शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (09:22 IST)

वायुप्रदूषण धोक्याची घंटा, जागतिक चिंता

वाढणाऱ्या वायुप्रदूषणामुळे जगातील १५ वर्षांखालील ९३ टक्के लहान मुलांच्या शरीरात श्वसनाद्वारे विषारी वायू जात आहेत. याचा गंभीर परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१६च्या अहवालानुसार, वातावरणातील वाढत्या वायुप्रदूषणामुळे श्वसनप्रक्रियेवर परिणाम होऊन सहा लाख लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे वायुप्रदूषणाची समस्या ही आता वैश्विक पातळीवरील गंभीर धोका असल्याची चिंता जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘वायुप्रदूषण आणि बालकांचे आरोग्य’ या प्रसिद्ध झालेल्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
 
अहवालानुसार, जगातील १८० कोटी लहान मुलांचा जीव विषारी वायूच्या श्वसनामुळे धोक्यात आला आहे. वातावरणातील वायुप्रदूषण आणि घरातील वायुप्रदूषण या दोन्ही घटकांचा लहानग्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. विशेषत: कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशात ही समस्या दिसून येत आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे, या वायुप्रदूषणाचा गर्भवतींच्या आरोग्यावरदेखील गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे मुदतीपूर्व प्रसूतींचे प्रमाण वाढले आहे. त्या कमी वजनाच्या बालकांना जन्म देत आहेत.