मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (13:38 IST)

नारायण भंडारी आणि नारायण दाभाडकर

कामाच्या व्यापात हा लेख लिहायला खरंतर खूपच उशीर झाला. लेख लिहिन्यापूर्वी दाभाडकर आजोबांच्या कन्या यांचा व्हिडीओ पाहिला आणि डोळ्यांत पाणी आलं. गेल्या वर्षी माझे बाबा मला सोडून गेले. त्यामुळे त्यांचं दुःख मी समजू शकतो. अशा प्रकारचा त्रास आम्ही भोगला होता. माझ्याही बाबांबद्दलही गलिच्छ बोललं गेलं. आमचा दोष एकच होता की क्वाररंटाईन सेंटरमधून मी सरकारच्या हलगर्जीपणावर संवैधानिकव व सभ्य भाषेत टीका केली... हा अक्षम्य असा गुन्हा ठरला. 
 
मी आणि माझ्या कुटुंबाने असा कोणताच त्याग केला नव्हता. सरकारवर टीका केली म्हणून त्यांच्या समर्थकांना राग आला आणि त्यांनी आपले संस्कार  प्रदर्शित कले इथवर मी मानू शकतो. पण नारायण दाभाडकर आजोबांचा काय गुन्हा होता? त्यांचं ब्राह्मणी आडनाव आणि RSS चे स्वयंसेवक असणे हा गुन्हा आहे? त्यांच्यावर ज्या शब्दात टीका केली आणि त्यांच्या त्यागावर जे प्रश्नचिन्ह उभे केले त्या सर्व गोष्टी मी वाचल्या आणि माझं मन सुन्न झालं. आपण माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे नाहीत याची जाणीव झाली. जॅकी श्रॉफचा 'तेरी मेहेरबानिया' नावाचा एक चित्रपट आहे. त्या चित्रपटात मुक्या कुत्र्याला त्यागाची किंमत कळते आणि तो आपल्या मालकावर झालेल्या अत्याचाराचा प्रतिशोध घेतो. अरे मग आपण तर माणसं अहोत ना? मग आपल्याला कुणाच्या त्यागाची किंमत कळू का नये? 
 
देवेंद्र फडणवीसांनी विधान सभेत नारायण भंडारीची गोष्ट सांगितली होती. गुरुजींना मॉनिटर निवडायचा असतो म्हणून गुरुजी एकेक करून मुलांना विचारतात की शाळा सुटल्यावर तुम्ही काय करता. तर प्रत्येक जण शाळा सुटल्यावर नारायण भंडारीच्या घरी जातो असं सांगतो आणि नारायण भंडारी च्या घरी जाऊन कुणी दारूची बाटली आणतो किंवा गांजा आणतो. गुरुजी वैतागतात मग वर्गातील सगळयात शांत मुलाला विचारतात की तू काय करतोस, तर तो गुणी मुलगा म्हणतो की मी घरी गेल्यावर अभ्यास करतो, देव पूजा करतो. गुरुजी खुश होतात आणि म्हणतात की तूच वर्गाचा मॉनिटर, बरं नाव काय तुझं. तर तो गुणी मुलगा म्हणतो माझं नाव नारायण भंडारी. 
 
कथेचा अर्थ एवढाच आहे की दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. वरवर साधा गुणी दिसणारा नारायण भंडारी मुळात सर्व टग्या आणि बिघडलेल्या मुलांचा लीडर असतो.
 
सध्या आपल्याकडे नारायण भंडारी प्रवृत्तीचं वर्चस्व आहे. ढोंगी लोकांना आपण त्यागी मानून बसलो आहोत म्हणूनच त्याग करणाऱ्या माणसांवर अन्याय होतोय. पतिव्रतेच्या गळयात धोंडा वेश्येला मणिहर अशी आपली परिस्थिती झाली आहे... नारायण भंडारीच्या या युगात नारायण दाभाडकरांचा त्याग कळणे केवळ अशक्य.
 
माझं आयुष्य जगून झालंय, त्या 40 वर्षाच्या तरुणाचं जगणं जास्त महत्वाचं आहे ही भावना राम-कृष्णाच्या परंपरेतून व संघ संस्कारातून आलेली आहे. 85 व्या वर्षी सुद्धा सहसा कुणाला स्वतःच्या प्राणापेक्षा अनोळखी माणसाचे प्राण वाचवण्याची बुद्धी होत नाही. प्रत्येकाला स्वतःचा जीव प्यारा असतो. पण मुळात ही भावना मनात निर्माण होते हेच किती दिव्य आहे. हा त्याग, हे समर्पण इथल्या मातीशी आपण एकनिष्ठ असल्याचं दर्शवतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार किती खोल रुजले आहेत हेच यातून दिसतं. संघाच्या शाखेवर काय शिकवलं जातं याच दर्शन या त्यागातून घडतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 2025 ला 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. अश्या कितीतरी स्वयंसेवकांच्या त्यागातूनच संघाची ही वाटचाल झालेली आहे. 
 
आज स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या मंडळींनी दाभाडकर आजोबांच्या त्यागाची मस्करी केली, ते अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये भरती नव्हते इथपासून त्यांना मरण स्वीकारावं लागलं हा मोदींचा दोष आहे इथपर्यंत वाह्यात आणि नीच हा शब्द सुद्धा लाजेल इतक्या नीच पातळीवर टीका केलेली आहे.
 
इथे देशासाठी सर्वोत्तम त्याग करणाऱ्या सावरकरांवर गलिच्छ आरोप होतात, तर या गिधाड्यांपासून दाभाडकर आजोबा कसे वाचतील? मुळात या गिधाड्यांची बौद्धिक कुवत व सांस्कृतिक जडणघडण तेवढीच आहे. असे काही प्रसंग असतात जेव्हा राईट किंवा लेफ्ट अशी कोणतीच विंग क्षणासाठी का होईना नाहीशी होते. त्या प्रसंगापैकी एक म्हणजे नारायण दाभाडकर यांचा त्याग. पण जे लोक सैनिकांच्या कर्तृत्वावर संशय घेतात त्यांना ही बंधने लागू होत नसावीत. त्यांना हिसकावणे, ओरबाडने ही संस्कृती वाटत असल्यामुळे त्याग हा शब्द त्यांच्यासाठी तुच्छ असावा.
 
सावरकरांनी आत्मर्पण केलं त्याआधी ते म्हणाले होते की आता माझी कोणतीच इच्छा उरलेली नाही, मी माझं आयुष्य जगलेलो आहे, आता मला काही मिळवायचं सुद्धा नाही. मी सगळं काही मिळवलेलं आहे. सावरकरांनी प्रसन्न आणि संतुष्ट मनाने मर्त्यलोकाचा त्याग केला. दाभाडकर आजोबांसमोर सावरकरांचा आदर्श होता... 
 
म्हणून तर दाभाडकर आजोबांनी 40 वर्षाच्या तरुणासाठी स्वतःच्या प्राणांचा त्याग केला आणि या मर्त्यलोकावरून निरोप घेतला... 
 
धन्योऽहम ! धन्योऽहम !
कर्तव्य मे न विद्यते किंची ।
धन्योऽहम ! धन्योऽहम !
प्राप्तत्यम सर्वमहा संपन्नम !
 
सावरकरांप्रमाणे दाभाडकर आजोबांची सुद्धा हीच भावना असेल.
 
आता ज्यांना यात टिंगल टवाळी करावीशी वाटते, टीका करावीशी वाटते त्यांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे, आपल्यात कोणतेच मानवी गुण नसल्यामुळे आपण पाशवी आहोत का याची खातरजमा करणे सुद्धा आवश्यक आहे. नारायण भंडारीच्या या युगात नारायण दाभाडकरांच्या त्यागाला किंमत नसेल. परंतु इतिहास कधीच दाभाडकरांचा त्याग विसरणार नाही. 
 
आम्ही सर्व तरुण मंडळी नारायण दाभाडकरांचे ऋणी आहोत... 
 
दाभाडकर आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि एक कडक सॅल्युट...
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री