गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : सोमवार, 11 जानेवारी 2021 (11:50 IST)

Shaniwar Wada १० जानेवारी रोजी झाले होते शनिवारवाडयाचे भूमिपूजन

शनिवारवाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक १७ जून, इ.स. १९१९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
 
शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवारवाडा असे नाव पडले. शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दर किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधे असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.
 
शनिवारवाड्यातील गणेश रंगमहाल हा नानासाहेब पेशव्यांनी १७५५ साली बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे एका वेळी शंभर नर्तकी नृत्य करू शकत असत. महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशमूर्ती होती, तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती. फुलांचा सुगंध व कारंज्यांचा नाद यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे..
 
१७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे होत राहिले. १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी अखेर वाड्याची दुरावस्था संपली. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. 
 
शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत; पेशव्यांचा दरबार येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे. पुढे येथे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली. वाड्याच्या पटांगणातील मारुतीस सभामंडप होता. हे मंदिर शिवाजी पूल बांधणाऱ्या केंजळ्यांनी बांधले. मंदिरात १९ मार्च १९२४ रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली. हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. दिल्ली दरवाजा वाड्यातील मुख्य प्रवेशद्वार तर हजारी कारंजे हे विशेष आहेत.