रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : सोमवार, 27 मे 2024 (11:36 IST)

रमाबाई आंबेडकर स्मृतिदिन : मायेची सावली रमाबाई भीमराव आंबेडकर

Ramabai Bhimrao Ambedkar
रमाबाई भीमराव आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात. माता रमाई यांनी जीवनात फारच दुःख सहन करावे लागले. बाबासाहेब हे शिक्षण घेत असताना रमाईंनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संसार सांभाळला. रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, "साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा." असे म्हणत. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत.
 
१९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले असताना रमाईची खूप वाताहत होत होती. त्या दुष्काळाच्या आगीत होरपळत असताना बघून बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना काही पैसे जमा केले व ते पैसै रमाईला देऊ केले. त्यांनी त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे स्वीकारले नाहीत. स्वाभिमानी रमाई जिद्दीने गरिबीशी भांडत होत्या. 
 
परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेल्यावर रमाई एकट्या पडल्या होत्या. रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.
 
रमाईची शरीर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते. रमाईचा आजार बळावला होता. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. 
 
खूप प्रयत्न करुनही त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्‍या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.