बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (10:28 IST)

शनिवारवाड्यासह आरएसएस, भाजपची कार्यालये भाड्याने देणे आहे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज अनोखे आंदोलन केले. पेशवाईचे प्रतीक असलेला शनिवारवाडा, आरएसएसचे नागपूरमधील रेशीमबागेतील कार्यालय, तसेच भाजपची सगळी कार्यालये भाड्याने द्यायची असल्याची जाहीर घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष r यांनी केली. देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल  या एजंटांशी संपर्क साधावा अशी आवाहनवजा खिल्ली वर्पे यांनी उडविली.
 
यावेळी वर्पे यांनी फडणवीस सरकारच्या या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वर्गीकरण करण्याची खोड आहे. मनुस्मृतीनुसार त्यांनी मराठा साम्राज्यातील किल्ल्यांचेही वर्गीकरण केले आहे. महाराष्ट्रातील सामान्य बहुजन मराठी मावळ्यांना सगळे किल्ले श्रेष्ठ आहेत. हे किल्ले आम्हाला प्राणापेक्षाही प्रिय आहेत. त्यामुळे हे किल्ले आम्ही भाड्याने देऊ देणार नाही. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना 30 सप्टेंबर 2016 रोजी इंडियन हेरीटेज ऑफ हॉटेल असोसिएशनने एका वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बोलावले होते. रावल यांनी या असोसिएशनच्या घशात महाराष्ट्रातील 200 किल्ले घालण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर 25 किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला. लोकांनी कडाडून विरोध केल्यानंतर त्यांनी निर्णय स्थगित करण्याचे आश्वासन दिले आहे. स्थगिती नाही, निर्णय रद्दच झाला पाहिजे, असे वर्पे म्हणाले.
 
या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सामान्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.