आता टी-20 विश्वचषक जिंकणे हाच ध्यास
ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणार्या आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकणे हाच भारतीय क्रिकेट संघाचा ध्यास आहे. आगामी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सहा एकदिवसीय सामने हे विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले. भारताच्या न्यूझीलंड दौर्याआधी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शास्त्रींनी भारतीय संघाच्या विश्वचषक तयारीची माहिती दिली.
विश्वचषकाच्या तयारीसाठी संघातील वातावरण, खेळाडूंची दुखापत आदी विषयांवर चर्चा झाली आहे. फक्त नाणेफेक जिंकणे हा मुद्दा नाही. आम्हाला जगातील सर्व देशात सर्व संघांविरुद्ध चांगली कामगिरी करायची आहे. भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकणे हा एक ध्यास आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व काही करू.
भारतीय संघ न्यूझीलंड दौर्यात 5 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका मार्चमध्ये होणार आहे. भारतीय संघात प्रत्येकाच्या यशाचा आनंद सर्वजण घेतात. संघात 'मी' नव्हे तर 'आपण' या शब्दावर भर असतो. ऑस्ट्रेलिाविरुद्धच्या मालिका विजयात भारतीय संघाने मानसिक ताकद दाखवली. पहिल्या सामन्यात 10 गड्यांनी पराभव झाल्यानंतर भारताने शानदार कमबॅक केल्याचे शास्त्रींनी सांगितले.
ऑस्ट्रेलिाविरुद्धच्या मालिकेत आमची मानसिक ताकद आणि दबावात खेळण्याची क्षमतेची परीक्षा झाली. वानखेडे मैदानावर पराभव झाल्यानंतर संघाने पुढील दोन सामन्यात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. अर्थात भूतकाळात जे झाले ते झाले. तशीच कामगिरी भविष्यात देखील करायची असल्याचे ते म्हणाले. न्यूझीलंड दौर्यात शिखर धवनसारखा अनुभवी फलंदाज नसल्याचे दुःख आहे. शिखरकडे सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. पण शिखरच्या जागी केएल राहुलच्या रुपाने फलंदाज आणि यष्टिरक्षक मिळाला आहे, असे शास्त्रींनी सांगितले.