1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (18:35 IST)

सूर्यकुमार यादव : वर्ल्ड कपमध्ये फ्लॉप ठरलेला सूर्या कसा ठरला मॅन ऑफ द मॅच?

के. बोधिराज
भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात वर्ल्डकप फायनलमध्ये झालेल्या दारुण पराभवाची सल अजूनही ताजी असताना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आणखीन एक टी-20 सामन्यांची मालिका सुरु झालीय.
 
वर्ल्डकपमध्ये खराब फलंदाजी केलेल्या सूर्यकुमार यादवला या मालिकेत भारताचा कर्णधार बनवलं गेलं आणि सूर्यकुमार यादव पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरला.
 
भारतीय संघ या सामन्यात धावांचा पाठलाग करत होता. शेवटच्या ओव्हरमध्ये अशा काही नाट्यमय घडामोडी घडल्या की आता पुन्हा एकदा कांगारू भारताला हरवणार की काय असं वाटू लागलं होतं.
 
पण, आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलेला रिंकू सिंग मैदानात उभा राहिला आणि त्याने फटकेबाजी करत भारताला या मालिकेतला पहिला विजय मिळवून दिला.
 
शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला 6 बॉलमध्ये 7 धावा पाहिजे होत्या. ऑस्ट्रेलियाचा शॉन शॉन अॅबट बॉलिंग करत होता. पहिल्याच बॉलवर रिंकूने एक चौकार मारला आणि दुसऱ्या बॉलवर एक धाव पळून काढली.
 
आता भारताला जिंकण्यासाठी 4 बॉलमध्ये 2 धावा पाहिजे होत्या.
 
त्यावेळी भारताने फक्त पाच फलंदाज गमावले होते त्यामुळं आता आपण आरामात जिंकू असे भारतीय चाहत्यांना वाटत असतानाच तिसऱ्या बॉलवर अक्सर पटेल आऊट झाला.
 
3 बॉलमध्ये 3 विकेट
त्यानंतर फलंदाजीला उतरलेला रवी बिष्णोई बाद झाला आणि डावखुरा अर्शदीप सिंग फलंदाजीला उतरला. भारताला त्यावेळी 2 बॉलमध्ये 2 धावा हव्या होत्या. पण पाचव्या बॉलवर अर्शदीपही दुसरी धाव करत असताना रनआउट झाला.
 
शेवटच्या बॉलवर भारताला एक धाव पाहिजे होती. अगदी सहज जिंकणारी मॅच भारताने पुन्हा एकदा पराभवाच्या उंबरठ्यावर आणून ठेवली होती.
 
पण असे अनेक सामने जिंकण्याचा अनुभव असणाऱ्या रिंकूने शेवटच्या बॉलवर शॉन अॅबटला खणखणीत षटकार खेचला आणि भारताला विजय मिळवून दिला.
 
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची दमदार फलंदाजी
हैदराबाद येथे काल झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 20 ओव्हरमध्ये 3 गडी गमावून 208 धावा केल्या.
 
विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य असताना भारतीय संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 209 धावा करून विजय मिळवला.
 
यासह भारतीय संघाने 5 सामन्यांच्या T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 42 चेंडूत 80 धावा करणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादवला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
 
त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या जॉश इंग्लिसने शतक ठोकलं. 47 बॉलमध्ये 110 धावा (8 षटकार, 11 चौकार) करून तो आऊट झाला.
 
र्ल्ड कपची तयारी सुरु झालीय
भारतीय संघाला विजयाकडे नेणारा सूर्यकुमार यादव 80 धावांवर आऊट होताच सामना हातातून जाईल की काय अशी भीती चाहत्यांना वाटत होती.
 
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या रिंकू सिंगने 19व्या ओव्हरमध्ये 7 धावा करून भारतीय संघाला विजयाच्या जवळ नेले.
 
T20 वर्ल्डकपला केवळ 6 महिने शिल्लक असताना, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ या प्रकारात चांगली तयारी करत आहेत. त्याच तयारीच्या दृष्टीने ही 5 सामन्यांची मालिका महत्वपूर्ण आहे.
 
विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर फलंदाजांची लयलूट
या सामन्यासाठी बनवण्यात आलेली खेळपट्टी सपाट आणि फलंदाजांसाठी स्वर्ग होती. त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी काहीही केलं तरी स्मिथ आणि इंग्लिस यांच्या जोडीने त्यांची यथेच्छ धुलाई केली.
 
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू शॉर्टला रवी बिष्णोईने 13 धावांवर बोल्ड केलं. त्यानंतर इंग्लिस आणि स्मिथने दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांच्या धावांचा वेग वाढवला.
 
विशेषत: बिश्नोईने टाकलेल्या 8व्या ओव्हरमध्ये इंग्लिसने एका षटकार आणि तीन चौकारांसह 19 धावा केल्या. त्यानंतर बिष्णोईच्याच 12व्या ओव्हरमध्ये 2 षटकार आणि एका चौकारासह 18 धावा केल्या.
 
रवी पुन्हा 15वी ओव्हर टाकायला परत आला आणि त्याही ओव्हरमध्ये इंग्लिसने 3 षटकारांसह 21 धावा केल्या. इंग्लिसने 29 बॉलमध्ये अर्धशतक आणि 47 चेंडूत शतक झळकावलं.
 
पॉवरप्लेमध्येही ऑस्ट्रेलियन संघाला मोठी धावसंख्या जोडता आली नाही आणि एक विकेट गमावून केवळ त्यांना फक्त 40 धावा करता आल्या.
 
पण जॉश मैदानात आला आणि ऑस्ट्रेलियाच्या डावाचा रंगच पालटला. 11.3 ओव्हरमध्ये 100 धावांचा टप्पा गाठलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने 18.5 षटकांत पुढच्या 100 धावांचा टप्पा गाठला.
 
म्हणजेच पुढच्या 41 चेंडूत त्यांनी 100 धावा केल्या. इंग्लिसने 47 चेंडूत शतक करून 10 वर्षांपूर्वीच्या अॅरॉन फिंचच्या रेकॉर्डशी बरोबरी केली.
 
कर्णधार म्हणून सूर्याची परीक्षा
सूर्यकुमारने यापूर्वी 36 वेळा मुंबई संघाचे कर्णधारपद भूषवले असलं तरी कालचा सामना त्याच्यातली नेतृत्वाची चुणूक दाखवून देणारा ठरला.
 
खेळपट्टी फलंदाजांच्या बाजूने होती, रन रेट वाढत होता, गोलंदाज कसेही बदलले तरी इंग्लिस आणि स्मिथ चांगली फलंदाजी करत होते तरीही सूर्यकुमारने शांत डोक्याने भारतीय संघाचं नेतृत्व केलं.
 
रवी बिष्णोई, अक्सर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग अशा सगळ्याच गोलंदाजांनी खूप रन्स दिल्यामुळं काहीकाळ तो दबावातही आलेला होता.
 
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केल्यामुळे फलंदाजीला उतरल्यावर सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर महत्वाची भूमिका असणार होती.
 
टी-20 वर्ल्डकपच्या तयारीसाठी खूप कमी कालावधी
फलंदाजांवर दबाव तयार करण्यात प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंगची जोडी अपुरी पडली. कारण दोन्ही गोलंदाजांना लयच सापडली नाही.
 
पुढचा टी-20 वर्ल्डकप फक्त सहा महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना गोलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय ठरू शकतो.
 
नव्या दमाच्या या भारतीय संघात 8व्या क्रमांकापर्यंत फलंदाज असले तरी अष्टपैलू खेळाडूंच्या फळीत मात्र कुणीही दिसत नाहीये.
 
अक्सर पटेलकडे संघ व्यवस्थापन अष्टपैलू म्हणून बघत असलं तरी त्याला दिलेली ही भूमिका तो निभावू शकेल असा विश्वास देणारी खेळी त्याने अजूनपर्यंत तरी केलेली नाही.
 
एकदिवसीय सामन्यांच्या वर्ल्डकप फायनलमध्ये संथ खेळपट्टीवर सूर्यकुमारला स्लो-बाउन्सर टाकून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आउट केलं होतं.
 
विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर मात्र चेंडू आरामात बॅटवर येत होता आणि तो त्याच्या स्वभावावर साजेसा खेळ करू शकला.
 
ऋतुराज गायकवाडचा 'डायमंड डक'
भारताकडून सलामीला फलंदाजीस उतरलेल्या ऋतुराज आणि यशस्वी जयस्वाल यांच्यातील संवादाच्या गोंधळामुळे ऋतुराज एकही बॉल खेळायला मिळाला नाही.
 
सहसा क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा फलंदाज पहिल्याच बॉलवर आउट होतो तेव्हा त्याला इंग्रजीत 'गोल्डन डक' असं म्हणतात पण जर फलंदाजाला बॉल खेळण्याची एक संधीही न मिळता तो आउट झाला तर त्या प्रकाराला 'डायमंड डक' असं म्हणतात.
 
ऋतुराज अशाच पद्धतीने आउट झाला.
 
त्याच्यासोबत आलेला यशस्वी जयस्वालही फार कमाल करू शकला नाही आणि तोही 21 धावा करून आउट झाल्यामुळे भारताची अवस्था 2 बाद 22 अशी झाली होती.
 
ईशान आणि सूर्यकुमारने डाव सावरला
ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवने तिसऱ्या विकेट साठी 112 धावांची भागीदारी केली.
 
ईशान किशनने 37 बॉलमध्ये 58 रन्सची आक्रमक खेळी केली. तो आउट झाल्यानंतर फलंदाजीला आलेला तिलक वर्मा 12 रन्स करून आउट झाला.
 
त्यानंतर रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताची धावगती कमी होऊ दिली नाही.
 
सूर्यकुमार यादवने फक्त 29 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आणि तो 80 धावा करू शकला. पण 18व्या ओव्हरमध्ये सूर्या आउट झाला आणि ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमनाचा प्रयत्न केला.