रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 23 जानेवारी 2023 (08:54 IST)

सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरु यांची मैत्री नेमकी कशी होती?

पंडित जवाहरलाल नेहरु आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यात आठ वर्षांचं अंतर होतं. नेहरुंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889रोजी तर सुभाषचंद्रांचा 23 जानेवारी 1897चा. नेहरुंचं लहानपण अलाहाबादमध्ये गेलं तर सुभाषचंद्र आयुष्यातली सुरुवातीची वर्ष ओडिशातल्या कटक इथे होते.
 
दोघांच्या घरचं वातावरण अतिशय संपन्न असं होतं. जवाहरलाल यांचे वडील मोतीलाल नेहरू आणि सुभाषचंद्रांचे वडील जानकीनाथ हे दोघेही नामवंत वकील होते. जवाहरलाल आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होते. सुभाषचंद्रांना नऊ भावंडं होती.
 
जवाहरलाल आणि सुभाषचंद्र दोघेही विद्यार्थीदशेत अतिशय हुशार विद्यार्थी होते. कटकहून कोलकाता इथे येऊन सुभाषचंद्रांनी प्रसिद्ध अशा प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्रवेश घेतला.
 
इंग्रजी विषयाच्या शिक्षकाने एका मुलाला वाईट वागणूक दिली तेव्हा सुभाषचंद्र मुख्याध्यापकांकडे गेले. त्या शिक्षकाने मुलाची माफी मागायला हवी असं त्यांनी मुख्याध्यापकांना सांगितलं पण झालं उलटंच.
 
या वर्तनासाठी सुभाषचंद्रांनाच महाविद्यालयातून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर त्यांनी स्कॉटिश चर्च महाविद्यालयात प्रवेश घेतला. बीएच्या परीक्षेत त्यांनी महाविद्यालयात दुसरा क्रमांक पटकावला.
 
सुभाषचंद्रांनी यानंतर लंडनमध्ये आयसीएस परीक्षा दिली. मेरिट लिस्टमध्ये ते चौथ्या स्थानी होते. नेहरु अतिशय लोकप्रिय अशा केंब्रिज विद्यापीठातून शिकून मायदेशी परतले. तेव्हा त्यांचं वय 23 होतं. सुभाषचंद्र शिकून परतले तेव्हा ते 25 वर्षांचे होते.
 
महात्मा गांधींची दोघांच्या मनात वेगवेगळी प्रतिमा
नेहरुंची महात्मा गांधी यांच्याशी पहिली भेट 1916मध्ये लखनौ इथे काँग्रेसच्या अधिवेशनात झाली. तरुण जवाहरलाल पहिल्या भेटीत महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले नाहीत. पण हळूहळू गांधींचे विचार त्यांना पटू लागले आणि त्यांचा आदर करु लागले. दुसरीकडे सुभाषचंद्रांवर गांधींचा मोठा प्रभाव पडला नाही.
 
प्रसिद्ध इतिहासकार रुद्रांग्शू मुखर्जी यांनी नेहरु अँड बोस पॅरलल लाईव्हस या पुस्तकात लिहिलं की, "1927 पर्यंत दोघांनीही राजकारणात जम बसवला होता. दोघांनी ब्रिटिश शासकांनी दिलेला तुरुंगवासही भोगला होता. दोघांनीही गांधींचं नेतृत्त्व स्वीकारलं होतं. परंतु सुभाषचंद्रांवर गांधीचा तेवढा परिणाम नव्हता".
 
सप्टेंबर 1921 मध्ये जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरु आणि गांधींजी तसंच अन्य काँग्रेसच्या नेत्यांसह कोलकाता इथे पोहोचले. त्यावेळी सुभाषचंद्र हे चित्तरंजन दास यांच्या बरोबरीने काम करत होते. बहुतांश काँग्रेसचे नेते चित्तरंजन दास यांच्या घरी उतरत. त्यावेळी जवाहरलाल नेहरु आणि सुभाषचंद्रांची भेट झालेली नाही ही शक्यता कमी आहे.
 
कमला नेहरू यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती
जवाहरलाल नेहरु यांची पत्नी कमला नेहरु टीबीवरच्या उपचारांसाठी युरोपात रवाना झाल्या तेव्हा जवाहरलाल आणि सुभाषचंद्र यांची जवळीक वाढली. त्यावेळी जवाहरलाल नेहरु तुरुंगात होते.
 
कमला नेहरु यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सुभाषचंद्र खास बाडेनवाइलर इथे गेले. कमला नेहरु यांची प्रकृती ढासळली तेव्हा जवाहरलाल नेहरु यांना तुरुंगातून सोडण्यात आलं.
 
सुगत बोस यांनी हिज मॅजेस्टीज अपोनंट पुस्तकात लिहिलं, "जेव्हा जवाहरलाल युरोपात पोहोचले तेव्हा सुभाषचंद्र त्यांना भेटण्यासाठी ब्लॅक फॉरेस्ट रिसॉर्ट इथे गेले. कमला यांची तब्येत थोडी सुधारली त्यानंतर सुभाषचंद्र ऑस्ट्रियाला रवाना झाले".
 
ते पुढे लिहितात, "तिथून त्यांनी जवाहरलाल यांना पत्र लिहिलं. तुमच्या अडचणीच्या काळात मी काही करु शकत असेन तर विनासंकोच मला सांगा. मी तातडीने येईन. 28 फेब्रुवारी 1936 रोजी कमला नेहरू यांचं स्वित्झर्लंड इथे लुझान शहरात निधन झालं. कमला नेहरु यांनी शेवटचा श्वास घेतला तेव्हा तिथे जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि सुभाषचंद्र बोस उपस्थित होते".
 
सुभाषचंद्रांनीच कमला नेहरु यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली. या दु:खद काळात जवाहरलाल आणि सुभाषचंद्र यांच्यातील नातं दृढ झालं.
 
गांधींच्या सांगण्यावर काँग्रेसचे अध्यक्ष झाले
कमला नेहरु यांच्या प्रकृतीसाठी चांगले उपचार मिळावेत यात जवाहरलाल नेहरु व्यग्र होते. त्याच काळात 1936 मध्ये लखनौ इथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनासाठी जवाहरलाल यांची अध्यक्ष म्हणून  निवड करण्यात आली.
 
त्यांनी अध्यक्ष व्हावं ही गांधी यांचीच कल्पना होती. जवाहरलाल युरोपला रवाना होण्यापूर्वीच गांधींनी त्यांना पत्र लिहिलं होतं. पुढच्या वर्षी तुम्ही काँग्रेसची कमान हाती घ्यायला हवी, असं गांधींनी म्हटलं होतं.
 
काही दिवसांनंतर त्यांनी प्रत्यक्ष भेटीतही तुम्ही आता काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारण्याची तयारी करायला हवी असं सांगितलं. तुम्ही या जबाबदारीला होकार दिला तर अनेक गोष्टी सुकर होतील.
 
सुरुवातीला नेहरू यांनी या जबाबदारीला होकार द्यायला साशंकता दर्शवली, पण नंतर त्यांनी गांधींचं म्हणणं ऐकलं. गांधींच्या या निर्णयाला काँग्रेसच्या अंतर्गतच थोडा विरोध होता.
 
नेहरुंच्या विरोधात अध्यक्षपदासाठी राजगोपालाचारी यांना निवडणूक लढू द्यावी असं गांधींना सुचवण्यात आलं. पण गांधींनी हे म्हणणं ऐकलं नाही. यामुळे नेहरुंना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 592 सदस्यांपैकी 541 मतं मिळाली.
 
अध्यक्षपदी निवडून आल्यनंतरही नेहरुंविरोधातील टीका कमी झाली नाही. कावसजी जहांगीर यांनी नेहरुंना सर्वाथाने कम्युनिस्ट असल्याचं संबोधलं. नेहरु मॉस्को अर्थात रशियाच्या बाजूने कधीही झुकू शकतात, असं होमी मोदी म्हणाले होते.
 
नेहरु दुसऱ्यांदा पक्षाचे अध्यक्ष होण्यावरुन मतभेद
डिसेंबर 1936 मध्ये फैझपूर इथे झालेल्या अधिवेशनात नेहरु यांनीच पुन्हा नेतृत्व सांभाळावं असा प्रस्ताव आला. त्याला सरदार पटेल यांनी विरोध केला.
 
पटेल यांनी गांधींचे सचिव महादेव देसाई यांनी पत्र लिहिलं. त्यात त्यांनी नेहरु हे शुर्चिभूत लग्नाळू मुलाप्रमाणे असल्यासारखं लिहिलं. जेवढ्या मुली पाहिणार, त्या सगळ्यांशी लग्न करायला तयार अशी काहीशी स्थिती असं पटेलांनी लिहिलं.
 
देसाई यांच्या सल्ल्यानुसार गांधींजींनी राजगोपालाचारी यांना पत्र लिहून म्हटलं की पटेल यांना असं वाटतं तुम्ही काँग्रेसचा हा काटेरी मुकूट डोक्यावर घ्यावा. राजगोपालाचारी यांनी त्यांचं ऐकलं नाही तेव्हा पटेल यांनी गोविंद वल्लभपंतांचं नाव सुचवलं.
 
जवाहरलाल नेहरु अध्यक्षपदी कायम राहिले तर काँग्रेसचं सदस्यत्व सोडण्यावाचून पर्याय नसेल असं पटेल म्हणाले.
 
राजमोहन गांधी सरदार पटेल यांच्या चरित्रात लिहितात, "नेहरू यांनी आचार्य कृपलानी यांच्यासमोर गांधींजींसमोर अध्यक्षपदी कायम राहू देण्याची विनंती केली. काँग्रेसमध्ये जान फुंकण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी खूपच कमी आहे. यासंदर्भात काय करता येईल याचा विचार करतो असं गांधीजी म्हणाले. नेहरुंविरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढू नये याबाबतीत त्यांनी सरदार पटेलांचं मन वळवलं"
 
गांधींच्या सहमतीने सुभाषचंद्र झाले अध्यक्ष
 
1937 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून गांधी यांनी सुभाषचंद्रांचं नाव सुचवलं. जोपर्यंत जवाहरलाल नेहरु काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळी सुभाषचंद्र एकतर तुरुंगात होते किंवा विदेशात तरी.
 
ज्यावेळी सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यावेळी जवाहरलाल भारतात नव्हते. मात्र या दोघांदरम्यान कोणतेही वैचारिक मतभेद नव्हते.
 
हिंदू आणि मुस्लीमांदरम्यान शांततेचं वातावरण असावं असंच दोघांना वाटत होतं. यासाठीच सुभाषचंद्रांनी 14 मे 1938 रोजी मुंबईत मोहम्मद अली जिना यांची भेट घेतली. मात्र या चर्चेतून काही सकारात्मक निष्पन्न झालं नाही.
 
जवाहरलाल यांच्याप्रमाणेच सुभाषचंद्रांनीही आणखी एक वर्ष अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळावी अशी विनंती केली. रवींद्रनाथ टागोरांनी या मागणीचं जोरदार समर्थन केलं. त्यांच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये आधुनिक विचारांची कास धरणारे दोनच नेते होते- एक सुभाषचंद्र आणि दुसरे जवाहरलाल.
 
जवाहरलाल नियोजन समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे त्यांनीच सुभाषचंद्र यांच्याकडेच काँग्रेसची धुरा राहावी असं टागोर यांना वाटत होतं. पण गांधी सुभाषचंद्रांना पक्षाध्यक्ष करण्यासाठी राजी नव्हते.
 
सुभाषचंद्र आणि गांधींमध्ये मतभेद
गांधी यांचे निकटवर्तीय पट्टाभी सीतारमैय्या यांना सुभाषचंद्र बोस यांच्याविरोधात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवण्यात आलं. गांधींचा विरोध असूनही सुभाषचंद्रांचा विजय झाला. त्यांना एकूण 1580 मतं मिळाली तर सीतारामैय्या यांना 1377 सदस्यांचा पाठिंबा मिळाला.
 
बोस यांना मिळालेल्या बऱ्याचशा मतांपैकी बंगाल, म्हैसूर, पंजाब, उत्तर प्रदेश, मद्रास या भागातील सदस्यांची होती. मात्र या निकालानंतर गांधींच्या प्रतिक्रियेने सगळे अवाक झाले. गांधी म्हणाले, माझ्या सांगण्यानुसार सीतारामैय्या यांनी या लढतीतून माघार घेतली नाही त्यामुळे हा पराभव त्यांचा नसून माझा आहे.
 
रुद्रांग्शू मुखर्जी लिहितात, "सुभाषचंद्रांना गांधींच्या बोलण्याने वाईट वाटलं. त्यांनी हे स्पष्ट केलं की गांधींच्या समर्थनार्थ किंवा विरोधात मतदान करायला सांगितलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं".
 
गांधींबरोबरच्या नात्याबाबत ते म्हणाले, काही मुद्यांवर मतभेद होते. पण असं असलं तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. भारताच्या या सर्वोत्तम व्यक्तीचा विश्वास जिंकण्याचा मी प्रयत्न करेन असं सुभाषचंद्रांचं म्हणणं होतं.
 
जवाहरलाल आणि सुभाषचंद्र यांच्यातील मतभेद वाढले
या कालखंडापासून सुभाषचंद्र आणि जवाहरलाल यांच्यातील मतभेद वाढू लागले. फेब्रुवारी महिन्यात शांतीनिकेतन याठिकाणी दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. या दोघांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील उपलब्ध नाही, पण यानंतर जवाहरलाल यांनी सुभाषचंद्रांना जे पत्र लिहिलं ते उपलब्ध आहे.
 
रुद्रांग्शू मुखर्जी लिहितात, "काँग्रेसअंतर्गत पक्षातील लोकांना सुभाषचंद्रांनी उजव्या विचारसरणीचे, डाव्या विचारसरणीचे म्हणणं जवाहरलाल यांना पसंत नव्हतं. नेहरुंच्या दृष्टीने यातून असं चित्र निर्माण होत होतं की गांधी आणि त्यांचे समर्थक उजव्या विचारसरणीचे आहेत. गांधींच्या विचारांना विरोध करणारे डाव्या विचारसरणीचे आहेत असं चित्र त्यातून निर्माण होतं".
 
ते लिहितात, "नेहरुंनी या पत्रात हिंदू-मुस्लीम, शेतकरी, कामगार, परराष्ट्र धोरण यासंदर्भातील मुद्देही मांडले होते. नेहरुंना हे समजून घ्यायचं होतं की या मुद्यांवर सुभाषचंद्र यांचे विचार काँग्रेसच्या सहकाऱ्यांसारखेच आहेत की वेगळे आहेत. या मुद्यांबाबत सुभाषचंद्र यांनी एक स्पष्टीकरण जारी करावं असं नेहरुंचं म्हणणं होतं"    
 
सरदार पटेल आणि पंत यांनी केला सुभाषचंद्रांना विरोध
दुसरीकडे सरदार वल्लभभाई पटेल हे सुभाषचंद्रांच्या विरोधात गेले होते. राजमोहन गांधी लिहितात, 'पटेल यांनी राजेंद्र प्रसाद यांना पत्र लिहून सांगितलं की सुभाषचंद्रांबरोबर काम करणं कठीण होत चाललं आहे. पक्ष चालवण्यासाठी त्यांनी खुली मोकळीक असावी असं त्यांना वाटतं.'
 
22 फेब्रुवारीला वर्ध्यात काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक झाली त्यात प्रकृती बरी नसल्याने सुभाषचंद्र बोस सहभागी होऊ शकले नव्हते.
 
गांधींच्या सांगण्यावरुन जवाहरलाल आणि सुभाषचंद्र बोस सोडून सरदार पटेलांसह कार्यकारिणीच्या बाकी लोकांनी राजीनामे दिले. यानंतर 10 ते 12 मार्चदरम्यान त्रिपुरात काँग्रेसची बैठक झाली. शरीरात ताप असूनही सुभाषचंद्र त्या बैठकीला उपस्थित राहिले.
 
राजकोटमध्ये उपोषणाला बसलेले असल्याने गांधी या बैठकीला उपस्थित नव्हते.
 
पट्टाभी सीतारामैय्या हिस्ट्री ऑफ द काँग्रेस या पुस्तकात लिहितात, "गोविंदवल्लभ पंतांनी प्रस्ताव मांडला त्यानुसार काँग्रेस गांधींच्या मूलभूत रणनीतीमागे निष्ठावान असेल. वर्षभरापासून कार्यरत कार्यकारिणीवर विश्वास दाखवण्यात आला. गांधींच्या इच्छेनुसार कार्यकारिणीची स्थापना करण्यात यावी असं आवाहन करण्यात आलं"
 
सुभाषचंद्रांनी जवाहरलाल यांना 27 पानी पत्र पाठवलं
सुभाषचंद्र गांधींशी बोलून मतभेद दूर करत असतानाच त्यांनी जवाहरलाल यांना 27 पानी पत्र लिहिलं. त्यातलं पहिलं वाक्य होतं- गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला माझं काम आणि कार्यपद्धती आवडत नसल्याचं लक्षात आलं आहे.
 
 ते पुढे लिहितात, "1937 मध्ये मी तुरुंगातून बाहेर आलो. तेव्हापासून खाजगी आणि सार्वजनिक जीवनात मी तुमचा आदरच केला आहे. तुम्ही मला मोठ्या भावासारखे आहात. मी अनेकदा तुमचा सल्ला घेतला आहे. पण माझ्या ध्येयधोरणांबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही".
 
संपूर्ण पत्रात सुभाषचंद्र यांच्या मनातील कटूता दिसून येते. 26 जानेवारी रोजी नेहरु यांच्या वक्तव्याचा संदर्भ सुभाषचंद्रांनी दिला. आपल्याला धोरणं, योजना यावर चर्चा करायला हवी, माणसांवर चर्चा नको.
 
"काही खास माणसांचा उल्लेख येतो तेव्हा आपण विसरुन जावं असं तुम्हाला वाटतं. पण जेव्हा सुभाषचंद्र पुन्हा एकदा निवडणुकीला उभा राहतो तेव्हा व्यक्तिमत्वाला बाजूला सारत तुम्ही सिद्धांताच्या गोष्टी सांगता. मौलाना आझाद पुन्हा निवडणूक लढवण्याचं म्हणतात तेव्हा त्यांच्या बाजूने बोलायला एकदम पुढे असता".
 
सुभाषचंद्रांना 22 फेब्रुवारी रोजी नेहरुंच्या काँग्रेस कार्यकारिणीतील 12 सदस्यांच्या राजीनाम्यानंतर दिलेल्या वक्तव्याचं वाईट वाटलं होतं. हे तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभत नाही, असं सुभाषचंद्रांनी म्हटलं होतं.
 
सुभाषचंद्रांचं बोलणं जवाहरलाल यांना आवडलं नाही
जवाहरलाल नेहरु यांनी सुभाषचंद्रांच्या पत्राला उत्तर दिलं. सुभाषचंद्रांच्या स्पष्टवक्तेपणाची त्यांनी तारीफ केली.
 
ते लिहितात, "स्पष्ट बोलण्याने काही लोक दुखावू शकतात पण ते आवश्यक असतं. एकत्र काम करणाऱ्या लोकांशी स्पष्ट बोलणं गरजेचं असतं. वैयक्तिक पातळीवर तुमच्याप्रति माझ्या मनात स्नेहभाव आणि आदराचीच भावना आहे, असेल. हे असलं तरी काही वेळा तुमची काम करण्याची पद्धत मला पसंत पडलेली नाही."
 
पत्राच्या पुढच्या भागात सुभाषचंद्रांच्या आक्षेपाला जवाहरलाल यांनी विस्तृतपणे उत्तर दिलं. रुद्रांग्शू मुखर्जी लिहितात, 'कधी कधी नेहरुंना सुभाषचंद्रांचं गोष्टी वाढवून सांगणं आवडत नसे.'
 
नेहरुंनी सुभाषचंद्रांना लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटलं, "मला वाटलं पुन्हा एकदा काँग्रेसचे अध्यक्ष होण्यासाठी तुम्ही अगदीच आतूर झाले आहात. राजकीयदृष्ट्या मला यात काहीही वावगं वाटत नाही. दुसऱ्यांदा निवडणूक लढवणे आणि त्यासाठी काम करणे हा तुमचा अधिकार आहे. पण या भूमिकेने मला त्रास झाला कारण मला असं वाटतं तुम्ही या सगळ्याच्या पलीकडचा विचार करणारे आहात."
 
सुभाषचंद्र आणि गांधी यांच्यातील मतभेद कायम
 
या पत्रव्यवहारानंतरही सुभाषचंद्रांनी गांधी तसंच नेहरुंचं मन वळवण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. जून महिन्यात ते गांधींना भेटण्यासाठी वर्ध्याला गेले. तीच या दोघांची शेवटची भेट ठरली.
 
या भेटीतून काही सकारात्मक हाती लागलं नाही. सुभाषचंद्रांसंदर्भातली गांधींचे विचार आणखी दृढ होत गेले.
 
डिसेंबर 1939 रोजी रवींद्रनाथ टागोर यांनी गांधींना तार पाठवून लिहिलं की, सुभाषचंद्रांवर लावण्यात आलेले निर्बंध उठवण्यात यावेत. गांधींजींनी त्याला उत्तर देताना लिहिलं की सुभाषचंद्रांनी शिस्तीचं पालन करावं असं तुम्ही त्यांना सांगा.
 
जानेवारी 1940 रोजी सीएफ अँड्यूज यांना लिहिलेल्या पत्रात गांधींनी टागोर यांना केलेल्या तारेतील मजकुराचा संदर्भ दिला. मला असं वाटतं की सुभाषचंद्र एखाद्या घरातल्या बिघडलेल्या मुलाप्रमाणे वागत आहेत. मला हे कळलंय की या जटिल परिस्थितीतून मार्ग काढणं गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना शक्य नाही. (गांधी कलेक्टेड वर्क्स, खंड 71)
 
सुभाषचंद्रांच्या निधनाची बातमी ऐकून नेहरु झाले भावुक
अखेर सुभाषचंद्रांना काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या पक्षाची स्थापना केली. 1941 मध्ये सुभाषचंद्र गुप्तपणे भारताबाहेर जाण्यात यशस्वी ठरले.
 
अफगाणिस्तानमार्गे ते जर्मनीला पोहोचले. तिथे त्यांनी हिटलरची भेट घेतली.
 
काँग्रेसमध्ये नेतृत्वाची संधी न मिळताही 1943-44 मध्ये त्यांनी काय करु शकतात याची झलकच सादर केली. त्यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं. लहानपणापासून त्यांना लष्करी सेवेचं आकर्षण होतं. आयुष्याची शेवटची काही वर्षं त्यांनी सैनिकी भूमिकेतच व्यतीत केली.
 
या कालावधीत नेहरु 9 ऑगस्ट 1942 ते 15 जून 1945 तुरुंगातच होते. त्यांच्या जीवनातला हा सगळ्यांत मोठा तुरुंगवास होता. नेहरुंना जेव्हा सुभाषचंद्रांच्या विमान अपघाती मृत्यूबद्दल समजलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
 
भावुक होऊन ते म्हणाले, "सैनिकांना आपल्या कारकीर्दीत ज्याचा सामना करावा लागतो त्यापासून सुभाषचंद्र दूर निघून गेले आहेत. अनेक बाबतीत सुभाषचंद्रांशी माझे मतभेद होते. पण भारताच्या स्वातंत्र्यांसाठी त्यांची तळमळ अतिशय सच्ची अशी होती."
 
रेजिमेंटला दिलं नेहरुंचं नाव
सुभाषचंद्र यांच्याशी मतभेद असूनही जवाहरलाल त्यांच्याबरोबर व्यतीत केलेले सुरुवातीचे दिवस विसरु शकले नाहीत. सुभाषचंद्रांच्या मनातही जवाहरलाल यांच्याप्रति आदरच होता. म्हणूनच आझाद हिंद सेनेच्या एका रेजिमेंटला त्यांनी नेहरुंचं नाव दिलं होतं.
 
दुसरं महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटिश सरकारने आझाद हिंद फौजेच्या सैनिकांविरोधात खटला दाखल केला. दिल्लीतल्या लाल किल्ल्यात चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीसाठी जवाहरलाल नेहरु 25 वर्षानंतर वकील म्हणून उभे राहिले. न्यायालयात त्यांनी अतिशय खुबीने या फौजेच्या सैनिकांची बाजू मांडली.
 
रुद्रांग्शू मुखर्जी लिहितात, "सुभाषचंद्रांना असं वाटायचं की नेहरुंच्या साथीने ऐतिहासिक काहीतरी घडवू शकतो. पण नेहरु गांधींव्यतिरिक्त भविष्यकालीन चित्र पाहू शकत नव्हते. जवाहरलाल-सुभाषचंद्र ऋणानुबंध दृढ न होण्याचं हे प्रमुख कारण होतं".
 
जवाहरलाल नेहरु आणि सुभाषचंद्र बोस यांच्यातील द्वंद्वाकडे भारतीय राजकारणातील एक कडवं पर्व म्हणून पाहिलं जातं. हे द्वंद्वं पुढेही सुरुच राहिलं. पण नियतीने सुभाषचंद्रांना भारतीय राजकारणाच्या पटलावरुन बाजूला केलं.
 
काही लोकांच्या मते सुभाषचंद्र हयात असते तर भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेण्यासाठी ते प्रबळ दावेदार ठरले असते. स्वतंत्र भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी सुभाषचंद्र आणि जवाहरलाल यांच्यापैकी कोणाला मिळाली असती हे पाहणं रंजक ठरलं असतं.
 
Published By - Priya Dixit