शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (16:32 IST)

WPL 2023 Auction : विमेन्स प्रीमिअर लीगसाठी आज लिलाव, जाणून घ्या 7 गोष्टी

'विमेन्स प्रीमिअर लीग' अर्थात महिलांच्या आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव आज मुंबईत झाला.
 
भारतात महिला क्रिकेट 1976 पासून खेळलं जात आहे. 2008 पासून पुरुषांची आयपीएल स्पर्धा होत आहे. यंदापासून वूमन्स प्रीमिअर लीगची सुरुवात होत आहे.
 
या स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर बंगळुरूने स्मृती मंधानाला 3.4 कोटी रुपये देऊ केले आहेत.
 
4 ते 26 मार्च या कालावधीत वीपीएल मुंबईत खेळवण्यात येईल.
 
विमेन्स प्रीमिअर लीगची तयारी म्हणून बीसीसीआयने 'ट्वेन्टी-20 चॅलेंज' नावाने स्पर्धा आयोजित केली होती. पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेदरम्यान चॅलेंज स्पर्धेच्या मॅचेस खेळवण्यात आल्या.
 
सुपरनोव्हा, ट्रेलब्लेजर्स आणि वेलोसिटी अशा नावाचे तीन संघ होते. भारताच्या प्रमुख खेळाडूंसह जगभरातील अव्वल खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.
 
लिलावाबाबत अधिक तपशील जाणून घेऊया.
 
लिलाव कुठे आहे?
मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेशन सेंटर इथे लिलाव होणार आहे.
 
सामने कुठे होणार?
पहिला हंगाम मुंबईतच होणार आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियम अशी तीन मैदानं उपलब्ध असल्याने लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने सामने आयोजित करणं सोयीचं आहे. पण अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही.
 
संघ कुठले आहेत?
वीपीएलमध्ये एकूण 5 संघ असणार असून त्यांचं एकूण मूल्य 4,669 कोटी रुपये एवढं आहे. अदानी स्पोर्ट्सलाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अहमदाबाद संघ खरेदी केला असून त्यासाठी 1,289 कोटी रुपये मोजले आहेत.
 
इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मुंबई संघ खरेदी करण्यासाठी 912 कोटी रुपये खर्च केले. रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने बंगळुरू संघासाठी 901 कोटी रुपये मोजले.
 
810 कोटी रक्कम देऊन जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडने तर कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडने 757 कोटी रुपये खर्चून लखनौचा संघ विकत घेतला आहे.
 
लिलावाचे नियम
लिलावात 90 खेळाडू संघाच्या ताफ्यात सामील होतील. लिलावात 448 खेळाडू असून त्यापैकी 269 भारतीय तर 179 विदेशी खेळाडू आहेत. प्रत्येक संघाला खेळाडू खरेदी करण्यासाठी 12 कोटी रुपये मिळणार आहेत.
 
प्रत्येक संघ 15 ते 18 खेळाडू खरेदी करु शकतो. प्रत्येक संघ सहा विदेशी खेळाडूंना ताफ्यात समाविष्ट करु शकतात. असोसिएट देशांचे खेळाडूही लिलावात असतील.
 
खेळाडूंना त्यांची बेस प्राईज 30 लाख, 40 लाख किंवा 50 लाख निश्चित करण्याचा अधिकार देण्यात आला होता. देशासाठी न खेळलेल्या खेळाडूंसाठी ही रक्कम 10 लाख आणि 20 लाख अशी निश्चित करण्यात आली आहे.
 
ऑस्ट्रेलिया (29), इंग्लंड (31), वेस्ट इंडिज (23), न्यूझीलंड (19) दक्षिण आफ्रिका (17) तर श्रीलंका (15) झिम्बाब्वे (11) खेळाडू असणार आहेत. बांगलादेश आणि थायलंडचे प्रत्येकी 9 खेळाडू असणार आहेत.
 
सर्वाधिक बेस प्राईज
24 खेळाडूंची बेस प्राईज सर्वोच्च गटात आहे. हरमनप्रीत कौर, स्मृती मन्धाना, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, पूजा वस्त्राकर, ऋचा घोष, स्नेह राणा, मेघना सिंग यांचा समावेश आहे.
 
अॅशले गार्डनर, एलियास पेरी, मेग लॅनिंग, अॅलिसा हिली, जेस जोनासन, डार्सी ब्राऊन या विदेशी खेळाडूंवर फ्रँचाइजींचं लक्ष असेल.
 
काही दिवसांपूर्वीच भारताच्या मुलींनी U19 महिला विश्वचषकावर नाव कोरलं होतं. या संघातील सर्व खेळाडूंची लिलावात आहेत.
 
लिलावकर्त्या कोण?
पहिल्यावहिल्या विमेन्स प्रीमिअर लीगच्या लिलावाची जबाबदारी बीसीसीआयने मल्लिका सागर यांच्याकडे सोपवली आहे. प्रो कबड्डी स्पर्धेसाठी झालेल्या लिलावाचं समन्वयन त्यांनी केलं आहे.
 
आर्ट कलेक्टर आणि कला क्षेत्रातील विविध लिलावांच्या समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेसाठी रिचर्ड मेडले आणि ह्यू एडमेडेस यांनी काम पाहिलं आहे.
 
सपोर्ट स्टाफ
इंग्लंडच्या माजी कर्णधार चार्लोट एडवर्ड्स विमेन्स प्रीमिअर लीगमधल्या मुंबई संघाच्या मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. भारताच्या माजी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी मुंबई संघाच्या मेन्टॉर असतील. भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडू देविका पळशीकर बॅटिंग कोच असणार आहेत.
 
राचेल हेन्स गुजरात जायंट्स संघाच्या मुख्य प्रशिक्षक असतील. गुजरात जायंट्सने हेन्स यांच्याव्यतिरिक्त भारताच्या माजी कर्णधार मिताली राज यांची मेन्टॉर म्हणून नियुक्ती केली आहे. भारताच्या U19 युवा संघाच्या प्रशिक्षक नूशीन अल खादीर बॉलिंग कोच तर तुषार आरोठे बॅटिंग कोच असणार आहेत.
 
उत्तर प्रदेश वॉरियोझ संघाने जॉन लुईस यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या बरोबरीने अंजू जैन (सहाय्यक कोच), अॅशले नॉफक (बॉलिंग कोच), लिला स्थळेकर (मेन्टॉर) असणार आहेत.