बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : बुधवार, 2 मार्च 2022 (09:16 IST)

मराठा साम्राज्य : होळकर, शिंदे आणि पेशव्यांनी काशीचा इतिहास-भूगोल असा बदलला

अनघा पाठक
"आज हे काशीचं वैभव तुम्हाला दिसतंय ना, ते सगळं मराठी राजांमुळे. होळकर, शिंदे, पेशवे यांनी काशीच्या विकासात खूप योगदान दिलं, काशीचा विकास केला," मकरंद म्हैसकर मला सांगत होते.
 
काशीतली त्यांची आता चौथी-पाचवी पिढी. वाराणसीत अनेक मराठी कुटंब राहातात आणि ही कुटुंब गेल्या सात-आठ पिढ्यांपासून इथे स्थायिक आहेत. त्या लोकांना भेटायला आणि वाराणसीच्या इतिहासात मराठा शासकांचं काय योगदान आहे हे समजून घ्यायला आम्ही इथे फिरत होतो.
 
वाराणसीतल्या गंगेच्या किनारी असलेल्या ब्रम्हा घाटाच्या मागे असणाऱ्या गल्ल्यांमध्ये खूपशी मराठी नावं तुम्हाला दिसतील. एकेकाळी इथे संपूर्ण मराठी वस्ती होती.
 
या गल्ल्यांमध्ये फिरताना आम्हाला अनेक वाडे दिसले, दीक्षित वाडा, पटवर्धन वाडा, फडणवीस वाडा, आंग्रे वाडा...
 
याच भागात पुढे विंचूरकरांचा वाडा आहे. या मराठी सरदारांनी इथे आपल्या मुलुखातून आलेल्या लोकांची सोय व्हावी म्हणून भले मोठे वाडे बांधले. ही मराठी सरदार मंडळी जेव्हा काशीत देवकार्यासाठी यायची तेव्हा इथं राहायची.
 
वाराणसी म्हणजे गंगेच्या दोन उपनद्यांवरून पडलेलं नाव. गंगेची एक उपनदी वर्णा आणि दुसरी अस्सी. वर्णा ते अस्सीच्या मध्ये असलेला भाग म्हणजे वाराणसी.
 
वाराणसीत गंगेच्या किनारी जवळपास 80 घाट आहेत, यातले साधारण तीसेक घाट मराठा राज्यकर्त्यांनी बांधल्याची माहिती म्हैसकर देतात.
 
इथल्या घाटांवर फिरताना मराठी पाऊलखुणा दिसतातही. भोसले घाट, पेशवा घाट, राजा घाट, अहिल्याबाई घाट अशी नाव बघून खात्री पटते की मराठ्यांनी इथे बरंच काम केलं आहे.
 
अहिल्याबाई होळकर आणि काशी
असं म्हणतात की काशी विश्वनाथाचं पहिलं मंदीर मोहम्मद घोरीच्या आदेशावरून त्याचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबकाने तोडलं होतं. पण याबद्दल इतिहासकारांमध्ये एकवाक्यता नाही.
 
सध्याचं काशी विश्वेश्वराचं मंदिर 1585ला राजा तोरडमल यांनी नारायण भट यांच्याकडून बांधून घेतलं. पुढच्या शंभरच वर्षांत ते औरंजेबाने तोडलं. मग 1770 च्या दशकात अहिल्याबाई होळकरांनी काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणूनच काशीत अहिल्याबाईंना खूप महत्त्व आहे.
 
अहिल्याबाईंनी फक्त काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला नाही तर गंगेच्या किनारी अनेक घाटही बांधले. सध्या काशीत सगळ्यांत जास्त गर्दी असते तो दश्वाश्वमेध घाटही अहिल्याबाईंनीच बांधला.
 
माधव रटाटे बनारस हिंदू विद्यापीठात संस्कृतचे प्राध्यापक आहेत. त्यांचंही मुळ मराठीच आहे पण त्यांच्या सहा-सात पिढ्या वाराणसीतच राहिल्या.
 
अहिल्याबाईंना वाराणसीत किती मानतात याबद्दल सांगताना ते म्हणतात, "काशीत अहिल्याबाईंची पार्वती रूपात पूजा केली जाते. त्या आमच्यासाठी देवीच आहेत. आता जो नवा कॉरिडोर बनला आहे, तिथे अहिल्याबाईंचा एक पुतळाही आहे. त्यांनी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला, इतकं मोठं काम केलं, म्हणून त्यांनी पार्वतीरूपात इथे आराधना केली जाते."
 
पेशवे आणि वाराणसी
अनेक मराठी शासकांनी काशी आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला. भाऊशास्त्री वझे यांनी 1940च्या सुमारास 'माझा चित्रपट आणि काशीचा इतिहास' नावाचं पुस्तक लिहिलं आहे.
 
त्यात उल्लेख आहे की, 'सन 1772 मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांनी आपल्या मृत्यूआधी आपल्या राज्यातल्या प्रमुख मुत्सदी आणि सरदारांना 9 शपथा घ्यायला लावल्या होत्या.'
 
त्यातली एक शपथ होती का, 'काशी आणि प्रयाग सरकारांत (मराठी साम्राज्यात) यावी. त्याबद्दल दहा-वीस लक्षांची जहागीर मुबदला पडली तरी हरकत नाही, प्रयत्न करावा.'
 
राघोबादादांचे दत्तक पत्र अमृत विनायक पेशव्यांनी वाराणसीत अमृतविनायकाचं मंदिर बांधलं. ज्या घाटावर हे मंदिर आहे त्याला राजा घाट असं नाव आहे. त्यांनी इथल्या मंदिरांना देणग्याही दिल्या.
 
वाराणसीत 6 विठ्ठल मंदिरं आहेत तीही पेशव्यांच्या काळात बांधली गेली असं म्हणतात.
 
रटाटे म्हणतात, "इथला गणेश घाट त्यांनी बांधला. या घाटावर गणपतीचं मंदिर आहे, तेही पेशव्यांनीचं बांधलं. कालभैरव मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला. भोसले राजांनी इथला भोसला घाट बांधला."
 
भाऊ शास्त्री वझेंच्या पुस्तकात काही उल्लेख आढळतात, ते असे - "मुन्शीघाट नागपूरच्या मुन्शींनी बांधला. शाहुमहाराजांचे मुख्य प्रधान बाजीरावसाहेब, सेनापती नरसिंह विंचूरकर आणि त्यांचे पोतनीस (कोषाध्यक्ष) यमाजीपंत यांनी भैरवनाथ मंदिर बांधलं. दुर्गाघाटावरचं विठ्ठल मंदिरही त्यांनीच बांधलं.'
 
या पुस्तकात पुढे उल्लेख आहे की, 'पेशवाई बुडाल्यानंतर दुसरे बाजीराव ब्रम्हावर्ताला (आजचं बिठूर) जाऊन राहिले. त्यांचे दत्तक बंधू अमृतरावसाहेब चित्रकुटाला जाऊन राहिले आणि चिमाजी अप्पा झाशीत आले. चिमाजी अप्पांचे कारभारी होते मोरोपंत तांबे. त्यांची मुलगी मनकर्णिका - जी पुढे जाऊन झाशीची राणी लक्ष्मीबाईसाहेब म्हणून ओळखली गेली. चिमाजी अप्पांचा मृत्यूही काशीतच झाला.'
 
शिंद्यांनी बालाजी घाटावर अन्नछत्रं चालवलं, ज्याचं नाव होतं अन्नपुर्णाछत्र किंवा बालाजीछत्र. दौलतराव शिंदेच्या पत्नी बायजाबाई यांनी ज्ञानवापी मंडप आणि मनकर्णिका घाट बांधला.'
 
शिवाजी महाराज आणि काशी
शिवाजी महाराजांची जेव्हा आग्र्याहून सुटका झाली तेव्हा ते काही काळ काशीला आले होते, त्यांनी आपल्या पित्रांचं इथे श्राद्ध-तर्पण केलं आणि इथेच त्यांची भेट गागाभट्टांशी झाली, ज्यांनी नंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला, अशी कथाही मला रटाटे बोलता बोलता सांगतात. दूरवरच्या एका मंदिराकडे हात दाखवून म्हणतात की हे मंदिर शिवाजी महाराजांनीच बांधलं आहे.
 
वाराणसीत मराठी माणसं का आली?
भाऊशास्त्री वझेंच्या 'माझा चित्रपट आणि काशीचा इतिहास' पुस्तकात उल्लेख आहे की साधारण तेराव्या शतकात महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला.
 
त्यापासून सुटका मिळवण्यासाठी कोकणातली ब्राम्हण आणि पुरोहित मंडळी काशीच्या दिशेने आली. तेव्हापासूनच काशीत मराठी माणसं यायला सुरुवात झाली.
 
संतोष सोलापूरकरांचे पुर्वजही पेणहून काशीत आले. आज संतोष सोलापूकरांचा बनारसी साडीचा व्यवसाय आहे आणि ते भाजपचे वाराणसीतले पदाधिकारीही आहेत.
 
ते सांगतात, "बनारसमध्ये जे मॅक्सिमम बाहेरून आले, ते वेद शिकायला आले. त्यांचं मुख्य लक्ष्य होतं इथे वैदिक शिकायचं, ऋग्वेद, यजूर्वेद, सामवेद शिकायचं आणि मग ते जे इथे शिकायला आले, ते शिकल्यानंतर त्यांनी अध्यापन कार्य केलं. त्यांनी पुढच्या पिढीला तयार केलं."
 
सध्या वाराणसीत 400 ते 450 मराठी कुटुंब राहातात. आधी इथे 1000-1200 कुटुंबं होती पण आता यातली अनेक नोकरीधंद्यानिमित्त इकडेतिकडे स्थायिक झाली.
 
इथल्या अनेक कुटुंबांचा मुख्य व्यवसाय आज 200 वर्षांनीही पौरोहित्य हाच आहे. इथे सात-आठ पिढ्यांपासून राहाणाऱ्या मराठी माणसांना आता वाराणसी सोडावंसं वाटत नाही.
 
सोलापूरकर म्हणतात, "कधी कधी वाटतं की आपली जी पूर्वजांची जागा आहे तिथे जावं. त्या जागेला बघायची इच्छा होते. मी मुळचा रायगड जिल्ह्यातला पेणचा. आम्ही गेलोही आहोत तिथे. पण काही दिवस तिकडे राहिलं की लगेच बनारसची आठवण होते."
 
"इथली हवा आणि संस्कृती यात आम्ही इतके विरघळून गेलेय की काशी सोडून बाहेर याची इच्छा होत नाही."