शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (17:09 IST)

वासिम जाफर यांचा राजीनामा

भारताचे माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांनी अलीकडेच उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकार्यांबरोबर झालेल्या वादानंतर वासिम जाफर यांनी हे पाऊल उचलले आहे. उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकार्यांनी जाफर यांच्यावर धर्मावर आधारित संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मात्र, जाफर यांनी हा आरोप फेटाळून लावला.
 
माहिम वर्मा यांनी मीडियामधून, माझ्यावर मी मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मला प्रचंड दुःख झाले आहे, असे जाफर यांनी सांगितले. 42 वर्षीय जाफर यांनी भारतासाठी 31 कसोटी सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये जाफर हे एक मोठे नाव आहे. माहिम वर्मा हे उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचिव आहेत. जाफर यांनी मंगळवारी उत्तराखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. हस्तक्षेप आणि पक्षपाती निवड समिती ही कारणे त्यांनी राजीनामा देताना दिली. संघ निवडीत जातीवादाचा अँगल आणणे, खूप दुःखद आहे असे जाफर पत्रकार परिषदेत म्हणाले. माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार, चुकीचे आहेत असे जाफर म्हणाले. मला जय बिस्ताला कर्णधार बनवायचे होते. पण रिझवान शमसाद आणि निवड समितीच्या अन्य सदस्यांनी इक्बालला कर्णधार बनवण्याचा पर्याय सुचवला. तो संघातील वरिष्ठ खेळाडू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.