शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (21:30 IST)

स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग -अपप्रचार आणि वास्तव

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर स्वातंत्र्य लढ्यात पांढर्या टोपीने लक्षणीय कामगिरी केली मात्र या दरम्यान काळी टोपी काय करत होती असा सवाल एका संघविरोधक अभ्यासकाने उपस्थित केला होता. त्याच्या उत्तरात दुसर्या एकाने काळी टोपी त्यावेळी काड्या करीत होती अशी टीकाही केली होती. योगायोगाने त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका अभ्यासकाने पाठविलेली माहिती मिळाली. ती माहिती  संघ स्वातंत्र्य लढ्यात कुठेच नव्हता या संघविरोधकांच्या आक्षेपाला सविस्तर उत्तर देणारी अशी होती. या माहितीमध्ये अनेक जुन्या लेखांचे, ग्रंथांचे आणि साहित्याचे संदर्भही दिले होते. त्यामुळे कुणालाही शंका असल्यास ते तपासणे शक्य होते. त्यामुळे ती मला मिळालेली माहिती संपूर्ण जरी नाही तरी त्यातील काही निवडक अंश मी आज या लेखातून उपलब्ध करून देतो आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार हे अगदी बालवयापासून स्वातंत्र्यप्रेमी व्यक्तिमत्व होते आणि शालेय जीवनातही त्यांनी इंग्रजी साम्राज्याला कसा विरोध केला होता याचे अनेकदा दाखले त्यांची उपलब्ध असलेली विविध चरित्रे वाचल्यावर लक्षात येते. त्यानंतर तारुण्यातील काही काळ ते काँग्रेसमध्येही सक्रिय होते. 1921-22 या कालखंडात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगवासही भोगला होता. त्यानंतर 1925 साली विजयादशमीच्या दिवशी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोजक्या समविचारी मंडळींबरोबर बसून स्थापना केली होती.

डॉ. हेडगेवारांना एक बाब कायम सतावत होती. 7 हजार मैलावरून मूठभर इंग्रज येतात तेही व्यापार करण्याच्या हेतूने आणि त्यानंतर हेच इंग्रज या विशालकाय देशावर शंभराहून अधिक वर्ष राज्य करतात. यामध्ये आपण भारतीय विशेषतः हिंदू कुठे कमी पडतो या विषयावर डॉक्टरांचे कायम चिंतन होते. आपण असंघटित आणि चुकीच्या परम्परांच्या आहारी गेलेले असल्यामुळे आत्मभान आणि आत्मगौरव जोपासणारा संघटित समाज घडवला आणि या समाजात राष्ट्रप्रेम जागे केले तर स्वातंत्र्य मिळणे आणि ते टिकवणे अशक्य नाही. हीच भावना मनाशी धरून त्यांनी संघाची जडणघडण केली होती. संघात दररोज येणार्या स्वयंसेवकांना खेळाच्या माध्यमातून एकत्रित करणे आणि बौद्धिकांच्या माध्यमातून त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागृत करणे हा कार्यक्रम दैनंदिन शाखेच्या माध्यमातून त्यांनी राबवला होता.

संघाने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नाही, नव्हे तर या लढ्याला विरोधच केला असा आरोप संघविरोधक करतात. 1929 साली 27-28 एप्रिल रोजी वर्धेत संघाचे एक प्रशिक्षण शिबिर झाले होते. या शिबिरात मार्गदर्शन करणार्या सर्व वक्त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येक स्वयंसेवकाने सहभागी व्हावे आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवावी असे मार्गदर्शनही केले होते. याचे दाखलेही उपलब्ध आहेत.

डॉ. हेडगेवारांनी संघ स्थापनेपूर्वी 1920-21 च्या सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेतला होताच. मात्र त्यानंतर 1930 साली झालेल्या सत्याग्रहातही डॉ. पूर्णांशाने सहभागी झाले होते. सविनय कायदेभंग आंदोलन आणि दांडीमार्च यामध्ये डॉ. हेडगेवारांच्या नेतृत्वात संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. याचवेळी झालेल्या जंगल सत्याग्रहातही डॉ. हेडगेवार सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सरसंघचालक पदाचे दायित्व डॉ. परांजपेंकडे सोपवले होते. या सत्याग्रहात त्यांच्यासमावेत 10 हजार नागरिक (स्वयंसेवक) सहभागी झाले होते. या सत्याग्रहासाठी त्यांना 9 महिन्याचा तुरुंगवासही झाला होता. यावेळी या सत्याग्रहामध्ये सहभागी होण्यासाठी संघाच्या शाखा-शाखांमध्ये सूचना गेल्या होत्या. यापैकी एका आंदोलनात बालाजी रायपूरकर या संघ स्वयंसेवकाला इंग्रजांची गोळी लागून त्याचा मृत्यूही झाला होता.

1940 मध्ये डॉ. हेडगेवारांचे निधन झाले. त्यानंतर माधव सदाशिव गोळवलकर (श्रीगुरुजी) हे सरसंघचालक झाले. 1942 मध्ये गांधीजींनी भारत छोडो, चलेजाव हे आंदोलन पुकारले. या आंदोलनातही संघाचा सक्रिय सहभाग होता. विदर्भात बावली, आष्टी, चिमूर याठिकाणीही संघाने आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. चिमूरच्या आंदोलनात संघाचे दादा नाईक, बाबूराव बेगडे, अण्णाजी सिरास हे अधिकारी नेतृत्व करत सहभागी झाले होते. या आंदोलनात 125 पेक्षा अधिक संघ स्वयंसेवकांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.

संघाने आपल्या स्वयंसेवकांना स्वातंत्र्य लढ्यातील कोणत्याही पक्षाच्या किंवा विचारधारेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि मदत करण्यासाठी सूट दिली होती. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात अनेक संघप्रचारक भूमिगत राहून स्वातंत्र्य लढा प्रज्जवलित कसा राहील हे बघत होते. इतकेच काय तर इतर विचारधारांच्या स्वातंत्र्य सैनिकांना प्रसंगी आधार देण्याचे कामही संघाकडून केले गेले होते. 1942 च्या आंदोलनात भूमिगत असलेल्या स्वातंत्र्य सैनिक अरुणा असफअली यांना संघाचे तत्कालिन दिल्ली संघचालक लाला हंसराज गुप्त यांच्या निवासस्थानी आधार दिला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या सातार्यातील पत्री सरकारचे नाना पाटील यांना औंधचे संघचालक पंडित सातवळेकर यांनी आपल्या घरी आधार दिला होता.

स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास बघता त्यात जितकी महत्त्वपूर्ण भूमिका काँग्रेसच्या अहिंसक आंदोलनांनी बजावली तितकेच महत्त्वाचे योगदान क्रांतीकारकांचेही होते असे लक्षात येते. महाविद्यालयीन जीवनापासूनच डॉ. हेडगेवारांचा ओढा हा क्रांतीकारकांकडे होता. काँग्रेस कार्यकारिणीच्या एका बैठकीत क्रांतीकारी कारवायांविरोधात ठराव आणण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी डॉ. हेडगेवारांनी त्या ठरावाला प्रचंड विरोध केला होता. क्रांतिकारक हे देखील इमानदार देशभक्त आहेत फक्त त्यांची पद्धत भिन्न आहे त्यामुळे त्यांचे निंदा करू नका अशीच भावना डॉ. हेडगेवार व्यक्त करीत होते. त्यामुळे अनेक क्रांतीकारकांशीही डॉक्टरांचे आणि संघाचे संबंध होते. शिवराम हरी राजगुरु हे शहिद भगतसिंगाचे सहकारी असलेले क्रांतीकारक कायम डॉक्टरांच्याच संपर्कात होते आणि नागपूरच्या मोहिते संघ शाखेत ते अनेकदा येत असत अशीही माहिती उपलब्ध आहे.
 
हे सर्व मुद्दे लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्वातंत्र्य लढ्यात कधीही आणि कुठेही सहभागी नव्हता हा संघविरोधकांचा दावा तथ्यहीन ठरतो. संघाचे विद्यमान सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांच्या मतानुसार स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा योजनाबद्ध रितीने तयार केला असून त्यात अनेक तथ्ये एकतर अनावधनाने गळली आहेत किंवा योजनाबद्ध पद्धतीने दुर्लक्षित ठेवली आहेत. त्यामुळे अर्धवट इतिहास लोकांसमोर मांडला जातो आहे असेही त्यांचे मत आहे.

डॉ. वैद्यांनी व्यक्त केलेले हे मत फक्त त्यांचेच नाही तर अनेक संघ अभ्यासकांचे आहे. फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघच नव्हे तर काँग्रेस वगळता स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणार्या इतर अनेक व्यक्ती किंवा संघटना यांना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस सरकारने कायम दुर्लक्षितच ठेवले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देता येईल. नेताजींना आजवरच्या इतिहासात अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न झाला आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अनेक खर्याखोट्या कपोलकल्पित कथा पसरवून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर सावरकरांना भारतरत्न देण्यावरून काँग्रेसने जो वाद निर्माण केला होता ते या कांँग्रेसी नितीचे ज्वलंत उदाहरण मानता येईल.

एकूणच देशाला स्वातंत्र्य मिळाले ते काँग्रेसमुळे आणि त्यातही काँग्रेसमधल्या नेहरु आणि गांधी परिवाराच्या योगदानामुळे असे चित्र निर्माण करण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला आणि आजवर त्यांना त्यात यशही मिळाले. संघाचे स्वातंत्र्य लढ्यात कुठेही योगदान नव्हते असा केला जाणारा प्रचार हा देखील या काँग्रेसी कटाचाच एक भाग मानता येईल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही तिरंगा झेंडा फडकावयाला तयार नव्हता असा आरोप संघविरोधक वारंवार करीत होते. अजूनही शिळ्या कढीला ऊत आणण्याचा ते प्रयत्न करीत असतात. मात्र इथेही वास्तव नेमके काय ते समोर येणे गरजेचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वातंत्र्य दिवस आणि गणतंत्र दिवस कसे साजरे करावे याबाबत केंद्र शासनाने काही सूचना जारी केल्या होत्या. त्यात शासकीय संस्था आणि नोंदणीकृत संस्था यांनाच तिरंगा फडकावता येईल असे नमूद करण्यात आले होते. या सूचनांचा भंग करणार्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील आणि तुरुंगवासही होऊ शकेल असेही या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले होते.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सरकारदरबारी नोंदलेली संघटना नव्हती आणि संघाला स्वतंत्र भारतात कायदा मोडून कोणतेही काम करायचे नव्हते. त्यामुळे संघाने या दोन्ही दिवशी तिरंगा न फडकवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 21व्या शतकाच्या सुरुवातीलाच असा कायदा करणार्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच या मुद्यांवरून संघाला टारगेट करण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यावेळी संघकार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांना निमंत्रित करून त्यांच्याच हस्ते राष्ट्रध्वज फडकवला गेला आणि तेव्हापासून म्हणजेच 2002 पासून संघाने नियमित राष्ट्रध्वजाचे ध्वजवंदन करायला सुरुवात केली अशी माहिती संघातील वरिष्ठ मंडळींकडून मिळते. अजूनही दरवर्षी संघकार्यालयात हे राष्ट्रध्वजाचे ध्वजवंदन होत असते.  हे बघता इथेही संघाला बदनाम करण्यासाठीच हे सर्व कृष्णकृत्य घडवून आणण्याचे कारस्थान केले असा निष्कर्ष काढता येते.

या सर्व बाबी अभ्यासल्या तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्वातंत्र्य लढ्यात कुठेच नव्हता आणि संघ हा स्वातंत्र्यविरोधी तसेच देशविरोधी आहे हा प्रचार म्हणजे संघविरोधात केलेले कारस्थान आहे असा निश्चित निष्कर्ष काढता येतो. संघासंदर्भात अगदी सुरुवातीपासूनची काँग्रेसची मते तपासल्यास काँग्रेसने कायम संघाला जीव तोडून विरोध केला आणि संघाला जास्तीत जास्त बदनाम कसे करता येईल हाच प्रयत्न केला. विशेष म्हणजे काँग्रेसच्या या अपप्रचाराला संघाने आजवर कधी खुलेआम मैदानात येऊन उत्तरे देण्याचा प्रयत्न केला नाही. आपण काम करीत रहायचे आपले कामच विरोधकांना उत्तर देईन या भूमिकेतून संघकार्य सुरु राहिले. संघाची ही भूमिका या देशातील जनसामान्यांनाही कुठेतरी रुचली असावी त्यामुळे विरोधकांनी अपप्रचार करूनही गत 95 वर्षात संघ कायम वाढताच राहिला आहे. आज अशा विपरित प्रचाराच्या पार्श्वभूमीवरही संघ समाजाच्या सर्वच क्षेत्रात पोहोचला असून आज संघाला फक्त देशातच नव्हे तर जगात मान्यता मिळाली आहे. संघकार्याचे हेच खरे यश मानावे लागेल.
 
मात्र संघविरोधक हे लक्षात घेत नाही. त्यांची अजूनही शिळ्या कढीला ऊत आणून संघाला बदनाम करण्याची आणि जनसामान्यांना भ्रमित करण्याची ही रणनीति आजही राबवली जाते आहे. तरीही संघ पुढे जातो आहे आणि असा अपप्रचार करणारेच माघरत आहेत.
 
या पार्श्वभूमीवर आतातरी संघाविरुद्ध अपप्रचार करणार्यांनी जागे व्हावे आणि संघावर टिका करताना सर्व तथ्यांचा अभ्यास करून मग चुका दाखवाव्या आणि टिका करावी इतकेच मला सुचवायचे आहे. या लेखात जे काही संदर्भ दिले त्याचे दस्तावेज सुद्धा उपलब्ध आहेत. कोणत्याही अभ्यासकाला हवे असल्यास मी माहिती उपलब्ध करून देण्यास तयार आहे. आता त्यांनीच अभ्यास करण्याची तयारी दाखवायची आहे.
 
तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....
ता.क : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.
-अविनाश पाठक