ठरत असताना आपण आपल्या फलंदाजीच्या तंत्राबद्दल आणि शैलीबद्दलच विचार करीत होतो. तसेच यशस्वी होत असतानवाही मी वेगळे काही करीत नाही. त्यामुळे यशापयशाचा माझ्यावर तसा फार परिणाम होत नाही, असे सांगून धवन म्हणाला की, सध्यासारखाच फॉम मला 2013 चॅम्पियन्स करंडकातही गवसला होता. त्यानंतरच मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले कसोटी शतक फटकावले होते. तोच सूर पुन्हा गवसल्याची जाणीव मला होते आहे.
सध्या संघात असलेल्या आणि प्रतीक्षा यादीत असलेल्या तरुण खेळाडूंशी यशस्वी स्पर्धा करण्याकरिता आपली तंदुरुस्ती सर्वोच्च स्तरावर कायम राखण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो, असे सांगून धवन म्हणाला की, क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याची मला जाणीव आहे. मग ते कसोटी क्रिकेटमधील असो, की झटपट क्रिकेटमधील. एक झेल सुटला तरी तुम्ही सामना गमावू शकता. त्यामुळे त्याबाबतीत तडजोड करता येणार नाही.