गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2023 (14:22 IST)

शासनाच्या दृष्टीने बदलता जिल्हा

nashik
A changing district in terms of governance जिल्ह्यातील नागरिकांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी व प्रत्येक शेवटच्या घटकाला विकासाच्या प्रवाहात सामिल करून त्यांना आवश्यक सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावरून सातत्याने प्रयत्न होत आहेत. शासकीय योजनांची माहिती व लाभ संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहाेचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’उपक्रम राज्य शासनाच्यावतीने संपूर्ण राज्यभरात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
 
राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सहभागी व्हावेत या उद्देशाने 1977 मध्ये राष्ट्रीय सैनिकी पूर्व शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे स्थापन करण्यात आली होती. याच धर्तीवर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलींचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिने नाशिक येथे शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था 10 जानेवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासना मार्फत मंजूर करण्यात आली असून या प्रशिक्षण संस्थेत जून, 2023 पासून प्रवेश प्रक्रीया देखील सुरू आहे. या प्रशिक्षण संस्थेत प्रथम व द्वितीय वर्षासाठी प्रत्येकी 30 विद्यार्थींनीना प्रवेश दिला जाणार आहे. या शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून केवळ नाशिक मधीलच नाहीतर राज्यातील मुलींचाही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सहभाग वाढणार असून मुलींच्या प्रगतीसाठी राज्य शासनाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.
 
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे मार्च, 2023 मध्ये जिल्ह्यातील साधारण नऊ हजार 176 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्या बाधित शेतकरी बांधवांसाठी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनामार्फत अंदाजे 17 कोटी 36 लाख 36 हजार रुपयांची मदत मंजूर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.
 
जिल्ह्यात 2022-23 या वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगामात साधारण 1 लाख 63 हजार 971 सहभागी शेतकऱ्यांतील 63 हजार 782 शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी 16 कोटी 55 लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तसेच पीक काढणी पश्चात 9 हजार 169 शेतकऱ्यांना 3 कोटी 34 लाख अनुदान पीक विमा कंपनीमार्फत वितरीत करण्यात आले आहे. तसेच नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनात अग्रेसर जिल्हा असल्याने केंद्र समुह विकास कार्यक्रमाअंतर्गत नाशिक द्राक्ष क्लस्टरसाठी तीनशे कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे.
 
संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’म्हणून घोषित केले आहे. त्या औचित्याने तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीबरोबरच तृणधान्याचा आहारातील समावेश वाढविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात कृषी विभागाच्यावतीने साधारण तीन ते चार हजार कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रीया योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना यांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून सर्व शेतकऱ्यांना या योजनांचा आवश्यक लाभ देण्यात येत आहे.
 
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व गुढीपाडवा निमित्त जिल्ह्यात 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’चे साधारण 7 लाख सहा हजार 413 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला आहे.
 
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासकीय सेवेत 75 हजार पद भरती करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नियुक्ती प्राधिकारी स्तरावरील सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर 449 उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. शासनाने केलेल्या अनुकंपा भरतीमुळे अनेक कुटुंबांचे भविष्य सुरक्षित होण्यास सहाय्य झाले आहे.
 
राज्यातील जनतेस आरोग्य विज्ञानाबाबत शिक्षण व आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनामार्फत सार्वजनिक हिताच्या प्रयोजनार्थ नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यासाठी 20 एप्रिल 2023 रोजी मान्यता देण्यात आली आहे. या पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय व संलग्नित रूग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी नाशिक मौजे म्हसरुळ येथील 14 हेक्टर जागा हस्तांतरण करण्यास देखील राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.
 
जनतेचे आरोग्य चांगले रहावे यासाठी त्यांना आवश्यक आरोग्य सुविधा, औषधोपचार उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात धर्मवीर आनंदजी दिघे महाआरोग्य अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यमातून साधारण दहा लाख 25 हजार 192 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. तसेच 2 हजार 214 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रीया केल्या असून 24 हजार 781 इतर आजारांचे निदान करून रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करून पुढील उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ‘जागरुक पालक व सुदृढ बालक’ या मोहिमे अंतर्गत ग्रामीण भागातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील अंदाजे 9 लाख 16 हजार 223 बालकांची तपासणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांत अंगणवाडीतील 4 लाख 49 हजार 111 तर शाळेतील 7 लाख 48 हजार 441 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच त्यात 225 ह्रदयरोगाच्या शस्त्रक्रीया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने गेल्या वर्षभरात सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने विविध योजना उपलब्ध करून दिल्या असून त्या योजनांची अंमलबजावणी देखील जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू आहे.
 
ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मागील वर्षी 27.22 लक्ष मनुष्य दिवसांची निर्मीती करण्यात आली. तर मागील 15 वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षभरात 101 कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी खर्च करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, बागलाण, येवला, पेठ व सुरगाणा या तालुक्यात अधिक कामकाज झाले आहे. या माध्यमातून साधारण एक लाख 89 हजार 975 व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
 
राज्य शासनाने 19 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारीत वाळू धोरण निश्चित केले आहे. या सुधारीत वाळू धोरणानुसार अनधिकृत वाळू उत्खननास आळा बसून सामान्य नागरिकांना व बांधकाम व्यवसायिकांना बांधकामासाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध होणार आहे. या नवीन वाळू धोरणानुसार निफाड तालुक्यातील चांदोरी येथे जिल्ह्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.
 
राज्य शासनाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात शासनामार्फत शैक्षणिक, आरोग्य, कृषी, वैद्यकीय, रोजगार अशा विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यातूनच गतिमान शासनाच्या साथीने जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला गती मिळत आहे.
 
राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिक जिल्हा…
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, अभ्यासिका, मुला मुलींचे वसतीगृह सुरू करण्यासाठी 50 कोटींची तरतूद नाशिक पंचवटी येथे आदिवासी संकुलासाठी 99 कोटींची तरतूद
जिल्ह्याला भविष्यात पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून किकवी धरण उभारण्यासाठी 36 कोटींची तरतूद
त्र्यंबकेश्वर येथून निघणाऱ्या संत निवृत्तीनाथ निर्मलवारीसाठी 50 कोटींची तरतूद
12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थस्थळाच्या विकासासाठी देखील अर्थसंकल्पात तरतूद
 नाशिकसह राज्यातील दोन जिल्ह्यांमधील उद्यानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जीवन गाथा प्रदर्शित करण्यासाठी 250 कोटींच्या निधीला अर्थसंकल्पात मान्यता
Edited by : Ratnadeep Ranshoor