शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (21:16 IST)

सरसंघचालकांनी अधोरेखित केलेली लोकसंख्या नियंत्रण धोरणावरील फेरविचाराची गरज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयदाशमी उत्सवात बोलतांना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रण धोरणावर फेरविचार करण्याची सूचना केलेली आहे. आज तरुण असणारी पिढी काही वर्षणानंतर म्हातारी होणार आहे, त्यावेळी या वृद्धांकडे बघण्यासाठी पुरेसे तरुण असतील काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या देशात एखाद्या धर्माची संख्या दिवसागणिक वाढते तर बाकी धर्मांची तुलनात्मकदृष्ट्या कमी होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली आहे.
 
सरसंघचालकांची सूचना निश्चितच स्वागतार्ह म्हणावी लागेल, आज आपल्या देशाची लोकसंख्या १३० कोटीच्या वर गेलेली आहे. मात्र लोकसंख्या वाढीचा समतोल साधला गेलेला नाही. हे नमूद करणे आवश्यक ठरते. एका काळात चीनमध्येही ओलोकसंख्येचे नियंत्रण करण्यासाठी कडक उपाययोजना  केल्या गेल्या होत्या, नंतर कालांतराने विविध समस्या निर्माण झाल्या. आणि चीनमध्ये लोकसंख्या वाढीचे धोरण अवलंबावे लागले. हा इतिहास ताजा आहे.
 
आपल्या देशात स्वातंत्र्योत्तर काळात लोकसंख्या नियंत्रणाची गरज वाटू लागली, त्यामुळे कुटुंबनियोजनाचे धोरण अवलंबले गेले. त्याकाळात एका जोडप्याला  किमान ४ तरी अपत्य असायची, अनेक ठिकाणी त्यापेक्षा जास्तही होती. नागपूरच्या एका परिवारात एका जोडप्याला त्याकाळात १९ अपत्ये झाल्याचे मी बघितले आहे. त्याकाळात लग्नाचे वय कमी होते, त्यामुळे सोळाव्या वर्षांपासून स्त्रीला मुले व्हायला सुरुवात व्हायची हा सिलसिला पुढे स्त्री चाळीस वर्षाची होईपर्यंत चालायचा, स्त्रीची जननक्षमता संपली कीच ती थांबायची त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग जबरदस्त होता. ही बाब लक्षात घेत सुरुवातीला चार अपत्यांवर थांबावे असा निर्णय घेतला गेला. नंतर दोन किंवा तीन पुरेत ही घोषणा आली, काही काळ गेल्यानंतर हम दो हमारे दो असे ठरवत जोडपी दोन अपत्यांवरच थांबू लागली. गेल्या तीस वर्षात बहुसंख्य परिवारांमध्ये एका अपत्यावरच थांबलेले दिसून येतात. आतातर अनेक जोडप्यांनी अपत्य होऊच द्यायचे नाही, असा निर्णय घेतलेला दिसतो.
 
सरसंघचालकांनी सांगितले, त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही कालांतराने वृद्ध होणार आहे. माणूस वृद्ध झाला कि त्याची काम करण्याची क्षमता कमी होते, अश्यावेळी  त्याच्या चरितार्थाचे काय? हा प्रश्न निर्माण होतो. मग अनेक वृद्ध निराधार झालेले आम्ही बघतो. इथे जर त्या जोडप्याला एखादे जरी अपत्य असले, तरी त्या जोडप्याची काळजी घ्यायला कुणी ना कुणी आहे हे नक्की.  मात्र अपत्याचा नसले तर परमेश्वरच त्या जोडप्याचा वाली  असतो. 
 
अशी छोटी कुटुंबे बनवण्याच्या नादात आमच्या पुढच्या पिढ्यांना नातेसंबंध काय? आणि कसे? हेसुद्धा माहित होत नाही. पूर्वी एका परिवारात ४-५ तरी भावंडे असायची, यथावकाश मोठ्या भावाचे किंवा बहिणीचे लग्न व्हायचे, त्यावेळी धाकट्या भावंडांना अनायासेच वाहिनी किंवा भाऊजी या नवीन नात्याची ओळख व्हायची. कालांतराने ही भावंडे कुणाचातरी काका, मामा, आत्या, मावशी बनायची त्यातून आणखी एक नव्या नात्याची ओळख व्हायची. पुढे जाऊन धाकट्यांची लग्न झाली, की घरात जावाही यायच्या. मग एकाच छताखाली तीन पिढ्या एकत्र नांदायच्या, काही घरांमध्ये तीन ऐवजी चारही पिढ्या एकत्र राहत होत्या.
आज मात्र घरटी एकच अपत्य दिसते, त्यामुळे इतर नाती तर जाऊ द्या पण या मुलांना सख्खे बहीण भाऊ यांचेही सुख मिळत नाही. सुमारे ५० वर्षांपूर्वी बहीण भाऊ एकत्र शाळेत जायचे, एकत्र अभ्यासही करायचे आता ते प्रकार बंद झाले आहेत. आज घरात एकच मुलगा असला, तर त्याच्यासाठी  राखी बांधायला किंवा भाऊबीजेचे  ओवाळायला बहीण शोधावी लागते. कालांतराने ही मुले मोठी झाल्यावर त्यांना सख्खी वाहिनी किंवा सख्खे भाऊजी मिळण्याची शक्यता आता संपलेली आहे. आपल्याकडे लग्नात  नवऱ्या मुलीबरोबर पाठराखीण म्हणून धाकटी बहीण जाण्याची  पद्धत होती, आता लग्नात पाठराखीण ही संकल्पनाच संपलेली आहे. या मुलांना उद्या मुले झाल्यावर त्यांच्यासाठी काका, आत्या, मामा मावशी  हे कुठून शोधायचे हाही प्रश्नच आहे.
 
ज्यावेळी एका जोडप्याला दोन तीन अपत्ये असायची, त्यावेळी हातपाय थकले की आईवडिलांनाही पर्याय असायचा, काही काळ एका मुळाजवळ, तर काही काळ दुसऱ्याकडे आणि महिना दोन महिने मुलीकडे जाऊन राहता यायचे, आता ती शक्यता संपलेली आहे. त्यातही मुले जर परदेशात असली, तर म्हातारा म्हातारी एकटेच राहतात त्यातील एखाद्याने जीवनयात्रा संपवली की दुसऱ्याचे काही खरे नसते.
 
एकूणच लोकसंख्या नियंत्रणामुळे असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. जसाजसा काळ लोटेल तसेतसे हे प्रश्न आणखी गंभीर होणार आहेत, त्यामुळे यावर  आजच विचार करणे गरजेचे झाले आहे. अर्थात असा विचार करतांना नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडेही बघणे गरजेचे आहे. ५० वर्षांपूर्वी महागाई इतकी वाढलेली नव्हती त्याचबरोबर आमच्या गरजही मर्यादित होत्या. अश्यावेळी वडिलांच्या उत्पन्नात सहा सात जणांचे कुटुंब सहज पोसले जायचे, त्याकाळात शिक्षणही आजसारखे महाग नव्हते. पहिलीपासून कोचिंग क्लास लावायची गरजही  नव्हती, त्यामुळे निभावून जायचे आज  मात्र परिस्थिती बदललेली आहे. प्रत्येकाला स्पर्धेच्या जगात उच्च मध्यमवर्गीय जीवन जगायचे आहे, ५० वर्षांपूर्वी गल्लीत एखादी स्कुटर असायची आणि चाळीत एखादा फ्रिज असायचा, एकाच रेडिओवर दहा घरचे सदस्य एकत्र येऊन गाणी ऐकायचे, तो एक उत्सवचं असायचा, आज परिस्थिती बदलली आहे. आमच्या घरात प्रत्येक खोलीत वातानुकूलित यंत्रणा लागली आहे, प्रत्येक खोलीत टीव्हीही आहे. दरवर्षी आम्ही १५ दिवस उत्तर नाहीतर दक्षिणेत पर्यटनालाही जातो आहोत. आमच्या मुलांना आम्ही पब्लिक स्कुलमध्ये शिकायला पाठवतो आहोत, घरात  प्रत्येकाची एक स्कुटर आहे, घरात तीनच सदस्य असले तरी एक चारचाकीही आहे. अश्यावेळी मर्यादित उत्पन्नात या सर्व गरज भागवणे कठीण होते, मग अश्यावेळी कमीत कमी अपत्ये हा निर्णय घेतला जातो, हे नागडे वास्तव आम्हाला नाकारता येत नाही. मात्र आम्ही आजचा विचार करून स्वस्थ बसतो, भविष्यातील समस्यांवर आम्ही विचार करत नाही. तो करणे गरजेचे असल्याचाच इशारा आम्हाला सरसंघचालकांनी दिला आहे.
  
लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा मांडतांना सरसंघचालकांनी एका धर्माला दिलेली सवलत आणि इतरांना ती सवलत  नाकारली जाणे, याकडेही लक्ष वेधले आहे.  कुटुंबनियोजनाची सक्ती ही आपल्या देशात सर्वधर्मियांसाठी करण्यात आली होती, मात्र एका धर्माला त्यातून सूट देण्यात आली होती. त्यामुळेच  या देशात समान नागरी कायद्याचा अवलंब होऊ शकला नाही, परिणामी त्या धर्मात अपत्यसंख्येवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे त्या धर्माची  लोकसंख्या अमर्याद वाढली आहे, त्यातही आपल्या देशात हा एक धर्म सोडून सर्वधर्मियांना एकावेळी एकाच स्त्रीशी किंवा स्त्रीला पुरुषाशी विवाह करण्याचे बंधन आहे, या धर्मात तसे बंधन नसल्याने एका पुरुषाला हव्या तितक्या स्त्रियांशी विवाह करता येतो, त्यामुळेही लोकसंख्येचा असमतोल निर्माण झाला आहे. यावरही विचार व्हायला हवा असे सुचवतांना सरसंघचालकांनी आडवळणाने समान नागरी कायद्याची गरज अधोरेखित केली आहे.
एकंदरीतच लोकसंख्या नियंत्रण धोरणावर फेरविचार करायला सांगून सरसंघचालकांनी नव्या विषयाकडे लक्ष वेधले आहे. या विषयावर साधक बाधक चर्चा व्हायला हवी.  त्यातून होणाऱ्या विचारमंथनातून निघणारे नवनीत देशाला नवी दिशा देणारे ठरू शकेल हा विश्वास आहे.
 
तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....
 
ता.क. :  घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.
 
 अविनाश पाठक