सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (18:30 IST)

Ravindra Jadeja : ICCची मोठी कारवाई रवींद्र जडेजाला दंड, ऑस्ट्रेलियन माध्यमांनी व्यक्त केलेला बॉल टेम्परिंगचा संशय

नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 132 धावांनी पराभूत केलं आहे.हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या बॉल आणि बॅटने चमत्कार केला.
 
दुसऱ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाला 91 धावांवर ऑलआउट केलं होतं. पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर 223 धावांनी आघाडी घेतली होती. इतकी मोठी आघाडी कमी करण्यात ऑस्ट्रेलियाला अपयश आलं.
 
रवींद्र जडेजाला दंड, चेंडू कुरतडल्याचा संशय
दरम्यान भारताच्या विजयाला वादाचंही गालबोट लागलं आहे. बॉर्डर-गावस्कर सीरिजच्या पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी बजावणाऱ्या रवींद्र जडेजाला दंड करण्यात आला आहे. मॅचच्या मानधानातून मिळणाऱ्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम ही दंडाच्या स्वरुपात घेतली जाईल. त्याच्यावर आयसीसीच्या आचार संहितेतील लेव्हल 1 च्या उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे.
 
मॅचच्या पहिल्याच दिवशी, गुरुवारी (9 फेब्रुवारी) जडेजाने अंपायरला न विचारता आपल्या हाताच्या सुजलेल्या बोटावर क्रीम लावली होती. त्यानंतर त्याच्यावर बॉल टॅपरिंगचा आरोप केला जातोय.
 
रवींद्र जडेलाला आयसीसीच्या आचार संहितेच्या अनुच्छेद 2.20 चं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं आहे. खिलाडूवृत्तीला धरुन कृती न केल्याप्रकरणी त्याला दंड करण्यात आला आहे.
 
नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपात त्याच्या शिस्तीच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पाँइट घालण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत हे त्यानं केलेलं नियमांचं पहिलं उल्लंघन आहे.
 
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात हे घडलं. 46 व्या ओव्हरमध्ये जडेजाने गोलंदाजी करण्याआधी मोहम्मद सिराजच्या हातातून क्रीम घेऊन आपल्या तर्जनीवर लावली होती. सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चाही झाली होती. जडेजावर बॉल टेंपरिंगचे आरोपही केले गेले.
 
ऑस्ट्रेलियन मीडियाने आणि ऑस्ट्रेलियातील काही माजी क्रिकेटपटूंनी जडेजावर बॉल टेंपरिंगचा संशय घेतला होता.
 
भारतीय टीम व्यवस्थापनाने जडेजाचा बचाव करताना म्हटलं होतं की, तो वेदना कमी करण्यासाठी आपल्या बोटाला क्रीम लावत होता.
 
मात्र, त्याने मैदानात उपस्थित असलेल्या अंपायरच्या परवानगीशिवाय क्रीम लावली होती. ही कृती आचारसंहितेचा भंग मानली जाते.
 
जडेजाने आपली चूक कबूल केली आहे. त्याने आयीसीसीचे मॅच रेफरी अँडी पिक्रॉफ्ट यांनी लावलेले निर्बंध मान्य केले आहेत. त्यामुळेच या प्रकरणाची कोणतीही औपचारिक सुनावणी झाली नाहीये.
 
तब्बल सहा महिन्यांनंतर जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. रवींद्र जडेजाने नागपूर टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या आणि 70 धावा केल्या होत्या. जडेजाने आपल्या टेस्ट करिअरमध्ये सहाव्यांदा 5 विकेट्स आणि अर्धशतक ही कामगिरी बजावली आहे.
गुरुवारी नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आयसीसीच्या आचारसंहितेचे लेव्हल 1 उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे," असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे.
 
Edited By- Priya Dixit