सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 मे 2020 (12:14 IST)

भाजपवरील टीका...

सत्ताधार्यांचा कांगावेखोरपणा...

सध्या महाराष्ट्रातील महाआघाडी नामक कडबोळे सरकार आणि केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार यांच्यात जोरदार संघषर्र् सुरु असल्याचे दिसते आहे. त्यातही महाराष्ट्रातील भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाआघाडीतील दिग्गजांसह मुंबई-पुण्यातील माध्यमांनीही टारगेट केल्याचेही दिसून येते आहे. हा टारगेट करताना अनेकदा पातळी सोडूनही टिका होत असलेली दिसून येते आहे. एकूणच महाराष्ट्रातील राजकारण तपाल्याचे जाणवते आहे.
 
देवेंद्र फडणवीसांनाच टारगेट करण्याचे नेमके कारण काय असा प्रश्न इथे वाचकांच्या मनात निश्चित उपस्थित होईल. इथे एक बाब नमूद करायला हवी की महाआघाडीच्या बाजूने फडणवीसांवर टीका करणारी सर्वच मंडळी नको तेवढी आक्रमक आहेत. त्या तुलनेत प्रतिवाद करण्यासाठी भाजप समर्थक तितकेसे आक्रमक दिसत नाही. 
फडणवीसांना टारगेट करण्यामागे शिवसेनेची आसुरी सत्तालालसा हे खरे कारण असल्याचे दिसून येते. ही सत्तालालसा साध्य करताना शिवसेनेने विधीनिषेध आणि नैतिकता गुंडाळून ठेवत शत्रूशीच मैत्री करण्याचे उद्योग केले आहेत. ज्यांना सोबत घेत निवडणूक लढवली आणि ज्या शिवसेना भाजपा युतीला जनतेने सत्ता स्थापनेचा कौल दिला होता त्या भाजपशी आणि महायुतीतील इतर पक्षांशी धोकेबाजी करत शिवसेनेने महाराष्ट्रात सत्ता मिळविली. ही सत्ता मिळविण्यासाठी जशी भाजपशी धोकेबाजी केली तशीच ज्यांच्या विरोधात निवडणूक लढले त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी तत्वशून्य युतीही केली. भाजपशी काडीमोड घेताना ज्या दाव्यांना कोणीही साक्षीदार नाहीत असे दावे पुढे करत कांगावेखोर  वर्तनही शिवसेनेने यावेळी करुन दाखवले.
एकूणच अनैतिक पद्धतीने मिळविलेली सत्ता चालवताना मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांना चांगलाच नेट लागायला लागला. भरीसभर म्हणून त्यांच्या दुर्दैवाने महाराष्ट्रावर कोरोनाचे आरिष्ट येऊन ठेपले. प्रशासनाचा काहीही अनुभव नसल्याने आणि इतर मित्रपक्ष तसेच स्वपक्षातील ज्येष्ठांचे एकतर मार्गदर्शन नसल्याने किंवा मार्गदर्शन असेलही तरी त्याकडे दुर्लक्ष करायचे असे ठरले असल्याने या आरिष्टाशी सामना करणे उद्धवपंतांसाठी शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड होऊन बसले आहे.
 
सुरुवातीला भाजप समर्थकांनी या अभद्र युतीवर टीका केली असेलही मात्र सर्वसामान्य जनतेने एक नवा प्रयोग म्हणून हे सरकार स्वीकारले होते. मात्र आज राज्यात निर्माण झालेली परिस्थिती बघता जनसामान्यांचाही या सरकारवरील आणि या महाआघाडीच्या प्रयोगावरील विश्वास डळमळीत होतांना दिसतो आहे. हे सर्व होत असतानाच वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेल्या चुकाही महाआघाडीला विशेषतः शिवसेनेला चांगल्याच महागात पडत आहेत. उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेत नियुक्ती करण्याबाबतचा प्रकार हे त्याचेच ढळढळीत उदाहरण म्हणता येईल. अजूनही बरीच उदाहरणे इथे सापडू शकतात.
 
असे असताना आपल्या चुका दुरुस्त न करता महाआघाडीतील दिग्गज आणि त्यांचे समर्थक भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडण्यातच धन्यता मानत आहेत. या मागचे कारण तर स्पष्टच आहे जेव्हा आपण चुकलो आहे हे माहित असते आणि चुक तर मान्य करायची नसते त्यावेळी चूक करणारा गुन्हेगार जास्त आक्रमकपणे समोरच्यावर टीका करीत असतो. हा मनुष्य स्वभावच आहे. याच धर्तीवर सध्या फडणवीसांवर टीका केली जाते आहे. आपण भाजपला धोका देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर जनतेला अपेक्षित न्याय आपण देऊ शकलो नाही. याची जाणीव झाल्यामुळे आता आपल्यावर बोल येऊ नये, म्हणून हा महाआघाडी समर्थकांचा कांगावा सुरू असल्याचा निष्कर्ष काढता येतो. मात्र महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे. त्यांना दूध कोणते आणि पाणी कोणते हा नीर क्षीर विवेक निश्चित आहे याची जाणीव टीकाकारांनी ठेवायला हवी.
 
गेल्या आठवड्यात दिल्लीतील ज्येष्ठ मराठी पत्रकार रामराजे शिंदे यांचा ठाकरे आणि फडणवीस या शीर्षकाचा लेख समाज माध्यमांवर प्रसारित झाला. या लेखात रामराजेंनी ठाकरे आणि फडणवीसांच्या कार्यशैलीवर लिहिताना त्यांच्यासमोर असलेल्या अडचणींचा आढावा सुद्धा घेतला आहे.
 
सध्या माध्यमे आक्रमकपणे फडणवीसांवर टीका करीत असतानाच रामराजेंनी मात्र तटस्थपणे दोघांचेही मूल्यमापन केलेले असल्याचे लेख वाचल्यावर जाणवते. सद्यस्थितीत महाराष्ट्राची परिस्थिती बघता ठाकरे सरकार पूर्णतः अयशस्वी ठरलल्याचे दिसून येते. आज देशातील एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रात 33 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. तरीही उद्धव ठाकरे म्हणतात की, आम्ही कोरोनाला आटोक्यात ठेवले आहे. जागतिक आकडेवारी बघितली तरी जगभरातील रुग्णांच्या तुलनेत एक टक्का रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. ही आकडेवारी काही सुखावह नाही.
 
बरे ही लढाई लढताना ठाकरे सरकारमधील कोणीही जबाबदार मंत्री मैदानात आलेला दिसत नाही. स्वतः उद्धवपंत ठाकरेही आपल्या मातोश्री बंगल्यात बसून सूत्रसंचालन करीत आहेत. त्यांना ठिकठिकाणचा राजकीय फिडबॅक त्यांचे विश्वासू सहकारी संजय राऊत देत आहेत. उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला बोलताना कोरोनाची लढाई ही महाभारतातील युद्ध असल्याचा उल्लेख केल्याचे मला आठवते. त्यांच्या या उल्लेखाचा संदर्भ घेत एका टिकाकाराने टीका केली आहे की या युद्धात उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्रासारखे मातोश्री बंगल्यात बसले आहेत आणि महाभारतासारखेच संजय त्यांना युद्धाचे वर्णन ऐकवत आहेत. उद्धव ठाकरे सोडले तर शिवसेनेचा कोणीही मंत्री मैदानात आलेला दिसत नाही. इतकेच काय तर सामान्य शिवसैनिकही या लढाईत फारसे सक्रीय दिसत नाहीत. एका राजकीय विश्लेषकाने यासंदर्भात लिहिताना आठवण दिली होती की, बाळासाहेब ठाकरे असताना ते कधीच मातोश्री बाहेर जायचे नाहीत. मात्र असे कोणतेही अरिष्ट ओढवले की बाळासाहेबांच्या इशार्यावर लाखो शिवसैनिक रस्त्यावर येऊन मदतकार्य सुरू करायचे. आज असे शिवसेनेचे मदत कार्य कुठेच सुरु असलेले दिसत नाही. त्याच बरोबर राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे वगळता कोणतेही मंत्री मैदानात उतरलेले जाणवत नाही. त्या तुलनेत विरोधी पक्ष असलेला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र मदत कार्यात आघाडी घेतलेली आहे.
 
अडचणीच्या परिस्थितीत हेवेदावे बाजूला ठेवून सरकारला मदत करावी हे भारतीय राजकारणातील प्रमुख सूत्र आहे. त्यानुसार प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने राज्यातील ठाकरे सरकारशी सहकार्याची भावना ठेवूनच या काळात वाटचाल सुरु केली होती. मात्र महाआघाडीतील नेत्यांनी विधानपरिषद निवडणूकीचा मुद्दा पुढे करत भाजपवर टीका सुरु  केली. तरीही सुमारे 2 महिने भाजपची सहकार्याची भावना होती. या काळात सत्ताधारी मात्र भाजपवर राजकारण करीत असल्याचा आरोप वारंवार करत होते. सुमारे दीड महिना उलटल्यानंतर भाजपने आपण सहकार्य करीत असूनही परिस्थिती आटोक्यात येत नाही आणि त्यासाठी राज्यसरकार जितके गंभीर असायला हवे तितके गंभीर दिसत नाही हे लक्षात आल्यावर मग मात्र सरकारच्या चुका दाखवून टीका करायला सुरुवात केली. या टीकेसोबत भाजपने सरकारविरोधात आंदोलनेही केले. मात्र यातून शहाणपणा स्वीकारण्या ऐवजी सत्ताधारी महाआघाडीने पुन्हा कांगावेखोरपणाच सुरु केला आहे.
 
आज विरोधीपक्षाने सरकारला सहकार्य करायला हवे अशी भावना सत्ताधारी महाआघाडी करते आहे. मात्र फडणवीसांच्या पाच वर्षाच्या काराभारात विरोेधक कांँग्रेस आणि राष्ट्रवादीने यांच्यासमोर कृत्रिम अडचणी निर्माण केल्या आणि त्या अडचणींचा आधार घेऊन सत्तेत भागीदार असणारी शिवसेना कायम भाजपला अडचणीत आणत राहिली. यात तुमचे राजकारण नव्हते काय असा सवाल आता जनता विचारते आहे. मात्र सत्ताधारी भाजपला खलनायक ठरवण्याचच मागे भिडलेले दिसत आहे.
 
भारतीय जनता पक्ष हा सध्या राज्यात प्रमुख विरोधी पक्ष आहे. 288 च्या सभागृहात 105 जागा भाजपने घेतल्या आहेत. म्हणजेच भाजपचे संख्याबळही लक्षणीय आहे. राज्यावर अडचणी आल्या असताना जसे सहकार्य करणे ही विरोधी पक्षाची जबाबदारी आहे तसेच वाट चुकलेल्या सरकारला ताळ्यावर आणणे ही देखील विरोधी पक्षांचीच जबाबदारी आहे. अशावेळी जर सरकार चुकत असेल असे जाणवले तर भाजपने आंदोलनात्मक पवित्रा घेत सरकारला चुका दाखवल्या तर त्यात वावगे काय? मात्र सत्ताधार्यांनाच राजकारण करायचे असल्यामुळे ते भाजपला खलनायक ठरविण्याच्या मागे भिडलेले दिसत आहेत.
 
आम्ही परिस्थिती आटोक्यात ठेवली असा दावा सरकारन करत असले तरीही तो दावा किती पोकळ आहे हे एकूण परिस्थितीचा आढावा घेतला की लक्षात येते. आज देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या एक तृतीयांश पेक्षा अधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यात दररोज लक्षणीय वाढ होते  आहे. रुग्णसंख्येत गुणाकार होऊ द्यायचा नाही असे मुख्यमंत्री उद्धवपंत ठाकरे वारंवार सांगत असले तरी गुणाकारालाही मागे टाकत संख्या वाढते आहे हे सांगायला कोणत्याही गणितज्ज्ञाची गरज नाही. या रुग्णांना ठेवायला आज रुग्णालये अपूरी पडत आहेत. परिणामी जिवंत रुग्णाला मृतदेहाच्या बाजूला ठेवून उपचार सुरु असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. तिथेही या रुग्णांना धड जेवण नाही तर औषधोपचारही नाही, साफसफाई नसल्यामुळे घाणीत ठेवले असल्याचा आरोप केला जातो आहे. राज्यात अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर अनेकांचे धंदे बंद पडले आहेत. परप्रांतीय महाराष्ट्र सोडून बाहेर जात आहेत. त्यांना जाण्याची सोय नसल्यामुळे कायदा आणि सुयव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. हे सर्व होत असताना सत्ताधारी महाआघाडी या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद कसे वाचवायचे यासाठीच विचार करताना दिसून येते आहे. एकूणच राज्याची परिस्थिती ही व्हेंलेटरवर ठेवल्यागत झालेली दिसरते आहे. परिणामी जनसामान्य अस्वस्थ आहे. तरीही राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाने आमच्यावर टीका करू नये, आमच्या चुका दाखवू नये अशी सत्ताधारी महाआघाडीची मागणी काहीशी हास्यास्पद वाटत नाही काय आम्ही चुकलो नाही हे महाआघाडीचे नेते कंठशोष करून सांगितीलही. मात्र जनतेलाही पटायला हवे ना!
 
इथे फक्त महाआघाडीचे नेतेच फडणवीसांवर टीका करतात असे नाही तर मुंबई पुण्यातील काही माध्यमे देखील त्यात आघाडीवर आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना दर महिन्यात एक नवे आंदोलन उभे केले जात होते. या आंदोलनामागचे सूत्रधार कोण हे महाराष्ट्रातील जनता जाणते. आज शरद पवार संचालित उद्धव ठाकरे सरकार सत्तारुढ होताच ही सर्व आंदोलने थांबलेली आहेत. मात्र या मागचे रहस्य शोधण्या ऐवजी मुंबई-पुण्याकडील माध्यमे फडणवीसांवरच बोल लावत आहेत. असे बोलले जाते की विदर्भातून आलेला नेता किंवा अधिकारी हा मुंबईकरांना पचत नाही. हाच न्याय  फडणवीसांच्या बाबतीत ते वैदर्भिय असल्यामुळे मुंबईकर माध्यमे लावताहेत अशी शंका घेण्यास बराच वाव आहे.
 
अशी फडणवीसांना टारगेट करणारी टिका करून महाआघाडीचे सरकार कदाचित टिकेलही पण त्यात महाराष्ट्र भरडला जाणार आहे याचे भान माध्यमांनी ठेवायला हवे. भाजप विरोधकांना तर राजकारण करायचेच आहे मात्र माध्यमांनी समाजहिताची भूमिका घेणे गरजेचे आहे. माध्यमांनीही जर सरकारचे दोष दाखवत सरकारला ताळ्यावर आणले तरच जनसामान्यांचे हीत जोपासले जाणार आहे.
 
राज्यातील जनतेचे हीतच आज सर्वतोपरी आहे. ते हीत न जपता सत्ताधारी महाआघाडी फक्त आपली सत्ता कशी टिकवायची याचा विचार करणार असेल आणि फक्त भाजपला आणि फडणवीसांना विरोध ही भावना घेऊन माध्यमे त्यांना साथ देणार असतील तर हा खरा महाराष्ट्रदद्रोह ठरणार आहे. आज महाराष्ट्रातील जनता बोलत नसली तरी ती बघते आहे . योग्य वेळ येताच ही जनता आपली ताकद दाखवून सर्वांना जागेवर आणेल यात कोणतीही शंका नाही. आपल्या डोळ्यातील कुसळ न बघता दुसर्याच्या डोळ्यात मुसळ गेल्याचा कांगावा आज कदाचित चालेल पण उद्या जनता त्याची दखल घेईल. मात्र याचे भान भाजपविरोेधकांनी आणि त्यांची बाजू घेत भाजपवर टिका करणार्या माध्यमांनी ठेवणे हीच आजची खरी गरज आहे.
  
तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही तर समजून घ्या राजे हो.....
ता.क. : घ्या समजून राजे हो या लेखमालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या
www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.
 - अविनाश पाठक
 मो.9096050581