जगारूपी नाल्यातून बाहेर पडण्याची गरज
एकदा एका राजाचा वाढदिवस होता. तो सकाळी फिरायला बाहेर पडला तेव्हा त्याने ठरवले की वाटेत भेटलेल्या पहिल्या व्यक्तीस तो आनंदी व समाधानी करेल. त्या राज्याला रस्त्याने एक भिकारी दिसला. भिकार्याने जेव्हा राजाकडे भीक मागितली तेव्हा राजाने त्या भिकाऱ्याच्या दिशेने तांब्याच एक तांब्याचे नाणे फेकले.
भिकाऱ्याच्या हातून ते नाणे निसटून, बाजूला वाहत असलेल्या नाल्यात जाऊन पडलं. भिकाऱ्याने वाहत्या नाल्यात हात घातला आणि तांब्याचे ते नाणे शोधू लागला. राजाने त्याला बोलावून तांब्याचे दुसरं नाणे दिल. भिकारी खूश झाला आणि त्याने नाणे खिशात ठेवले आणि पुन्हा नाल्यात पडलेला नाणे शोधण्यासाठी परत गेला.
राजाला वाटले की भिकारी खूप गरीब आहे, त्याने भिकार्याला एक चांदीच नाणे दिले. भिकाऱ्याने राजाचा खूप जयजयकार केला आणि मग परत जाऊन ते नाल्यातील नाणे शोधू लागला. राजाने त्या भिकाऱ्याला पुन्हा बोलावले आणि राजाने आता त्याला एक सोन्याचं नाणे दिले. भिकारी आनंदाने चित्कार करत उठला, राजाचा जयघोष वर जयघोष करू लागला.
पण....तो परत पळाला आणि नाल्यात हात घालू लागला...
राजाला खूप वाईट वाटलं. त्याला आज सकाळी घेतलेला हा निर्णय आठवला की आज भेटलेल्या पहिल्या व्यक्तीला कसही करून आनंदी आणि समाधानी करायचंच. त्याने भिकार्याला बोलावून म्हटले की मी तुला माझे अर्ध राज्य देतो... आता तरी तू आनंदी आणि समाधानी होशील ना?
भिकारी म्हणाला, जेव्हा मला नाल्यात पडलेले तांब्याची नाणे मिळेल तेव्हाच मी आनंदी व समाधानी होईन.
आपलीही अवस्था बिलकुल भिकाऱ्या सारखीच आहे. अध्यात्माच्या रूपात भगवंताने आपल्याला अनमोल खजिना दिला आहे. आपण तो विसरत आहोत आणि जगारूपी नाल्यात तांब्याची नाणी काढण्यासाठी जीव वाया घालवीत आहोत...