1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जून 2023 (08:50 IST)

वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढतीचा मान कुणाला मिळणार?

india pakistan cricket
बहुप्रतीक्षित अशा आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक आज मुंबईत जाहीर होणार आहे.
 
आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर स्पर्धेसाठी हायब्रिड प्रारुप अवलंबण्यात आलं.
 
विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येऊन खेळणार का? यावरही प्रश्नचिन्ह होतं. भारत-पाकिस्तान ही बहुचर्चित लढत कुठे होणार यासाठी चाहते आतूर झाले आहेत.
 
5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत विश्वचषक भारतातल्या विविध शहरांमध्ये सामने होतील. मुंबईत विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर होणार आहे.
 
विश्वचषकाचा फॉरमॅट यंदा सोपा करण्यात आला आहे. प्राथमिक फेरीत सगळे संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. 4 अव्वल संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतील.
 
सेमी फायनलमधले 2 विजयी संघ फायनलमध्ये खेळतील. फायनल 19 नोव्हेंबरला अहमदाबाद इथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. प्राथमिक फेरीचे 45, सेमी फायनलचे 2 आणि फायनल असे एकूम 48 सामने होणार आहेत.
 
विश्वचषकात भारत-पाकिस्तान लढत नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू असते. यंदाचा विश्वचषक त्याला अपवाद नाही. वनडे विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान 7 वेळा एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत.
 
सातही सामन्यात भारताने विजयासह वर्चस्व गाजवलं आहे. 1996 विश्वचषकात भारत-पाकिस्तान लढतीचा मान बंगळुरूला मिळाला होता. 2011 विश्वचषकात भारत-पाकिस्तान लढत मोहालीत झाली होती.
 
विश्वचषकातील उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता इथे होण्याची शक्यता आहे. 2011 विश्वचषकावेळी फायनल मुंबईत झाली होती. 1987 मध्ये भारत आणि पाकिस्तान विश्वचषकाचे संयुक्त यजमान होते. 1996 साली भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी विश्वचषकाचं संयुक्त नियोजन केलं होतं. 2011 मध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेश विश्वचषकाचे यजमान होते.
 
दुरावलेल्या संबंधांमुळे भारतीय संघ पाकिस्तानात जाऊन खेळत नाही आणि पाकिस्तानचा संघ भारतात येत नाही.
 
आयसीसी स्पर्धांवेळी म्हणजेच वनडे विश्वचषक, ट्वेन्टी20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी अशावेळी पाकिस्तानचा संघ भारतात येऊन खेळतो. या सामन्यासाठी अभूतपूर्व अशी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येते. 2013 मध्ये पाकिस्तानचा संघ द्वपक्षीय मालिकेसाठी भारतात आला होता.
 
यजमान भारतासह अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका हे संघ विश्वचषकासाठी क्रमवारीतील स्थानानुसार पात्र ठरले आहेत.
 
अन्य दोन स्थानांसाठी सध्या पात्रता फेरीचे सामने सुरू आहेत. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघ यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने त्यांना पात्रता फेरीत खेळावे लागत आहे.
 
भारतीय संघाने 1983 साली विश्वचषक पटकावत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने विश्वविजेतेपदावर कब्जा केला होता.
 
विश्वचषक विजेते
1975- वेस्ट इंडिज
 
1979- वेस्ट इंडिज
 
1983- भारत
 
1987- ऑस्ट्रेलिया
 
1992- पाकिस्तान
 
1996- श्रीलंका
 
1999- ऑस्ट्रेलिया
 
2003- ऑस्ट्रेलिया
 
2007- ऑस्ट्रेलिया
 
2011- भारत
 
2015- ऑस्ट्रेलिया
 
2019- इंग्लंड