मंगळवार, 17 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

आरक्षणासाठी मराठा जात बदलणार नाही- शालिनीताई

ताठ मानेने जगणार्‍या मराठा समाजाने कधीच आरक्षणाची मागणी केलेली नसून कुटील राजकारण्यांचीच ही खेळी आहे. जातीवंत मराठा कधीच आरक्षणासाठी जात बदलणार नाही. आरक्षणासाठी मराठ्यांनी कुणबी होण्याची गरज नाही, अशी खरमरीत प्रतिक्रिया आमदार शालिनीताई पाटील यांनी 'वेबदु‍‍निया' शी दूरध्वनीवरून बोलताना दिली. आरक्षण रद्द करून गुणवत्तेवर आधारीत आरक्षण दिले तरच सर्व समाजास न्याय मिळेल ‍आणि जातीवादही संपुष्टात येईल असेही त्या म्हणाल्या.

मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करावा आणि त्यांना २५ टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा समाजातील सर्व संघटनांच्या तर्फे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना भेटून काल करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

आरक्षण आर्थिक निकषावर हव
''मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात माझी भूमिका नाही तर मराठ्यांबरोबरच मुसलमान, जैन, ब्राह्मण व समाजातील सर्व घटकांना आर्थिक निकषावर आधारीत आरक्षण मिळाले पाहिजे, असे सांगून त्या म्हणाल्या, गोरगरीब व गुणवत्ताधारकांना आरक्षण मिळाले तरच देशाची आणि समाजाची उन्नती होणार आहे. हीच भूमिका घेऊन गेल्या काही वर्षांपासून मी महाराष्ट्रात वातावरणनिर्मिती केली. ती लोकांना पटल्यामुळे केवळ मताचे राजकारण करणार्‍या कुटील राजकारण्यांच्या पायाखालची वाळू घसरली.

ही राजकारण्यांची खेळ
''मला शह देण्यासाठी याच राजकारण्यांनी समाजातील काही लोकांचे बाहुले उभे करून मराठ्यांच्या आरक्षणाची खेळी खेळली आहे. पण, आजपर्यंत ताठ मानेने जगलेल्या मराठा समाजात गुणवत्ता आहे. तो सुज्ञ आहे. जातीसाठी माती खाणारा नाही. आरक्षणासाठी कोणताही मराठा आपली जात बदलणार नाही आणि आरक्षणासाठी मराठ्यांनी कुणबी होण्याची गरजच नाही. मराठा आणि कुबणी समाज एकच आहे, असे काहीजण सांगत आहेत. असे असेल तर कुणबी समाजाला आरक्षण मिळते आणि मराठा समाजाला का मिळत नाही? याचे त्यांनी उत्तर द्यावे़,'' असे त्या म्हणाल्या.

डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी शब्द पाळावा
''समाजातील तळागाळातील घटकाच्या उन्नत्तीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींजींकडून केवळ दहा वर्षासाठी आरक्षण मागून घेतले होते. हे सर्व लिखित स्वरूपात झाल्यानंतर आरक्षणाची पध्दत सुरू झाली. मात्र, अजूनही जातीवर आधारीत आरक्षण सुरूच आहे. आज डॉ. आंबेडकर हयात असते तर त्यांनी आपला शब्द निश्चित पाळला असता. त्यांच्या अनुयायांनी हा शब्द पाळला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

हे तर मते मिळविण्याचे राजकार
आरक्षणासारख्या निर्णयामुळे देशावर, समाजावर काय परिणाम होईल याचा कोणीच विचार करीत नाही. मुळ प्रश्नाला बगल दिली जात आहे, असा आरोप करून त्या म्हणाल्या, ''लाचार राजकारणी तत्व विसरून केवळ आपल्या मताच्या पेट्या भरण्यासाठी खटाटोप करत आहेत. म्हणूनच मला क्रांती सेनेच्या वतीने बंडाचे निशाण हाती घ्यावे लागले. जातीच्या आरक्षणाच्या कुबड्या काढून टाकून समाजातील, मग तो कोणत्याही जातीचा असो, गोरगरीब व गुणवत्ताधारकांना आरक्षण मिळाल्यास देशाचा विकास होणार आहे. अथवा देश-समाज मोठा करण्याचे स्वप्न विरून जाईल.''
(शब्दांकनः किरण जोशी)

अहंकार नडला नि मराठा मागे पडला- खेडेकर