संगमनेरच्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पहिला विजय
धरमशालाच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा चौथ्या कसोटीत चौथ्या दिवशीच आठ खेळाडू राखून पराभव केला आणि चार कसोटी सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकून बोर्डर-गावसकर करंडकाची गुढी उभारून सार्या देशवासीयांचा आनंद द्विगुणित केला.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली खेळताना पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं विजय साजरा केला. टीम इंडियानं ही मालिकाही 2-1 अशी खिशात टाकून बोर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, आपल्या पदार्पणातच अजिंक्यनं जे करून दाखवलंय… ते आक्रमक अशी ओळख असलेल्या विराटलाही करता आलं नव्हतं. या रेकॉर्डसोबत रहाणेनं सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांची बरोबरीही केलीय.
आपल्या कॅप्टन्सीमध्ये पहिलीच मॅच जिंकणारा अजिंक्य नववा भारतीय कॅप्टन ठरलाय. यापूर्वी, महेंद्र सिंग धोनीनं दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सीरिजच्या तिसर्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये पहिल्यांदा कॅप्टन्सीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. याही मॅचमध्ये टीम इंडियानं आठ विकेटसनं दक्षिण आफ्रिला पछाडलं होतं.
यापूर्वी, पॉली उमरीगर, सुनील गावरकर, रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर या मुंबईच्या चार खेळाडुंनी आपल्या कॅप्टन्सीच्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता.
या सामन्यातही रहाणेची फलंदाजी बहारदार झाली. त्याच्या वेगवान फलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचं 106 धावांचं आव्हान तुटपुंज ठरलं. रहाणेने 27 चेंडूत झटपट नाबाद 38 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि 2 खणखणीत षटकार ठोकले. पॅट कमिन्सला सलग दोन षटकार ठोकून, रहाणेने ऑस्ट्रेलियाची हवा काढली. मूळ संगमनेरकर असलेल्या रहाणेच्या यशामुळे चंदनापुरीत आनंद व्यक्त करण्यात आला. विजयाचाआनंद अजिंक्य रहाणे याच्या कुटुंबियांनाही झाला. याबाबत हा गुढीपाडवा कायम लक्षात राहिल अशी प्रतिक्रिया अजिंक्यची पत्नी राधिकाने दिली.