बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (13:35 IST)

वाईन खरंच फक्त फळांचा रस आहे की दारू?

गेल्या काही दिवसांपासून तुम्हा सर्वांना एक प्रश्न पडला असेल तो म्हणजे 'वाईन' ही खरंच दारु आहे का? हा प्रश्न पडण्यामागचं कारण म्हणजे नुकताच राज्य मंत्रिमंडळाने सुपरमार्केट आणि मोठ्या किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे.
 
या निर्णयानंतर विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे तर सरकारकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हणत याचे समर्थन केले आहे. या निर्णयाचा पुरस्कार करणाऱ्या अनेक लोकांनी, नेत्यांनी वाईन ही दारू नसून फळांचा रस आहे असेही म्हटले आहे.
 
31 जानेवारीला पुण्यात कोव्हिड आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.
 
त्यावेळी बोलताना पवार म्हणाले, ''वाईन आणि दारू यात जमीन अस्मानाचा फरक आहे. राज्य सरकारने दुकानांमध्ये दारू नव्हे, तर वाईनविक्रीला परवानगी दिली आहे. पण काही लोक उगाच राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.''
 
पवार पुढे म्हणाले, ''आपल्या राज्यातील अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळे तयार करतात. द्राक्षं, काजूपासून वाईन तयार होते. अशी इतरही अनेक फळे आहेत. आपल्याकडे वाईन पिण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे.
 
राज्यात जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात विकली जात नाही. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्यराष्ट्र वगैरे संबोधून या गोष्टीला महत्त्व दिले आहे.''
 
राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन टीका केली होती.
फडणवीस त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले होते, ''पेट्रोल - डिझेलऐवजी दारु स्वस्त! दारुबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी ! महाराष्ट्रात नवीन दारुविक्री परवाने देण्याचा निर्णय! आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू! महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.'' असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले होते.''
 
पण खरंच दारु आणि वाईनमध्ये फरक असतो की वाईन ही दारुच असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.
 
दारू आणि वाईनमध्ये काही फरक असतो की ते एकाच प्रकारात मोडतात हे आम्ही डॉक्टरांना विचारलं. इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणतात.
 
''वाईनमध्ये अल्कोहोल असते. दारूच्या संकल्पनेमध्ये वाईन येते. इतर दारूमुळे जसे लोक व्यसनी होतात त्याप्रमाणे वाईन पिऊन कोणी व्यसनी झाल्याचं अद्याप आढळलं नाही. वाईन हे मद्यपानातलं सुरक्षित पेय असलं तरी ते मद्यच आहे. पाश्चात्य देशात वाईन जेवणाआधी किंवा जेवणानंतर घेतात.
 
वाईनमुळे भूक वाढते म्हणून ती जेवणाआधी घेतली जाते तर वाईनमुळे पचनशक्ती वाढते म्हणून जेवणानंतरही वाईन घेतली जाते. जर मोठ्या प्रमाणात वाईन मिळाली तर अतिप्रमाणात वाईन पिणारे लोक आपल्याला आढळतील आणि त्यातीलच काही मद्यपी सुद्धा होऊ शकतील.
 
कारण शेवटी ते अल्कोहोल आहे त्यामुळे त्याचे व्यसन लागू शकते. त्याचबरोबर वाईन पिणारा पुढे इतर दारुच्या व्यसनी जाऊ शकतो.'' असंही भोंडवे सांगतात.
मुक्तांगण व्यसनमूक्ती केंद्राच्या संचालक डॉ. मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, ''वाईन दारू नाही हे म्हणणे योग्य नाही. वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असले तरी वाईन ही दारूच आहे.
 
आमच्याकडे असे अनेक लोक आहेत की ज्यांची व्यसनाची सुरुवात ही वाईनपासून झाली होती. म्हणजे एखाद्या पार्टीमध्ये वाईन प्यायली आणि नंतर ते दारूच्या इतर प्रकारांकडे वळाले. किंवा ज्या लोकांनी दारू सोडली आहे परंतु इतर दारूपेक्षा वाईन घेऊयात असं जर त्यांनी केलं तर ते पुन्हा दारूकडे वळू शकतात.
 
कारण मेंदुतील रिसेप्टर पुन्हा अॅक्टिव्हेट होऊ शकतात. त्यामुळे खूप लोक दारू सोडून वाईन घ्यायचा निर्णय घेतात परंतु पुन्हा ते दारुकडे वळतात.''
 
''त्यामुळे ज्यांनी दारू घेणं बंद केलं आहे त्यांच्यासाठी सुपरमार्केटमध्ये वाईन मिळणं धोक्याचं आहे. त्याचबरोबर तरुण मुलांसाठीसुद्धा हे धोक्याचं आहे. दारूची उपलब्धता अधिक असेल तर व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढते'' असंही पुणतांबेकर यांना वाटतं.
 
थोडीशी वाईन ही आरोग्यासाठी चांगली असं म्हटलं जातं याबाबत देखील आम्ही पुणतांबेकर यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, ''हा खूप मोठा गैरसमज आहे.
 
डॉ. अभय बंग यांनी यावर रिसर्च केला होता आणि तो लॅन्सेटमध्ये प्रकाशित देखील झाला होता. द्राक्षातल्या काही गोष्टी या हृदयासाठी चांगल्या आहेत.
 
त्यामुळे द्राक्षं खाता येऊ शकतात त्यासाठी वाईन प्यायची गरज नाही. कुठल्याही प्रकराची दारू घेतली तर त्या व्यक्तीची मेंदूवरची बंधनं कमी होतात त्याची इनिबिशन्स जातात. त्यामुळे त्याला बरं वाटल्यासारखं वाटतं. परंतु त्याचं व्यसन पुढे वाढत जाऊ शकतं.''असंही पुणतांबेकर सांगातात.
वाईन आता सुपरमार्केटमध्ये मिळणार असली तरी ती कुठल्याप्रकारात मोडते हे आम्ही एफडीएमध्ये उच्चपदावर असलेल्या आणि सध्या निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याकडून जाणून घेतले. त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की वाईन ही दारुच्याच प्रकारात मोडते. या निर्णयाच्या आधी वाईनविक्रीसाठी लायसन्स घ्यावे लागत होते असेही त्यांनी सांगितले.
 
विरोध होत असेल तर वेगळा विचार केला तर मान्य.
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील वाईन विक्रीबाबत आपले मत व्यक्त केले. बारामती येथील त्यांच्या घरी ते पत्रकारांशी बोलत होते.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले की ''वाईन आणि इतर मद्यांमधील फरक समजून घेतला पाहिजे. परंतु या निर्णयाला विरोध होत असेल तर सरकारने याबाबत वेगळा विचार केला तरी माझा विरोध असण्याचे कारण नाही.''
 
रेड वाईन पिणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर असतं का?
आठवड्याला एक बाटली वाईन पिण्यामुळे कॅन्सरचा धोका वाढत असल्याचं या संशोधनात पुढे आलं. वाईन पिणाऱ्या लोकांना असलेला धोका पुरुषांना पाच सिगारेट तर महिलांना दहा सिगारेट पिण्यामुळे होणाऱ्या नुकसानाप्रमाणेच असू शकतो.
 
ब्रिटनच्या वेल्स येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच संचालक असलेले मार्क बेलिस म्हणतात, "धुम्रपान आणि कॅन्सरमधील संबंध यांबाबत बऱ्याच वेळा चर्चा केली जाते. पण दारू आणि कॅन्सर यांच्यातील संबंधांवर फारसं कुणी बोलताना दिसत नाही."
 
वाईन आरोग्यदायी असल्याचं कुणी सांगितलं?
वाईन पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं, हा विचार 1970 च्या दशकातला आहे. त्यावेळी फ्रान्सच्या नागरिकांना इतर देशातील नागरिकांच्या तुलनेत हृदयविकार कमी होतो, हे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आलं होतं.
 
फ्रेंच नागरिक इतरांपेक्षा जास्त सॅच्युरेटेड फॅट खातात. त्यामुळे ही माहिती आश्चर्यचकीत करणारी होती.
 
शास्त्रज्ञांनी म्हटलं, फ्रान्सच्या नागरिकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण कमी असण्याचं कारण थेट वाईनशी जोडलेलं आहे.
 
याला शास्त्रज्ञांनी फ्रेंच पॅराडॉक्स म्हणजेच फ्रेंच विरोधाभास असं नाव दिलं. हे एक असं कोडं आहे, जे शास्त्रज्ञ अद्याप सोडवू शकलेले नाहीत.
 
पण फ्रेंच विरोधाभास ही व्याख्या जगभरात लोकप्रिय झाली. त्यामुळे सध्याच्या घडीला जगभरात सर्वत्रच अल्प प्रमाणात वाईन पिणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जात आहे.
 
यामुळे वजन वाढण्याच्या समस्येशिवाय हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यात मदत मिळते.
 
इंटरनॅशनल सायंटिफिक फोरम ऑन अल्कोहोल रिसर्चच्या सहसंचालक हेलेना कोनीबिअर सांगतात, "अल्प प्रमाणात वाईन प्यायल्यामुळे आरोग्य उत्तर राखण्यासह वाढत्या वयासोबत कमी होत जाणारी बौद्धिक क्षमताही जास्त काळ टिकून राहू शकते. अशा प्रकारचे फायदे समोर आलेले अनेक संशोधन अहवाल प्रकाशित झालेले आहेत."
 
त्यामुळेच वाईनपासून दूर राहणं म्हणजे आरोग्यदायी पाऊल नसून उलट आरोग्याचं नुकसान करणं आहे, असा समज लोकांमध्ये बऱ्याच काळापासून रूढ झाला आहे.
 
अल्प प्रमाणात वाईन पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे. पण आता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
 
या संशोधनाला विरोध असलेल्या व्यक्तींच्या मते, वाईनचा संबंध थेट आरोग्याशी जोडण्यासाठीची आकडेवारी तथ्याला धरून नाही. तसंच वाईनपासून दूर असलेले लोक आजारी पडतात, असं म्हणणं तर पूर्णपणे चुकीचं आहे.
 
2006 मध्ये वाईनमुळे होणारं नुकसान आणि फायदे यांच्याबाबत 54 संशोधनांचा आढावा घेण्यात आला.
 
यातून पुढे आलेल्या निष्कर्षानुसार, अल्प प्रमाणात वाईन पिल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, या दाव्यात काहीच तथ्य नाही.
 
आरोग्यवर्धक पर्याय?
भलेही वाईन पिणं आरोग्यासाठी चांगलं असेल, पण बहुतांश तज्ज्ञांच्या मते, यापासून दूर राहणं हेच आपल्यासाठी अधिक आरोग्यदायी आहे.
 
लंडनच्या किग्ज कॉलेज येथील कॅरोलिन रॉय यांच्या मते, "दारू आपल्यासाठी वाईटच आहे. तरीही तुम्ही पित असाल तर रेड वाईनला प्राधान्य द्या. कारण यामध्येच काही चांगले गुण आढळून आले. पण याचा अर्थ हा नाही की मी तुम्हाला वाईन पिण्याचा सल्ला देत आहे."
 
दारू पिण्याबाबत ब्रिटनची गाईडलाईन सर्वात कठोर मानली जाते. त्यामधील सूचनेनुसार 14 युनिटपेक्षा जास्त दारू पिणं टाळायला हवं.
 
खरंतर वाईन पिण्याचे बरेच फायदे सांगितले जातात. पण ते न पिणं हाच उत्तम पर्याय आहे, असं तज्ज्ञांना वाटतं.
 
शिवाय, रेड वाईन पिताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही वाईन आरोग्यासाठी पित नसून ती फक्त तुम्हाला दारू पिण्याची आवड असल्यामुळे पित आहात.
 
जर तुम्हाला आरोग्यासाठी काही करायचंच आहे, तर वाईनपेक्षाही इतर अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत.
 
नियमित व्यायाम, हिरव्या भाज्या, फळ खाणं यांसारख्या उपायांची सर इतर कोणत्याच गोष्टीला नाही. त्यामुळे रेड वाईन पिणं हे यासाठीचं पर्याय ठरू शकत नाही.