सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शुक्रवार, 31 मे 2024 (08:35 IST)

Maharani Ahilyabai Holkar Jayanti 2024 : महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जीवन परिचय

अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि धनुर्धर होत्या.त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसायचा.
 
महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 ला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात जामखेड नजीकच्या चौंडी गावी झाला.या चौंडी गावचे पाटील माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांची लाडकी कन्या होत.ज्या काळात महिलांना उंबरा ओलांडू देत नसे त्या काळात माणकोजी शिंदेंनी आपल्या मुलीला शिक्षणाची गोडी लावली. 
 
त्या लहानपणा पासूनच विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या. त्यांचे शिक्षण वडिलांकडे झाले. त्यानी चांगले शिक्षण घेऊन आपले लक्ष प्राप्त केले आणि त्या अवघ्या विश्वासाठी आदर्श झाल्या.  
 
वयाच्या 8 व्या वर्षी त्यांचा विवाह मल्हारराव होळकर याचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला. लहानग्या वयातच त्या होळकर कुटुंबाच्या सून झाल्या. त्यांना मालोजीराव आणि मुक्ताबाई नावाचे दोन अपत्ये झाली. अहिल्याबाई आपल्या पतीच्या राजकारणात त्यांची मदत करत होत्या. अहिल्याबाई यांच्या गुणांना त्यांचे सासरे मल्हारराव  होळकर यांनी प्रोत्साहन दिले.वेळोवेळी ते त्यांना सैन्य,राज्याचे कारभार कसे करायचे याची शिकवणी देत असे.
 
वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांना वैधव्य आले. त्यांनी आपल्या पतीसह सती होण्याचा विचार केला परंतु त्यांना त्यांच्या सासऱ्यांनी असे करण्यापासून रोखले. नंतर त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्यावर राज्यकार्याची जबाबदारी त्यांचा मुलाने मालेराव होळकर यांनी घेतली.
 
एकाएकी मालेराव होळकर यांचे निधन झाले. त्यांनी राज्याची जबाबदारी त्यांच्या कडे द्यावी अशी विनंती पेशवांपुढे केली.      
 
त्यांच्या हाती राज्याचे कारभार देण्याचा विरोध अनेक राजांनी केला परंतु त्यांचे कुशल नेतृत्व बघून प्रजेला देखील त्यांच्या वर विश्वास बसू लागला. आपल्या कार्यकाळात अहिल्याबाईंनी अनेकदा युद्धात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचे कुशल नेतृत्व केले.आपल्या प्रजेच्या रक्षणार्थ अहिल्याबाई सतत तत्पर रहात असत.राज्यात मोठ्या प्रमाणात चोरी, लुट, हत्या, या घटनांमध्ये वाढ झाली होती. यावर अंकुश आणण्यात अहिल्याबाईं यशस्वी झाल्या. आणि आपल्या नेतृत्वात त्यांना प्रांतात शांतता आणि सुरक्षेचं वातावरण स्थापन करण्यात यश आलं. पुढे त्यांच्या राज्याचा कला, व्यवसाय, शिक्षण, या क्षेत्रात उत्तम विकास झाला.ग्रामपंचायतीचे काम सुरळीत करून न्यायालयांची स्थापना केली. अहिल्याबाईंची गणना आता आदर्श शासकाच्या रुपात सर्वदूर होऊ लागली होती.
 
महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत होते.महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न केले.
 
अहिल्याबाईंनी अनेक धार्मिक आणि प्रसिद्ध तीर्थस्थळांचे निर्माणकार्य पूर्ण केले. या व्यतिरिक्त अहिल्याबाईंनी मोठ्या कौशल्याने आणि कुशाग्रतेने अनेक किल्ले, विश्रामगृह, विहिरी, आणि रस्त्यांची निर्मिती केली. इतकेच नव्हे तर शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला शिवाय कला-कौशल्य क्षेत्रात सुद्धा आपले अभूतपूर्व योगदान दिले. राणी अहिल्याबाईंनी केवळ आपल्या प्रांतातच नव्हे तर संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक मंदिरांची, धर्मशाळांची, निर्मिती केली आहे. 
 
अहिल्याबाई होळकर या दानशूर आणि उदार शासक होत्या, त्यांच्यात दया, करुणा, परोपकाराची भावना ओतप्रोत भरलेली होती आणि म्हणूनच आपल्या शासनकाळात गरिबांकरता व भुकेलेल्यांसाठी त्यांनी अनेक अन्नछत्र उघडलीत.पाण्याकरता अनेक पाणपोया स्थापन केल्या.
 
आपल्या कारकिर्दीत अहिल्याबाईंनी इंदौर या छोट्याश्या शहराला समृद्ध आणि विकासात्मक बनविण्यात आपले अमुल्य योगदान दिले आहे. येथील रस्त्यांची स्थिती, भुकेलेल्या जीवांसाठी अन्नछत्र, शिक्षण या संबंधी अद्वितीय कार्य करून ठेवलं आहे. त्यांच्यामुळेच आज इंदौर शहराची ओळख समृद्ध आणि विकसित शहरांमध्ये केली जाते.
 
आपल्या आयुष्यात आलेली अनेक संकटं पार करत अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने दुर्दम्य आशावादाने स्त्रीशक्तीचा वापर केला तो खूप प्रशंसनीय आहे. महिलांकरीता त्या कायम एक प्रेरणास्त्रोत होत्या आणि राहतील.
आपल्या प्रजेच्या हितासाठी सतत कार्य करणाऱ्या आदर्श शासक अहिल्याबाई होळकर यांना 13 ऑगस्ट 1795 साली प्रकृती अस्वस्थ झाल्या मुळे त्यांची प्राण ज्योत मालवली.
 
समाजाकरता केलेल्या असंख्य कार्यामुळे त्या आजही सगळ्यांच्या स्मरणात आहेत आणि यापुढेही युगानुयुगे आपल्या स्मरणात राहतील.
 

Edited by - Priya Dixit