सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: इंदूर , मंगळवार, 2 जानेवारी 2018 (11:30 IST)

विदर्भाला पहिलेच रणजी विजेतेपद

बलाढ्य दिल्ली संघाचा नऊ गडी आणि एक संपूर्ण दिवस राखून दणदणीत पराभव करताना विदर्भ संघाने पहिल्यांदाच रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावीत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. विशेष म्हणजे विदर्भाने चौथ्याच दिवशी विजय मिळवीत रणजी स्पर्धेच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. विजयासाठी 29 धावांचे लक्ष्य विदर्भाने केवळ एक गडी गमावून पूर्ण केले.
 
नाणेफेक गमावून क्षेत्ररक्षण करणाऱ्या विदर्भाने दिल्लीचा पहिला डाव केवळ 295 धावांत रोखला, तो रजनीश गुरबानीच्या भेदक माऱ्यामुळे. गुरबानीने केवळ 59 धावांत 6 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली. त्यानंतर अक्षय वाडकरचे शानदार पहिले प्रथमश्रेणी शतक आणि फैझ फझल, वासिम जाफर, आदित्य सरवटे व सिद्धेश नेरळ यांनी झळकावलेल्या दमदार अर्धशतकांमुळे विदर्भाने पहिल्या डावात सर्वबाद 547 धावांची मजल मारताना सामन्यावर पकड घेतली.
 
पहिल्या डावातील 252 धावांच्या पिछाडीवरून पुढे खेळणाऱ्या दिल्लीची फलंदाजी पुन्हा एकदा अपयशी ठरली व त्यांचा दुसरा डाव केवळ 76 षटकांत 280 धावांत गुंडाळला गेला. त्यानंतर विजयासाठी केवळ 29 धावांचे लक्ष्य केवळ 5 षटकांत व कर्णधार फैझ फझलच्या मोबदल्यात पार करीत विदर्भाने ऐतिहासिक विजेतेपदाची निश्‍चिती केली. पहिल्या डावातील हॅटट्रिकसह सामन्यात 151 धावांत 8 बळी घेणाऱ्या रजनीश गुरबानीला सामन्याचा मानकरी हा पुरस्कार देण्यात आला.
 
त्याआधी कालच्या 7 बाद 528 धावांवरून विदर्भाचा पहिला डाव दिल्लीने केवळ 7.4 षटकांत व 19 धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाज बाद करताना 547 धावांवर संपुष्टात आणला. अक्षय वाडकरने 133 धावा केल्या, तर सिद्धेश नेरळने 74 धावांची शानदार खेळी केली. दिल्लीकडून नलिन सैनीने 135 धावांत 5 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली. खेजरोलियाने 132 धावांत 2, तर नितिश राणाने 32 धावांत 1 बळी घेत त्याला साथ दिली.
दुसऱ्या डावातही दिल्लीची फलंदाजी अपयशी
 
दुसऱ्या डावात दिल्लीचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. सलामीवीर कुणाल चांडेला केवळ 32 धावा फळकावर असताना परतल्यावर गुरबानीने गौतम गंभीरला केवळ 36 धावांवर पायचित करीत दिल्लीला हादरा दिला. नितिश राणाने 64 धावांची, तर ध्रुव शोरेने सलग दुसऱ्या अर्धशतकासह 62 धावांची खेळी करीत दिलेली झुंज पुरेशी ठरली नाही. कर्णधार ऋषभ पंतने स्वैर फटका लगावीत विकेट गमावल्यावर त्याचेच अनुकरण करताना दिल्लीच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. विकास मिश्राने आक्रमक फटकेबाजी करीत अखेरची धडपड केल्यामुळे विदर्भाला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानावर उतरावे लागले. खेजरोलियाने फैझ फझलला बाद करीत दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. परंतु वासिम जाफरने (नाबाद 17) रामास्वामी संजयच्या (नाबाद 9) साथीत विदर्भाचा ऐतिहासिक विजय साकार केला.
 
संक्षिप्त धावफलक-
 
दिल्ली- पहिला डाव- 102.5 षटकांत सर्वबाद 295
 
(ध्रुव शोरे 145, हिंमत सिंग 66, नितिश राणा 21, ऋषभ पंत 21, गौतम गंभीर 15, कुणाल चांडेला 0, मनन शर्मा 13, गोलंदाजी- रजनीश गुरबानी 59-6, आदित्य ठाकरे 74-2, अक्षय वाखरे 34-1, सिद्धेश नेरळ 57-1)
दिल्ली- दुसरा डाव- 76 षटकांत सर्वबाद 280 (नितिश राणा 64, ध्रुव शोरे 62, गौतम गंभीर 36, विकास मिश्रा 34, ऋषभ पंत 32, अक्षय वाखरे 95-4, आदित्य सरवटे 30-3, रजनीश गुरबानी 92-2, सिद्धेश नेरळ 39-1)
 
पराभूत विरुद्ध विदर्भ- पहिला डाव- 163.4 षटकांत सर्वबाद 547
(अक्षय वाडकर 133, फैझ फझल 67, वासिम जाफर 78, आदित्य सरवटे 79, सिद्धेश नेरळ 74, रामास्वामी संजय 31, अपूर्व वानखेडे 28, आकाश सुदान 102-2, नलिन सैनी 135-5, खेजरोलिया 132-2, नितिश राणा 32-1)
दुसरा डाव- 5 षटकांत 1 बाद 32 (वासिम जाफर नाबाद 17, रामास्वामी संजय नाबाद 9, खेजरोलिया 21-1)
सामनावीर- रजनीश गुरबानी (151-8).