शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (12:12 IST)

ताई म्हणजे आपली बहीण

आपण आईच्या उदरात असल्या पासून, सर्वात उत्सुक असणारी व्यक्ती म्हणजे आपली बहीण.रोज आईला विचारून भांडाऊन सोडणारी व केव्हा येणार बाळ म्हणून वाट बघत असणारी चिमुकली ताई म्हणजे आपली बहीण.
थोडक्यात आईच्या पोटात असल्यापासून आपली हक्काची मैत्रीण आपली वाट बघत असते, आपल्या चिमुकल्या हातात घेण्यास, आपलं कौतुक करण्यास तय्यार बसली असते!
अय्या कित्ती गोड आहे ग ही!चिमुकले हात, पाय, इवले डोळे कित्ती सुंदर आहेत न !बाहुली सारखे !!असं म्हणून आपलं स्वागत करणारी आपली ताई असते.
मोठे होतं होतं हे नातं कधी गुरफटून जातं हे समजत ही नाही.ताई शिवाय पान हलत नाही,काही खावंसं वाटत नाही.
तिच्या पावलावर पाऊल टाकावं वाटतं.
भांडण पण होतात खूप!तिला चांगलं दिलं, मला नाही म्हणत रुसवे फुगवे होतात, लुटुपुटू च्या लढाया होतात !
लहान बहीण असो बाकी भाऊ हे सर्वच घरी ह्या न त्या फरकाने घडतच.
मोठं झाल्या वर कपडे न विचारता घालून मिरविणे, सायकल तोडून ठेवणे, असे ना ना प्रकार घडतात, पण त्याचे पडसाद काही फार काळ टिकून राहत नाही.
बहिणी बहिणीच्या प्रेमात दिवसेंदिवस वाढ होते, गुपितं सांभाळून ठेवले जातात !अशी ही भावनिक गुंतागुंत लीलया सांभाळली जाते.
पण बहिणीच्या लग्नानंतर आपण एकटं पडतो, काहीतरी हरविल्या सारख होतं.
पण तिच्या घरी आवर्जून राहायला जावंसं वाटतं, आईनं दिलेलं जिन्नस, वस्तू आवडीने घेऊन जविशी वाटतात!
आपलं ही लग्न झालं की मात्र तिच्या असण्याची किंमत जरा जास्तच वाटते.आपला भरभक्कम आधार वाटते.सर्व अडचणींवर मिळालेलं उत्तर वाटते आपली बहीण.
तर ही अशी बहीण सर्वच टप्प्यावर आपलं हक्काचं माणूस मात्र असतं, आणि आईनन्तर च आपलं माहेर ही तीच असतं ह्यात शंका नाही!!!! 
........एक बहीण अश्विनी थत्ते