फेस्टिव्हल सिझनमध्ये शॉपिंग करताना..
ऑक्टोबर हा उत्सवी महिना आहे. दसरा झाला आता दिवाळी तोंडावर आली आहे. याशिवाय लहान-सहान सणवार देखील आहेत. यानिमित्ताने ग्राहक मोठय़ा प्रमाणात खरेदी करतात. कपडे खरेदीपासून ते घर बुकिंगपर्यंत या काळात अक्षरश: उधाण आलेले असते. कंपन्यासुद्धा ग्राहकांचा मूड पाहून ऑफर्सची बरसात करत असतात. विशेषत: उत्सव खरेदीत महिलावर्ग आघाडीवर असतो. एखादी महागडी वस्तू खरेदी करायची असेल तर ती वस्तू खरेदी करण्यापूर्वी एक दोन दुकानात चौकशी करूनच त्याच्या खरेदीचा विचार केला पाहिजे. उदा. वाहन खरेदी करायची असेल तर प्रत्येक डिलरचा वेगळा डिस्काऊंट असतो. तसेच वाहनांची निर्मिती महिना कोणता आहे, हेही तपासले पाहिजे. कारण सहा महिने-वर्षापूर्वीच्या गाडय़ा ऑफर्सच्या नावाखाली विकल्या जातात, असा अनुभव अनेकांना आलेला असतो. चालू वर्षातीला निर्मिती आहे की नाही, हे डिलरला विचारून घ्यावे. अशा बारीक सारिक गोष्टी आहेत की त्यातून आपण डोळसपणे खरेदी करू शकतो. उत्सवी माहोलमध्ये जर आपण खरेदीसाठी जात असाल तर शॉपिंगच्या या टिप्स लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. जर त्यावर अंमल केला तर फायद्यात राहू शकतात. यामधून बर्यापैकी पैशाची बचत करू शकू.
यादी तयार करणे : शॉपिंग करण्याअगोदर खरेदी करण्यात येणार्या सामानाची यादी करणे गरजेचे आहे. जेणेकरून ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, त्याचीच खरेदी करण्यास आपण प्राधान्य देऊ. सामानाची यादी सोबत असल्याने विसरण्याचा धोका राहत नाही. यातून आपल्याला किती खर्च अपेक्षित आहे, याचा अंदाज काढता येतो आणि त्यानुसार पैसे बाळगता येतात. बाजारात गर्दी खूप असते. मॉल, दुकानात लोकांना पाय ठेवायला जागा नसते. अशा गोंधळात एखादी वस्तू विकत घेण्याचे राहून जाते. त्यामुळे यादी असेल तर आपण खरेदी करताना आपल्याला प्राधान्यक्रम निश्चित करता येतो.
ऑफरचा लाभ घ्या : उत्सवाच्या दिवसात बहुतांश कंपन्या सेल, डिस्काऊंट, ऑफर जाहीर करतात. मग ती इलेक्ट्रॉनिक वस्तू असो किंवा मोटार असो. मॉलमध्ये, कपडय़ाच्या दुकानातही सेल लागलेला असतो. दोन शर्ट विकत घेतले तर एक शर्ट मोफत यासारख्या असंख्य जाहिराती किंवा सेल आपल्याला पाहावयास मिळतात. अशा सेलचा आपण चांगला फायदा उचलला पाहिजे. त्यामुळे कमी बजेटमध्ये चांगल्या सामानाची खरेदी होऊ शकते. या कपडय़ांची किंवा वस्तूंचा दर्जाही चांगला असतो. सणाच्या निमित्ताने बाजारात नवीन स्टॉक आलेला असतो. त्यामुळे हा व्यवहार आपल्याला फायदेशीर ठरू शकतो.
ऑफ सिझन शॉपिंग बेस्ट: ऑफ सिझन शॉपिंग करणे हे काही मंडळींना रुचणार नाही मात्र त्याचा फायदा चांगला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जसे की हिवाळा संपल्यानंतर दुकानात विंटर कलेक्शन सुरू राहतो. या दरम्यान किमतीतही 30 ते 40 टAके सवलत दिलेली असते. यासाठी आपण ऑफ सिझन खरेदी करू शकता. मात्र याची एकमेव अडचणीची बाब अशी की, पुढील हिवाळा येईपर्यंत आपले पैसे अडकून पडतात.
बजेट निश्चित करा : जेव्हा आपण शॉपिंग करत असतो तेव्हा बजेटकडे लक्ष देत नाहीत. यासाठी आपण शॉपिंगसाठी बजेट निश्चित करायला हवे. त्यामुळे आपल्याला ऐनवेळी हिशेब करताना गोंधळ उडणार नाही. आपल्या खरेदीचा अंदाज ध्यानात घेऊन खर्चाचा ताळमेळ बसवणे गरजेचे आहे.
कुपन्सचा लाभ घ्या : अनेक मंडळींवर कुपन्स पडलेले असतात, मात्र त्याचा वापर करत नाहीत. कारण आपल्याकडे कुपन्स आहेत, हे विसरून गेलेले असतात. त्यामुळे आपल्याला जेव्हा एखादे कुपन मिळते तेव्हा त्याचा लाभ अगोदर घेणे गरजेचे आणि वेळेअगोदरच तो घेतला पाहिजे.
ऑनलाइनपासून सावध राहा: जी मंडळी ऑनलाइन शॉपिंग करतात त्यांनी त्यावरील वस्तूंची चांगली माहिती घेऊनच खरेदी करायला हवी. कारण आजकाल अनेक वस्तूत दर्जा राखला जात नाही आणि त्याची खात्री देता येत नाही. तसे प्रकारही उघडकीस आले आहेत. उदा. मोबाइल खरेदी केल्यानंतर विट पाठविली जाते. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. कॅश ऑन डिलिव्हरीलाच प्राधान्य द्यावे. कुरियरमधून मागविलेली वस्तू आल्यानंतरच संबंधितासमोरच ते पॅक फोडावे आणि खातरजमा करून घ्यावी. नंतर आपल्यावर पश्चात्तापाची वेळ येणार नाही.
मेघना ठक्कर