शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (09:35 IST)

व्यक्तिविशेष : राजीव गांधी आणि मृत्यू

21 मे 1991. राजीव गांधी स्वतः विमान चालवित विशाखापट्टणम्वरून चेन्नईला पोहोचले. आजचा आपला दिवस जीवनातील शेवटचा दिवस आहे, याची यत्किंचित तरी कल्पना त्यांना होती का?
 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून ते देशभर फिरत होते. त्यापूर्वी काही दिवस अगोदरच ते सोलापूरला प्रचारासाठी आले होते. सोलापूर विमानतळावर सुरक्षा व्यवस्था भेदून कोणीही त्यांना हस्तांदोलन करीत होते. शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातही राजीव गांधी हे सुरक्षा कवच बाजूला ठेवून सामान्य कार्यकर्त्यात मुक्तपणे मिसळत होते. सुरक्षिततेची ऐशीतैशी झालेल्या घटनेचा माझ्यासहीत अनेकजण साक्षीदार होते. पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी राजीव गांधींची एस.पी.जी. सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती. मुळात राजीव गांधींच्या जीवाला एल.टी.टी.ई. अतिरेक्यांपासून मोठा धोका होता. ते त्यांच्या जीवावरच उठले होते. केवळ दोन अंगरक्षक त्यांना देण्यात आले होते. तमिळनाडूच्या त्यांच्या नियोजित प्रचार दौर्‍यात श्री पेरबद्दूर येथील प्रचार सभेचा समावेश नव्हता. तेथील उमेदवार मार्गार्थ चंद्रशेखर यांच्या आग्रहामुळे केवळ एक दिवस अगोदर 20मे रोजी श्री पेरबद्दूर प्रचार सभेचा समावेश करण्यात आला. त्याबद्दलची बामती वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आणि अतिरेक्‍यांनी डाव साधला. राजीव गांधी यांना पुष्पहार घालून व पाया पडण्याच्या निमित्ताने खाली वाकायचे व स्वतःच शरीराभोवती बांधलेल्या शक्तिशाली बॉम्बचा स्पोट करायचा असा अतिरेक्‍यांचा प्लॅन होता. अतिरेकी धानू ही मानवी बॉम्ब झाली होती. 
 
व्ही.आ.पी. प्रवेशद्वाराजवळ ती पुष्पहार घेऊन सज्ज होती. महिला फौजदार अनसूया हिने तिला येथून हुसकावून बाजूला काढले होते. राजीव गांधी यांचे आगमन झाले. धानू पुन्हा राजीवजींच्या जवळ येऊन पुष्पहार घालणार तेवढ्यात पुन्हा लक्ष गेलेल फौजदार अनसूया हिने तिला तेथून खेचले. राजीव गांधी यांनी फौजदार अनसूया हिला तसे न करण्याचे सूचित करीत, लोकांना पुष्पहार घालू द्या, असे सांगितले. पुष्पहार घालण्यासाठी थांबलेल्या धानूला जवळ बोलावून घेऊन राजीवजींनी पुष्पहार घालून घेतला. धानू पाया पडण्यासाठी खाली वाकली आणि एकच प्रचंड धमाका झाला. तिच्यातील मानवी बॉम्बचा स्फोट होऊन त्यात राजीव गांधींच्या देहाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. मुंडके चाळीस फुटावर उडून पडले. पुष्पहार घालताना फोटो काढणार्‍या फोटोग्राफरचा कॅमेरा तेथे पडला होता. तपासात या कॅमेर्‍यातील रोलने राजीव गांधींच्या हत्येचे गूढ उकलले. तपासात या कॅमेर्‍यातील फोटोंमुळे गुन्हेगार कोण हे समजून आले. सर्व आरोपींना अटक करण्यात आली. 26 आरोपींना स्पेशल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. अपिलात चार जणांची फाशी कायम केली. सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांनी हिला आरोपी नलिनी हिची फाशी रद्द करावी अशी मागणी केली. नलिनीच्या दयेचा अर्ज त्यामुळे राष्ट्रपतींनी मंजूर करून तिच्या फाशीचे रूपांतर जन्मठेपेत केले. राजकीय दबावामुळे 11 वर्षे राष्ट्रपतींनी आरोपींच्या दयेच्या अर्जावर कोणताही निर्णय दिलेला नाही राष्ट्रपतींच्या या विलंबामुळे सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची फाशीची शिक्षा जन्ठेपेत रुपांतरित केली. या जन्मठेपेच्या आरोपींना मुक्त करण्याचा निर्णय तमिळनाडू सरकारने घेतला होता. परंतु सी.बी.आ.य ने केलेल्या अपिलामुळे या सुटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
 
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या खुन्यांना 21 महिन्यात मृत्युदंड देण्यात आला. पंतप्रधान इंदिरा गांधी यच्या खुन्यंना 4 वर्षांच्या आत मृत्युदंड देण्यात आला. परंतु पंतप्रधान राजीव गांधींच्या खुन्यांना मृत्यूदंड होऊनदेखील त्यांनी मृत्यूला पळवून लावले. 
 
अॅड. धनंजय माने