सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (22:16 IST)

Twenty20 वर्ल्डकप: भारतीय संघ जाहीर, शिखर धवनला संघातून वगळण्यात आले

टी-20 विश्वचषक 2021 करिता भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्वीट करून भारतीय संघाची घोषणा केली.
विश्वचषक स्पर्धेसाठी कर्णधारपद विराट कोहली याच्याकडेच कायम असून उपकर्णधारपदीही रोहित शर्मा कायम आहे.
सूर्यकुमार यादव, ईशान किशन, वरूण चक्रवर्ती यांसारख्या तरूण खेळाडूंना या निमित्ताने विश्वचषक स्पर्धेचं तिकीट मिळालं. तर आपल्या फॉर्मशी झगडत असलेल्या शिखर धवनला संघातून वगळण्यात आलं आहे.
त्याव्यतिरिक्त गेल्या काही सामन्यांमध्ये संधी मिळूनही अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणाऱ्या संजू सॅमसन, मनिष पांडे, पृथ्वी शॉ यांनाही या संघात स्थान देण्यात आलं नाही.
रवीचंद्रन अश्विनला अनपेक्षित संधी
17 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या वर्ल्ड टी-20 स्पर्धेसाठी भारतीय संघात रवीचंद्रन अश्विनला स्थान मिळालं.
आश्चर्य म्हणजे सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यात अश्विनला एकाही कसोटी सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली नव्हती.
तर आणखी एक फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन हे संघातले नवे खेळाडू आहेत. अपेक्षे प्रमाणेच या संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहीत शर्मा यांच्याबरोबर फलंदाजीची धुरा के एल राहुल, सुर्यकुमार यादव आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्यावर असेल. तर रवींद्र जाडेजा, हार्दिक पांड्या हे अष्टपैलू आणि टी-20 स्पेशलिस्ट फलंदाजही संघात आहेत.
अश्विनच्या बरोबरीने फिरकीची धुरा वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलवर असेल. तर तेज गोलंदाजीची मदार महम्मद शामी, भुवनेश्वर कुमार आणि जस्प्रीत बुमरा यांच्यावर असेल. इंग्लंड दौऱ्यातल्या मोहम्मद सिराजला वगळण्यात आलं आहे. राखीव खेळाडूंतही त्याला स्थान नाही.
अनुभवी तसंच तरूण अशा मिश्र स्वरुपात भारतीय संघाची रचना यामध्ये दिसून येते. एकूणच नव्या खेळाडूंना तयार करण्याच्या दृष्टीने बीसीसीआयचा प्रयत्न असल्याचं संघनिवडीतून दिसून येईल.
या व्यतिरिक्त दीपक चहर, शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर हे राखीव खेळाडू असतील.
या व्यतिरिक्त एका वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट संघातून निवृत्ती पत्करलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला यंदाच्या स्पर्धेकरिता एक विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.
विश्वचषक संघाला सल्ला देण्यासाठी कॅप्टन कूल धोनी मेंटॉर म्हणून काम पाहील. म्हणजे आता जो सपोर्ट स्टाफ आहे तो असेलच पण सोबत धोनीही संघासोबत असेल.
भारतीय संघाचा समावेश या स्पर्धेत ब गटात झाला असून संघाचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 24 ऑक्टोबरला होणार आहे.
भारतीय संघ पुढील प्रमाणे -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.