शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 (09:24 IST)

अंडर-19 वर्ल्डकप : ऑस्ट्रेलियाची भारतावर 79 रन्सनी मात, ICC स्पर्धांवर कांगारूंचंच वर्चस्व

आयसीसी वन डे विश्वचषकापाठोपाठ अंडर-19 विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाचा संघ फायनलमध्ये भारतावर वरचढ ठरला आहे.भारताला 79 रन्सनी हरवून ऑस्ट्रेलियानं अंडर 19 विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं.
 
या स्पर्धेच्या इतिहासातलं ऑस्ट्रेलियाचं हे चौथं विजेतेपद आहे. तसंच क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्वही या विजयानं पुन्हा सिद्ध झालं आहे.
 
पुरुषांच्या क्रिकेटमध्ये टेस्ट चॅम्पियनशिप आणि वन डे विश्वचषकापाठोपाठ अंडर-19 विश्वचषकही आता कांगारूंनी जिंकला आहे.
 
तर महिला क्रिकेटमध्येही वन डे आणि ट्वेन्टी20 विश्वचषकाची ट्रॉफी सध्या ऑस्ट्रेलियाकडेच आहे.
अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा माहली बिअर्डमन सर्वोत्तम खेळाडू ठरला तर मालिकावीराचा पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या कवेना मफाकाला मिळाला.
ऑस्ट्रेलियानं असा साधला विजय
दक्षिण आफ्रिकेच्या बेनोनी इथे विलोमूर पार्क स्टेडियमवर झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं गतवेळच्या विजेत्या भारतासमोर विजयासाठी 254 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं.
 
या स्पर्धेच्या इतिहासातलं हे आजवरचं सर्वात मोठं टार्गेट असून त्याचा पाठलाग करताना भारताच्या युवा टीमची सुरुवातीलाच पडझड झाली आणि मग सामना सामना भारताच्या हातून निसटला.
भारतीय टीम 43.5 ओव्हर्समध्ये 174 रन्सवरच ऑल आऊट झाली. सामन्यात चार जलदगती गोलंदाज खेळवणं ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडलं.
 
आदर्श सिंग आणि अभिषेक मुरुगनचा अपवाद वगळता एकाही भारती फलंदाजाला 40 रन्सची वेस ओलांडता आली नाही. आदर्शनं 77 चेंडूंमध्ये 47 तर अभिषेक मुरुगननं 46 चेंडूंमध्ये 42 रन्सची खेळी केली.
भारतीय डावाच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये कॅलम वायडलरनं भारताचा सलामीवीर अर्शिन कुलकर्णीला अवघ्या तीन रन्सवर बाद केलं.
 
तिसऱ्या क्रमांकावर आलेला अष्टपैलू मुशीर खान 22 रन्सच करू शकला. बिअर्डमननं त्याला 22 रन्सवर बाद केलं. बिअर्डमननंच भारताचा कर्णधार उदय सहारनला आठ रन्सवर बाद केलं.
 
तर सचिन धस 9 रन्सवर असताना मॅकमिलनच्या गोलंदाजीवर हिक्सला झेल देऊन माघारी परतला.
 
प्रियांशू मोलिया 9 रन्सवर तर अरावेली अविनाश आणि राज लिंबानी भोपळाही न फोडता बाद झाले.
 
आदर्श सिंगची एकाकी झुंज बिअर्डमननंच मोडली. आदर्शनं 47 धावा केल्या. अभिषेक मुरुगननं 42 रन्स केल्या. सौमी पांडे 2 रन्सवर बाद झाला तर नमन तिवारी 14 रन्सवर नाबाद राहिला.
 
ऑस्ट्रेलियाकडून माहली बिअर्डमन आणि रॅफ मॅकमिलननं प्रत्येकी तीन, कॅलम वायडलरनं २ तर चार्ली अँडर्सन आणि टॉम स्ट्रेकरनं प्रत्येकी एक विकेट काढली.
त्याआधी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सात बाद 253 धावा नोंदवल्या.
 
अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमधला हा सर्वात मोठा स्कोर ठरला. याआधी इंग्लंडनं 1998 च्या अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 3 बाद 242 रन्स केल्या होत्या.
 
ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगनं 64 चेंडूंमध्ये 55 रन्सची खेळी केली तर ह्यू वाबगेननं 48 आणि ऑलिव्हर पीकनं 46 रन्स केल्या. भारताकडून राज लिंबानीनं तीन, नमन तिवारीनं दोन तर सौमी पांडे आणि मुशीर खाननं प्रत्येकी एक विकेट काढली.
 
ICC स्पर्धांवर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व
या विजयासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यंदा होणारा पुरुषांचा टी20 विश्वचषक जिंकण्याचाही त्यांचा इरादा राहील.
 
सध्या प्रमुख आयसीसी स्पर्धांचे विजेते असे आहेत :
 
पुरुष क्रिकेट
 
आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप - ऑस्ट्रेलिया 2021-23 (भारत उपविजेता)
 
आयसीसी वन डे विश्वचषक - ऑस्ट्रेलिया 2023 (भारत उपविजेता)
 
आयसीसी टी20 विश्वचषक - इंग्लंड 2022 (पाकिस्तान उपविजेता)
 
अंडर-19 विश्वचषक - ऑस्ट्रेलिया 2024 (भारत उपविजेता)
 
महिला क्रिकेट
 
आयसीसी महिला वन डे विश्वचषक - ऑस्ट्रेलिया -2022 (इंग्लंड उपविजेता उपविजेता)
 
आयसीसी महिला टी20 विश्वचषक - ऑस्ट्रेलिया 2023 (दक्षिण आफ्रिका उपविजेता)
 
अंडर-19 टी20 विश्वचषक - भारत 2023 (इंग्लंड उपविजेता)
 
Published By- Priya Dixit