शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (12:27 IST)

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील भूते प्रचंड भयभीत झालेली दिसत होती. एकीकडे हिंदू स्मशानभूमी तर मागच्याच बाजूल मुस्लिम दफनभूमी. मेल्यानंतर वैर संपते अशाप्रकारे दोन्ही धर्मातील भूते आपापसातील धर्मभेद विसरुन एकत्र आली होती. जंगलामध्ये जसे प्राणी सुरक्षित नाहीत त्याचप्रमाणे स्मशानात आता भूते सुद्धा सुरक्षित नाहीत. माणसांनी जंगलात अतिक्रमण केले, घरे बांधली, उद्योग उभारले आणि वन्यप्राण्यांना पिंजर्‍यात कैद केले. आता ही माणसं स्मशान सुद्धा ताब्यात घेऊन तिथेही अतिक्रमण करणार की काय अशी भिती भुतांना वाटत होती आणि त्यांच्यातील एक बाळ-भूत प्रचंड घाबरलेलं दिसत होतं.
 
झालं असं की त्या दिवशी आई वडिलांनी दटावल्यावरही ते बाळभूत दिवसा बाहेर पडलं. तरी आई नेहमी बजावायची, दिवसा बाहेर पडत जाऊ नकोस. एखाद्या माणसाच्या नजरेस आलास की दृष्ट लागायची. पण हे बाळभूत लई खट्ट्याळ. ते कसलं ऐकतंय? ते पडलं बाहेर. त्याला काही माणसांचा घोळका दिसला. माणसं नेमकी कशी दिसतात हे पाहण्याचा मोह त्याला काही आवरता आला नाही. त्यानं पुढे जाऊन पाहिलं तर काही माणसं एका लहान मुलाचा वाढदिवस साजरा करताना दिसले. स्मशानात वाढदिवस? सोबत चिकन मटण असं स्वादिष्ट जेवण. त्या बिचार्‍या बाळभूताने कधी असं अन्न खाल्लंच नव्हतं. जन्माला आल्यापासून.. ओह्ह.. सॉरी... मेल्यापासून हवा आणि प्रेताला अग्नी दिल्यावर निघणारा धूर खाऊन तो राहत होता. इतकं स्वादिष्ट अन्न त्याच्या नशीबी नव्हतं. पण नंतर त्याला कळलं की ही माणसे विचित्र आहेत. भूते वगैरे या जगात नसतात, ती अंधश्रद्धा असते असं त्यांचं म्हणणं. म्हणून त्यांनी स्मसानात वाढदिवसाचा घाट घातला होता. जेणेकरुन मनुष्य जातीचा भुतांवरचा विश्वास उडेल. 
 
आता त्या बिचार्‍या बाळभूताला स्वतःच्या अस्तित्वाचाच प्रश्न पडला. तो घाबरत घाबरत आईकडे आला आणि घडलेला सगळा प्रकार त्याने आईला सांगितला. त्या दिवसापासून तो घाबरलेला दिसतो. ना हवा खात, ना धूराचा आस्वाद घेत आणि झाडावरही लटकत नाही आणि म्हणूनच सगळी भूत मंडळी जमली होती. मुस्लिम भूतांमध्ये एक भूत जीवंतपणी मांत्रिक म्हणून काम करत होता. पूर्वी तो लोकांच्या अंगातली भूते घालवायचा. जारण मारण, करणी स्पेशलिस्ट म्हणूनही तो प्रसिद्ध होता. त्याच्यामुळे अनेकांना मुलेही झाली होती, म्हणजे त्याच्या तंत्रविद्येमुळे... आता तो भुतांमधला माणूस घालवण्याचं काम करतो. माणूस हा भुतापेक्षाही भयानक... त्या बाळभुताला मांत्रिक भूताला दाखवण्यात आलं. त्यानं बाळभुताचं निरीक्षण केलं आणि सांगितलं की याला मनुष्यबाधा झाली आहे. 
 
मनुष्यबाधा हा शब्द ऐकताच सर्व भुतांच्या चेहर्‍यावर भय पसरलं. मनुष्यबाधा? "मग आता माझ्या बाळभुताचं काय होणार?" भुताईने प्रश्न केला. मांत्रिक भूत शांतपणे म्हणाला, "एक बार भूतबाधा परवडली. पण मनुष्यबाधा परवडत नाय. फिर भी फिकीर करायची काही गरज नाही. वेतालासमोर एक मेलेला कावळा कापावा लागेल. मेलेल्या कावळ्याची बळी दिली तर वेताल प्रसन्न होईल आणि मनुष्यबाधा त्याच्या रहममुळे निघून जाईल." भुताईने आश्चर्य व्यक्त करत विचारलं, "तुम्ही तर मुस्लिम भूत ना? मग तुम्ही वेताळाला मानता? वेताळ तर हिंदू..." "अहो भुतभाभी, ही सगळी अंधश्रद्धा. जिंदा होते वक्त माणसाने वेगवेगळे धर्म बनवले. त्यांचा खुदा पण वेगळा. पण मेल्यावर कळतं की आपण किती मुर्ख होतो ते. और वेताल हे तर सब भूतो का मसिहा है भुतभाभी". भुताई पुन्हा प्रश्न केला, "पण मेलेल्या कावळ्याची बळी कशी देता येईल. बळी जीवंत असताना दिली पाहिजे." मांत्रिक भूत समजवण्याच्या स्वरात म्हणाला, "कैसा है भुतभाभी. मारना तो इन्सन का काम है. आपण बिच्चारी भूत. आपण हे पातक कसं काय करु शकतो.?" 
 
सगळ्यांना मांत्रिक भूताचं म्हणणं पटलं. त्याने सांगितल्या बरोबर, बाबा भूताने मेलेल्या कावळ्याची बळी दिली. बाळभुताची मनुष्यबाधा तर निघून गेली. पण सर्व भुतांना मात्र त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न सतावत होता. मनुष्याने सगळं जग व्यापलं असताना स्मशानातही भुतांना सुखाने राहू देत नाही. या विरोधात एक संघटना स्थापन करण्यात आली. मनुष्यबाधा निर्मुलन समिती असे या संघटनेचे नामकरण करण्यात आले. मांत्रिक भूत त्याचा अमितीचा अध्यक्ष झाला. मनुष्यामुळे होणारी बाधा नाहिशी करणे आणि स्मशानात येऊन भुतांना त्रास देणार्‍या माणसांना झपाटणे व त्यांना पळता भुई करणे हे दोन मुख्य हेतू ठरवण्यात आले. हिंदू आणि मुस्लिम दोघांनी मिळून वेताळाचा जयघोष केला. 
 
भूत हूं मैं... या ध्येयगीताने बैठकीची सांगता करण्यात आली...
 
@ जयेश शत्रुघ्न मेस्त्री