रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By अभिनय कुलकर्णी|

स्वरऋषी

NDND
स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म कर्नाटकतील गदग येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे लहानपण याच गावात गेले. पंडितजींना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. पण त्यांच्या वडिलांना मात्र भीमसेनने चांगले शिक्षण घ्यावे आणि डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे असे वाटत होते. पण भीमसेनचा ओढा मात्र संगीताकडेच होता. संगीताच्या याच ध्यासापोटी ते घर सोडून पळून गेले. मग पुढे ते ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या उत्तर भारतातील शहरांत गेले. तिथे जाऊन त्यांनी खूप संगीत ऐकलं. त्यासाठी पडेल ती कामं केली.

सुरवातीला ते ग्वाल्हेरमध्ये गेले. संगीतातल्या ग्वाल्हेर घराण्याचं हे आश्रयस्थान. तिथेच ते एका संगीत कंपनीत काम करू लागले. काम करता करता शिकूही लागले. पण तरीही समाधान काही होईना. एकावेळी पंडितजींच्या वडिलांना अखेर त्यांचा ठावाठिकाणा सापडला आणि हा मुलगा त्याच्याच कलाने जाणार हेही त्यांना कळलं. मग त्यांनी पंडितजींना शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी कुंदगोळच्या सवाई गंधर्वांकडे नेलं. पंडितजींनी लहानपणी सवाई गंधर्वांना ऐकलं होतं. त्यांचे शिष्यत्व पत्करण्याचीच त्यांची इच्छा होती. ती अशा रितीने अगदी योगायोगाने पूर्ण झाली. यानंतर पंडितजींचं गाणं खर्‍या अर्थाने तळपू लागलं. सवाई गंधर्वांनी या कर्नाटकी हिर्‍याला पैलू पाडले आणि आणि देदिप्यमान स्वरपुंजाची देणगी जगाला दिली.

  ते अत्यंत कुशल चालकही आहेत. वेगाचे त्यांना भयंकर आकर्षण. त्यामुळे ते गाडी चालवत असताना गाडी सुसाट धावायची. मध्ये खड्डे आहेत की गतिरोधके हेही ते पहायचे नाहीत. यामुळेच एकदोनदा ते अपघातातूनही वाचले.      
या काळात ते कर्नाटकी संगीत नाटकाच्या प्रयोगासाठी एकदा मुंबईत आले. त्यावेळी त्यांचे गायन एचएमव्हीच्या एका अधिकार्‍याने ऐकले आणि त्याला या पोरगेल्या भीमसेनचा आवाज फार आवडला. त्यांनी त्याच्या दोन हिंदी व दोन कन्नड भजनांच्या रेकॉर्ड काढल्या. त्या खूप गाजल्या. त्यानंत पुन्हा रेकॉर्ड काढल्या. त्याही गाजल्या. अशा रितीने संगीत क्षेत्रात पंडितजींचे नाव तळपू लागले. भीमसेनजींची लोकप्रियता वाढू लागली तशी त्यांना गाण्याची निमंत्रणे सुद्धा दुरून येऊ लागली. ही निमंत्रणे पूर्ण करण्यासाठी मग पंडितजींनी एक भलीमोठी कार घेतली. तीत त्यांचे चार साथीदारही वाद्यांसह आरामात बसू शकायचे. या काळात भीमसेनजींनी प्रचंड प्रवास केला. एका दिवशी ते मुंबईहून बेळगावला गेले की दुसर्‍या दिवशी बंगलोर त्यानंतर पुण्याला येऊन नागपूर मग रायपूर आणि भिलई. मग पुन्हा पुण्याला येऊन हैदराबाद, सोलापूर... असा अफाट प्रवास असायचा. ते अत्यंत कुशल चालकही आहेत. वेगाचे त्यांना भयंकर आकर्षण. त्यामुळे ते गाडी चालवत असताना गाडी सुसाट धावायची. मध्ये खड्डे आहेत की गतिरोधके हेही ते पहायचे नाहीत. यामुळेच एकदोनदा ते अपघातातूनही वाचले.

  त्याकाळी त्यांनी विमानातून एवढा प्रवास केला की विमानतळावरचे कर्मचारीही त्यांनी ओळखू लागले. त्यांच्या या प्रचंड विमान प्रवासाने त्यांना 'फ्लाईंग म्युझिशियन ऑफ इंडिया' असेही म्हटले जाऊ लागले.      
आता भीमसेनजींची किर्ती बरीच वाढू लागली होती. मराठी प्रांताबाहेरही त्यांना गाण्याची निमंत्रणे येऊ लागली. जालंधर, जम्मू, श्रीनगर, दिल्ली, कलकत्ता, गुवाहाटी अशा अनेक शहरातून पंडितजींना मागणी होती. मग आज दिल्ली तर उद्या कलकत्ता, परवा मुंबई तेरवा आणखी कुठे असा लांबचा प्रवास सुरू झाला. आता त्यांना कारऐवजी विमानाचा वापर करावा लागला. त्याकाळी त्यांनी विमानातून एवढा प्रवास केला की विमानतळावरचे कर्मचारीही त्यांनी ओळखू लागले. त्यांच्या या प्रचंड विमान प्रवासाने त्यांना 'फ्लाईंग म्युझिशियन ऑफ इंडिया' असेही म्हटले जाऊ लागले.

पुढे त्यांच्या गायकीच्या अनेक तबकड्या निघाल्या. शास्त्रीय संगीतापासून संतवाणीपर्यंत अनेक कॅसेट्स निघाल्या. त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आणि देशाच्या संगीत क्षितिजावर त्यांचे नाव मानाने तेजाने झळकू लागले.

पंडितजींच्या गाण्याचे एक वैशिष्ट्य आहे. त्यांना समोरच्या श्रोत्यांची नस चटकन कळते. त्यानुसार ते गातात. त्यामुळे त्यांच्या सगळ्याच मैफली रंगतात. ही नस पकडल्यानंतर ते अशी काही सम गाठतात की श्रोत्यांनाही वाह वाह अशी दाद द्यावी लागते. त्यांचे गायन अष्टपैलू आहे. ख्याल गायकीत तर त्यांचा हात धरणारा कोणी नाही. पण त्याशिवाय ते ठुमरी, नाट्यसंगीतही ते तितक्याच जोरकसपणे गातात. त्यांची संतवाणी तर अजरामर आहे. त्याविषयी काय बोलायचे?

पंडितजी असामान्य आहेत. चमत्कार आहेत. त्यांनी आपल्याला जे दिलं ते कधीही संपणारं नाही. ते वाहत राहिल एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे. पण आटणार नाही. संगीताची ही गंगा वाहणारी आहे. निरंतर....

स्वरभास्कराला भारतरत्नाचं कोंदण