म्हणून अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहत नाहीत
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडी गेल्या अनेक दिवसांपासून नोटीस बजावत आहेत. त्यांच्या निवासस्थानी छापेमारी देखील करण्यात आली. परंतु अद्याप ते चौकशीसाठी ईडीसमोर हजर झालेले नाहीत. देशमुख यांनी नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाला ते चौकशीसाठी हजर का राहत नाहीत, याचं कारण सांगितलंय. त्यांनी म्हटलंय की, पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने त्यांच्याविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईपासून ते पळत असल्याची धारणा दूर चुकीची आहे. या प्रकरणात जर ईडी निष्पक्षपातीपणे तपास करणार असेल, तर आपण तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं.
न्यायमूर्ती नितीन एम जमादार आणि सारंग व्ही कोतवाल यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद करताना अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी म्हणाले, “अनिल देशमुख ईडीपासून आणि कारवाईपासून पळत असल्याचा गैरसमज मी दूर करू इच्छितो. कोणताही वैयक्तिक हेतू नसणाऱ्या लोकांकडून देशमुखांची चौकशी केली जावी. कारण ईडी निष्पक्षतेच्या मूलभूत मापदंडांचे पालन करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाचा हस्तक्षेप असणं आवश्यक आहे. तसेच देशमुख यांना जबरदस्तीच्या कारवाईपासून सुरक्षा देण्यात आली पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, देशमुखांवर ईडी चौकशी काही अधिकाऱ्यांकडून मनमानीने आणि सूडबुद्धीने केली जात आहे, असा आरोप अनिल देशमुख यांच्या वकिलांनी केलाय. तसेच ईडी न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी अनिल देशमुख हे वाईट व्यक्ती असल्याचं दाखवण्यासाठी माध्यमांना निवडक खुलासे करत आहे, जेणेकरून त्यांच्याबद्दल चुकीची सार्वजनिक धारणा निर्माण होईल, असाही आरोप त्यांनी केलाय.