शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 7 जानेवारी 2023 (22:01 IST)

सूर्यकुमार यादव या वर्षी शतक झळकावणारा पहिला भारतीय

Suryakumar Yadav
भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने राजकोटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. या वर्षी (2023) टीम इंडियासाठी शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर शनिवारी (7 जानेवारी) सूर्यकुमारने शानदार फलंदाजी केली. सूर्यकुमारने 51 चेंडूत 112 धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याने चौकार आणि षटकारांची बरसात केली.
 
सूर्यकुमारने 45 चेंडूत आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे शतक ठोकले. सूर्याने या खेळीत सात चौकार आणि नऊ षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 219.61 होता. सूर्याने गेल्या वर्षी इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धही शतके झळकावली होती. राजकोटमध्ये शतक झळकावल्यानंतर त्याने स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. सूर्याने आपली बॅट हवेत फिरवत प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले आणि अक्षर पटेलला मिठी मारत हसायला लागला. टीम इंडियाच्या खेळाडूंनीही त्याच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या.
 
या खेळीसह सूर्यकुमारने भारताच्या लोकेश राहुल आणि पाकिस्तानच्या बाबर आझमसह अनेक फलंदाजांना मागे टाकले आहे. या दोन्ही फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली आहेत. तर, सूर्यकुमार यादवने हा पराक्रम तीनदा केला आहे.

आता फक्त भारतीय कर्णधार रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात सूर्यकुमारच्या पुढे आहे. रोहितने भारतासाठी T20 मध्ये चार शतके झळकावली आहेत आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा तो फलंदाज आहे. 

टी-20 क्रिकेटमधील तिसरे शतक झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोची बरोबरी केली आहे. या दोन्ही फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आहेत. झेक प्रजासत्ताकच्या द्विजीनेही आपल्या देशासाठी टी-20 मध्ये तीन शतके झळकावली आहेत, परंतु तो सहयोगी संघाचा भाग आहे.
 
Edited By - Priya Dixit