बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 20 जुलै 2024 (09:06 IST)

चंद्रावर सापडली 100 मीटर खोल गुहा! इथे माणूस राहू शकणार का?

clear pic of Moon
वैज्ञानिकांना पहिल्यांदाच चंद्रावर गुहा सापडली आहे.किमान 100 मीटर खोली असणारी ही गुहा कदाचित माणसांना राहण्यासाठी योग्य असू शकते, इथे एक कायमचा तळ तयार करता येऊ शकतो असा संशोधकांचा कयास आहे.अशा अजूनही न सापडलेल्या शेकडो भूमिगत गुहा असण्याची शक्यता असल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे.
चंद्रावर कायमस्वरूपी मानवी तळ उभारण्यासाठी सध्या देशांमध्ये चढाओढ लागलेली आहे. पण त्यासाठी त्यांना अंतराळवीरांचं रेडिएशन, बाहेरचं तापमान आणि अंतराळातील हवामान या सगळ्यापासून संरक्षण करणं गरजेचं असेल.
 
सापडलेली ही गुहा ही चंद्रावरचा मानवी तळ उभारण्यासाठीची चांगली जागा वाटत असून येत्या 20-30 वर्षांमध्ये माणूस कदाचित या Lunar Pits म्हणजेच चंद्रावरच्या गुहांमध्ये राहत असेल, असं पहिल्या ब्रिटीश अंतराळवीर हेलन शार्मन यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं.
 
पण ही गुहा खोल असल्याने अंतराळवीरांना हा उभा कातळ उतरून (Abseil) खाली जावं लागेल आणि बाहेर पडण्यासाठी जेट पॅक्स किंवा लिफ्टचा वापर करावा लागेल, असंही त्या सांगतात.
इटलीतल्या युनिव्हर्सिटी ऑफ ट्रेन्टोमधील लोरेंन्झो ब्रुझोन आणि लिओनार्डो कॅरेर यांनी या गुहेचा शोध लावला. चंद्रावरील मारे ट्रँक्विलिटाटिस (Mare Tranquillitatis) म्हणजे सी ऑफ ट्रँक्विलिटी या खडकाळ भागामध्ये या गुहेचं तोंड उघडतं. रडारच्या मदतीने या दोघांनी गुहेच्या आतला वेध घेतला.
 
मारे (Mare) म्हणजे समुद्र. चंद्रावरच्या ज्या जागेला हे नाव देण्यात आलंय तिथे कदाचित एकेकाळी समुद्र होता. चंद्रावरची ही सी ऑफ टँक्विलिटीची जागा पृथ्वीवरून नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकते. याच ठिकाणी 55 वर्षांपूर्वी 20 जुलै 1969मध्ये नासाचं अपोलो 11 अंतराळयान उतरलं होतं.
या गुहेचं तोंड चंद्राच्या पृष्ठभागावर उघडत असल्याने तिथे उजेड आहे, त्यानंतर मात्र ती सरळ आत उतरते आणि यात बाहेर आलेले कडेही (Overhanging Walls) आहेत. गुहेच्या तळाशी उतार दिसत असून ती जमिनीखाली पुढेही गेली असण्याची शक्यता आहे.
 
चंद्रावर अब्जावधी वर्षांपूर्वी लाव्हा वाहिला, त्याने तिथल्या खडकांमध्ये बोगदे तयार झाले, त्यावेळी ही गुहा तयार झाली असण्याचा अंदाज आहे.
 
पृथ्वीवरच्या एखाद्या गुहेसोबत या चंद्रावरच्या गुहेची तुलना करायची झाली, तर ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या स्पेनमधील लांझारोते गुहांशी याचं साधर्म्य असल्याचं प्रा. कॅरेर सांगतात. संशोधन करताना आपण स्पेनमधल्या या गुहांना भेट दिल्याचंही ते सांगतात.
ही गुहा किती मोठी आहे हे कळल्यानंतर तिचा वापर लुनार बेस म्हणजेच चंद्रावरील तळ म्हणून होऊ शकतो, हे प्रा. ब्रुझोन आणि प्रा. कॅरेर यांच्या लक्षात आलं.
 
प्रा. कॅरेर म्हणतात, "हे अतिशय उत्कंठावर्धक आहे. तुम्हाला असा शोध लागतो, तुम्ही हे फोटो पाहता आणि तुमच्या लक्षात येतं ही मानवी इतिहासात हे पाहणारे तुम्ही पहिले आहात! पृथ्वीवर गुहांमधूनच आयुष्याला सुरुवात झाली होती. म्हणूनच मग चंद्रावरही मानवाला गुहांमध्ये राहता येण्याची शक्यता आहे."
 
या गुहेचा अद्याप पूर्णपणे शोध घेण्यात आलेला नाही, पण तळापर्यंत वेध घेऊ शकणारं रडार (ground-penetrating radar) आणि अगदी रोबोंची मदत घेऊनही ही गुहा किती मोठी आहे याचा शोध घेता येईल.
 
चंद्रावर गुहा आहेत याचा अंदाज वैज्ञानिकांना सुमारे 50 वर्षांपूर्वी आला होता. त्यानंतर 2010 साली 'लुनार रिकनेसान्स ऑर्बिटर'(Lunar Reconnaissance Orbiter) या मिशनने काही विवरांचे फोटो काढले होते. हे खड्डे म्हणजे गुहांचं मुख असल्याचं तेव्हा वैज्ञानिकांना वाटलं.
पण या दऱ्या किती खोल असतील किंवा त्या कोसळण्याची शक्यता आहे का, हे त्यावेळी संशोधकांना माहिती नव्हतं.
 
प्रा. ब्रुझोन आणि प्रा. कॅरेर यांच्या संशोधनांमुळे यातल्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली असली, तरी या गुहांबद्दल पूर्णपणे समजून घेण्यासाठी अजून बरंच संधोधन होणं, माहिती मिळणं बाकी आहे.
 
युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्लॅनेटरी केव्हज टीमचे समन्वयक फ्रान्सेस्को सॉरो यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं, "आमच्याकडे पृष्ठभागाचे अतिशय चांगले फोटो आहेत...अगदी 25 सेंटीमीटर्सपर्यंतच्या रेझोल्यूशनचे. अपोलो मोहिमा जिथे लँड झाल्या ती जागाही आपण पाहू शकतो. पण या पृष्ठभागाच्या खाली काय आहे, याबद्दल मात्र आपल्याला काहीच माहिती नाही. म्हणूनच शोधाला अजून बराच वाव आहे."
 
या संशोधनाच्या मदतीने भविष्यात मंगळावरील गुहांचाही शोध घेण्यासाठी मदत होण्याची शक्यता असल्याचं संशोधकांना वाटत असल्याचं ते सांगतात.
असं झालं तर कदाचित मंगळावर जीवसृष्टी होती का, याचा शोध घेण्यासाठीचा हा मार्ग ठरले. कारण जर कधीकाळी मंगळावर जीवसृष्टी असेल तर तर ग्रहाच्या पृष्ठभागावरील गोष्टींपासून संरक्षण घेण्यासाठी त्यांनी कधी ना कधी गुहांमध्ये आसरा घेतला असण्याची दाट शक्यता आहे.
 
चंद्रावरील या गुहेचा मानवांना कदाचित फायदा होईल. पण या गुहेमुळे चंद्राच्या इतिहासाबद्दलच्या आणि अगदी सौरमालेबद्दलच्या काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं मिळायला मदत होणार असल्याचं संशोधक सांगतात.
 
चंद्राबद्दलचं संशोधन करण्यासाठी आजवर चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीचे दगडांचे नमुने गोळा करण्यात आले. पण त्यावर अंतराळातील हवमानाचा परिणाम झालेला असतो. पण या अशा गुहांमधील खडकाचं अंतराळातील हवामानामुळे इतकं नुकसान झालेलं नसेल, या खडकांची धूप झालेली नसेल. त्यामुळे अब्जावधी वर्षांपूर्वीची भूवैज्ञानिक (Geological) माहिती यातून सखोल मिळू शकेल.
 
चंद्रावरील गुहेबद्दलचं हे संशोधन नेचर अॅस्ट्रॉनॉमी या विज्ञानविषयक जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलंय.
ग्राफिक्स : गॅरी फ्लेचर

Published By- Priya Dixit